मालेगाव :मनमाड मध्ये 2011 साली संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या इंधन माफियांनी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळून हत्या केली होती. या प्रकरणी आज मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयात अंतिम सुनावणी पार पडली. या प्रकरणाचा निकाल अखेर आज लागला आहे. यात तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मच्छिन्द्र सुरवडकर,राजू सिरसाट आणि अजय सोनवणे या तिघा आरोपींना कलम 302 अंतर्गत आजीवन करावास, 353 अंतर्गत 2 वर्षे आणि कलम 506 अंतर्गत 7 वर्षे शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड केला आहे
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला 25 जानेवारी 2011रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाडपासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्डयावर छापा मारण्यासाठी गेले असता इंधन माफियांनी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी पोपट शिंदे सोबत मच्छिन्द्र सुरवडकर, राजू सिरसाट, अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे असे पाच आरोपी होते. त्यापैकी पोपट शिंदे यांचा मृत्यू झाला आहे तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायलयात खटला सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
25 जानेवारी 2011 रोजी यशवंत सोनवणे यांनी पोपट शिंदे याच्या धाब्यावर पेट्रोलमध्ये भेसळ करताना शिंदे आणि त्याच्या साथीदारांना रंगेहात पकडले होते. याचवेळी शिंदे आणि त्याच्या सहकार्यांनी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोपट शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र पोपट शिंदे भाजल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केले होते. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला होता. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले होते.