झारखंडमध्येही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून हकनाक बळी...

06 Sep 2022 10:27:55
अंकिताचा या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हकनाक बळी गेला. त्या घटनेपासून झारखंडसह अन्य ठिकाणचा हिंदू समाज योग्य तो बोध घेईल आणि ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार हाणून पाडील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
 
jihad

 
लव्ह जिहाद’च्या विरुद्ध हिंदू समाजाने अनेक राज्यांमध्ये जनजागृतीचे कार्य हाती घेतले असले आणि काही राज्यांनी त्यासंदर्भात कायदे केले असले तरी मुस्लीम तरुणांचे तरुण हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न अद्याप थांबले नसल्याचेच दिसून येते. झारखंडमध्येही असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. हिंदू मुलींना आपल्या पाशात ओढण्यासाठी मुस्लीम तरुण हिंदू नावे धारण करून मुलींना फसवित असल्याचे आणि विरोध करणार्‍या मुलींचा जीव घेण्याचे प्रकारही अशा मुस्लीम जिहादींकडून घडले आहेत.
 
अंकिता सिंह नावाच्या एका मुलीबाबत असाच प्रकार घडला. झारखंडमधील दुमका येथे राहणार्‍या 17 वर्षे वयाच्या अंकितास मोहम्मद शाहरुख हुसेन नावाच्या मुस्लीम तरुणाने आपल्या जाळ्यात ओढले. पण, अंकिता त्याला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने, “माझ्यावर प्रेम कर आणि तसे न केल्यास तुला ठार करीन,” असे तिला धमकाविले. अंकिता आपल्याला धूप घालत नाही, हे पाहिल्यावर विविध प्रकारे तिला धमक्या देण्याचे प्रकार केले. तिच्या घरावरही तो चाल करून गेला. पण, गेल्या महिन्यातील 22 तारखेला त्या नराधमाने हद्द केली. आपल्या मित्रांसमवेत पेट्रोल घेऊन मोहम्मद शाहरुख हुसेन अंकिताच्या घरी गेला. अंकिता ज्या खोलीत झोपते, त्या खिडकीतून त्याने घरात पेट्रोल फेकले आणि तिला पेटवून दिले. झोपेत असलेली अंकिता त्या घटनेत मोठ्या प्रमाणात भाजली. 27 आणि 28 ऑगस्टच्या रात्री अंकिताने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी हुसेनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ‘कलम 328’, ‘307’आणि ‘506’ या कलमांखाली गुन्हा दाखल केला.
 
या घटनेसंदर्भात अंकिताचे वडील संजयसिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शाहरुख हुसेन हा अंकिताला वारंवार लग्न कर, इस्लाम धर्म स्वीकार, असे सांगायचा. तसे न केल्यास तुझे जगणे मुश्किल करीन, असे धमकवायचा. संजयसिंह ज्या वसाहतीत राहतात, त्याच वसाहतीत शाहरुख हुसेन राहत होता. गेल्या वर्षभरापासून तो अंकिताचा पिच्छा करीत होता. ती शाळेत जाण्यासाठी निघाली की, तो तिचा पाठलाग करीत असे. त्याने कोठून तरी तिचा फोन नंबर मिळविला आणि त्यावरून तिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मनधरणी करू लागला. त्याला अंकितासमवेत प्रेमसंबंध निर्माण करावयाचे होते, असे अंकिताचे वडील संजयसिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आपला प्रस्ताव मान्य केल्यास पोलीस अधिकारी होण्यासाठी तुला मदत करीन, असेही त्याने अंकिताला सांगितले होते. 2019 मध्ये शाहरुख हुसेनने अंकिताच्या घरावर चाल करून घराचे नुकसानही केले होते. अंकिताने त्यावेळी आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले आणि त्यांनी शाहरुख हुसेनला चांगला चोप दिला होता.
 
त्या घटनेनंतर एका मुस्लीम उपनिरीक्षकाने आणि काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी अंकिताच्या कुटुंबासमवेत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण, शाहरुख हुसेनचे अंकिताला त्रास देणे सुरूच होते. दरम्यान, दुमका जिल्हा पोलीस अधीक्षक नूर मुस्तफा हे गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालत असल्याचे दिसून आले. जनतेच्या आणि हिंदू संघटनांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तीव्र निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नूर मुस्तफा यांस निलंबित करण्यात आले. सदर पोलीस अधिकारी केवळ जातीयवादीच नव्हे, तर वनवासीविरोधी असल्यासंदर्भातील कागदपत्रे झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी प्रकाशात आणली.
 
दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी झारखंडमधील लोकसंख्येचे प्रमाण बदलत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अंकितासमवेत जे घडले तसे झारखंडमधील असंख्य मुली आणि स्त्रियांच्याबाबत घडत असल्याचे ते म्हणाले. “अंकितासमवेत घडलेली घटना साधीसुधी नाही. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. अन्य धर्माच्या लोकांना सक्तीने इस्लामचा स्वीकार करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे करून लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. झारखंडमध्ये जे बेकायदेशीर बांगलादेशी घुसले आहेत, त्यांनी दहा हजार एकरातून अधिक जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली आहे,” असेही रघुबर दास यांनी म्हटले आहे.
 
