जिल्हा पेठ पोलीसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ !
जळगाव : कोरोना काळात चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका लावलेली होती. परंतु याची थकीत रक्कम शासनाकडून अद्याप मिळालेली नाही.वारंवार मागणी करून देखील पैसे मिळाले नाहीत . यामुळे चाळीसगाव येथील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नांव धीरज अशोक कोसोदे असे असून तो चाळीसगाव येथील रहिवासी आहे. धीरज याच्याकडे खासगी रूग्णवाहिका आहे. त्यावरच तो उदरनिर्वाह करतो. कोरोना (Corona) काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने धीरज कासोदे याच्या तीन रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर लावल्या होत्या. या दरम्यान आपली सेवा बजावली होती. या कालावधीत (Jalgaon) तीनही रुग्णवाहिकेचे एकूण १५ लाख ५१ हजार ४०० रुपये शासनाकडे थकीत असल्याचे समजले. . थकीत असलेली रक्कम मिळावी यासाठी धीरजने वारंवार मागणी केली. परंतु, धीरज याच्या मागणीची चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयाने कुठलीही दखल घेतली नाही.
थेट पोहचला जिल्हाधिकारी कार्यालयात
कर्ज काढून रुग्णवाहिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. तरुणाने केलेल्या मागणीची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर आज (२३ सप्टेंबर) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीसांच्या सतर्कतेमुळे तातडीने धाव घेत तरुणांच्या हातातील पेट्रोलची बाटली व आगपेटी जप्त केले आहे.