अंकिताच्या बाबत जशी घटना घडली तशा ‘लव्ह जिहाद’च्या घटना भारताच्या विविध भागात घडल्या आहेत. झारखंडमधील हिंदू समाजाचे डोळे, अंकिताच्या बाबतीत जे घडले, त्यामुळे उघडले आहेत. अंकिताने अखेरच्या क्षणी ‘जैसे मैं मर रही हू उस की वजह से, वैसे ही उस के साथ भी हो जायें’, असा संताप व्यक्त केला होता. अंकिताचा या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हकनाक बळी गेला. त्या घटनेपासून झारखंडसह अन्य ठिकाणचा हिंदू समाज योग्य तो बोध घेईल आणि ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार हाणून पाडील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
 
हुबळीमध्ये गणेश मंडपातून सावरकरांचे पोस्टर हलविले
 
हुबळी शहरामध्ये असलेल्या ईदगाह मैदानात राणी चेन्नमा मैदान गजानन उत्सव महामंडळाने जो मंडप उभारला, त्या मंडपाच्या प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पोस्टर्स लावण्यात आली होती. तसेच, स्टेजवरही ही पोस्टर्स लावण्यात आली होती. तसेच, गणेशमूर्तीच्या पाठीमागेही सावरकर यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. पण ते नियमात बसत नसल्याचे सांगून प्रशासनाने ती पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले. त्या प्रकाराबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्सवाच्या आयोजकांना सावरकर हे अत्यंत महान देशभक्त असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांचे छायाचित्र तेथे लावले. असे करण्यात काय चुकीचे होते, असे ते म्हणाले. ईदगाह मैदानावरील गणेशोत्सवात महाआरती झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी वरील भाष्य केले.
 
त्याआधी कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळीतील ईदगाह मैदानावर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनास अनुमती दिली होती. सदर गणेशोत्सवास आक्षेप घेणारी याचिका अंजुमन-ए-इस्लामने उच्च न्यायालयात केली होती. पण, न्यायालयाने ती फेटाळून लावली. सदर जागा ही हुबळी-धारवाड महानगरपालिकेची असून ती कोणाला द्यायची, याचा निर्णय ते घेऊ शकतात, असे न्यायालयाने आपला निकाल देताना स्पष्ट केले होते. सदर ईदगाह मैदान हे वादग्रस्त म्हणून ओळखले जाते. त्या मैदानावर प्रथमच गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
‘अंजुमन-ए-इस्लाम संघटने’चा ईदगाह मैदानावर सुमारे 100 वर्षांपासून डोळा आहे. 1921 मध्ये प्रार्थना करण्यासाठी त्या संघटनेने अनुमती मागितली होती. तेव्हा ती देण्यात आली होती. पण, 1960च्या दशकानंतर त्या मैदानावर कायमस्वरूपी बांधकाम करण्याचे प्रयत्न ‘अंजुमन-ए- इस्लाम’ने चालविले होते. रामजन्मभूमी आंदोलन ऐन भरत असताना त्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, जातीय तणाव निर्माण होईल म्हणून तो रोखण्यात आला होता. 1994मध्ये भाजप नेत्या उमा भारती यांनी स्वातंत्र्यदिनी ईदगाह मैदानावर राष्ट्रध्वज फडकविण्याची घोषणा केली होती. त्यावेळी उमा भारती यांच्या अनेक समर्थकांना रोखण्यात आले. शहरात संचारबंदी जारी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या पोलिसी गोळीबारात सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
 
अशा वादग्रस्त मैदानावर प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव संपन्न होत आहे. तेथे वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांची प्रतिमा लावल्यावरून त्यास आक्षेप घेण्यात आला आहे. त्यासाठी काही थातुरमातुर कारणे पुढे करण्यात आली आहेत. असे असले तरी त्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवामुळे हिंदू समाजात चैतन्य निर्माण झाले आहे.
 
पलामूमधून 50 दलित कुटुंबांना मुस्लिमांनी हाकलून लावले. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील पांडू भागात राहणार्‍या 50 दलित कुटुंबाना तेथील मुस्लीम समुदायाने सक्तीने पळवून लावल्याची घटना घडली असून राष्ट्रीय मागास जाती आयोगाने त्या घटनेची दखल स्वतःहूनघेतली आहे. आयोगाने त्या भागास भेट दिल्यानंतर राज्य सरकार सहकार्य करीत नसल्याचा ठपका ठेवला.
 
तसेच, पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्य सचिव त्या घटनेकडे गंभीरपणे पाहत नसल्याचे मत नोंदविले. आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलधर यांनी, या घटनेसंदर्भात प्रशासनासमवेत काही साटेलोटे झाल्याची दाट शंका येते, असे म्हटले आहे. त्यांच्या अनुमतीशिवाय त्या दलित कुटुंबांची तेथून हकालपट्टी होणे शक्य नाही, असे मत त्यांनी नोंदविले आहे. आयोगापुढे हजर राहण्यास मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना लेखी पत्र देण्यात आले होते, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, असेही हलधर यांनी म्हटले आहे. मुस्लीम समाज प्रशासनाच्या संगतमताने दलितांना कसे हाकलून देत आहे आणि त्या भागात आपले हातपाय कसे पसरत आहे, त्याची कल्पना या घटनेवरून यावी!
Powered By Sangraha 9.0