उघूरांवर चिनी दडपशाही!

02 Sep 2022 10:53:59
 
संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले. गेल्या अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या यासंबंधीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. आता तो अहवाल समोर आला आणि चीन वगळता स्वतःला मानवाधिकारवादी, उदारमतवादी वगैरे म्हणवून घेणार्‍या देशांमध्ये खळबळ माजली.
 

china 
 
 
 
शिनजियांग प्रांतामध्ये तयार करण्यात आलेल्या छळछावण्यांमध्ये चीन उघूर मुस्लिमांना अतोनात यातना देत असल्याचा अहवाल नुकताच संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशित केला. इथल्या छळछावण्यांमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक उघूर मुस्लिमांना कैद केलेले असून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जात असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. त्यात महिलांवर बलात्कार, पुरुषांची नसबंदी, जीवंत माणसाला गायब करणे यांसह नमाज वा रोजे ठेवण्यावर बंदी, दाढी वाढवण्यावर बंदी, महिलांना बँक वा रुग्णालयात बुरखा घालून जाण्यावर बंदी, बळजबरीने मजुरी करवून घेणे, अशाप्रकारच्या छळाचा समावेश होतो. चीनने मात्र संयुक्त राष्ट्रांनी केलेले आरोप नाकारले असून यातून आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे त्या देशाने म्हटले आहे. तथापि, चीनने उघूर मुस्लिमांवर जुलूम जबरदस्ती केल्याच्या बातम्या आजच्या नाहीत.
 
गेल्या अनेक वर्षांपासून चीन उघूर मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचे विविध माध्यम संस्थांनी म्हटलेले आहे. मात्र, चीनसारख्या पोलादी हुकूमशाही असलेल्या देशांत नेमके काय चालते, हेच सहजासहजी बाहेर येत नाही. तिथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही लवकर प्रवेश मिळत नाही वा प्रवेश मिळाला तरी प्रकाशित होणारा मजकूर चिनी राज्यकर्त्यांच्या मर्जीनुसारच असतो. संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले. गेल्या अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या यासंबंधीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. आता तो अहवाल समोर आला आणि चीन वगळता स्वतःला मानवाधिकारवादी, उदारमतवादी वगैरे म्हणवून घेणार्‍या देशांमध्ये खळबळ माजली. पण, त्याने होणार काय, तर काहीच नाही. कारण, आज वर उल्लेख केलेली विशेषणे स्वतःला चिकटवून घेणारे देश चीनवर बर्‍यापैकी अवलंबून आहेत. त्यामुळे केवळ निषेधाचे दोन शब्द उघूरांच्या वाट्याला येतील अन् त्यांच्या यातना त्यात विरुन जातील.
 
चीनने उघूर मुस्लिमांना छळछावण्यांमध्ये ठेवण्यामागचे कारण फुटीरतावाद असल्याचे म्हटले जाते. उघूर मुस्लीम मूळचे मध्य-पूर्व आशियातील रहिवासी असून ते तुर्क वंशाचे आहेत. त्यांची भाषा तुर्की आहे. उघूर मुस्लिमांची चीनमधून बाहेर पडून स्वतंत्र देश स्थापन करण्याची इच्छा आहे. चीन मात्र आपल्या देशात फुटीरतावाद अजिबात सहन करु शकत नाही. आजचा चीन पूर्वीच्या काळात अस्तित्वात असलेल्या अनेक देशांच्या एकत्रिकरणातून आकाराला आलेला आहे. आजही चीन शेजारी देशांचा भूप्रदेश आणि सागरी प्रदेश बळकावण्यासाठी दादागिरी करतच असतो. काही महिन्यांपूर्वी चीनने हाँगकाँगवर पूर्ण कब्जा केला, तर आता चीन तैवानला गिळंकृत करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्याने लष्करी सरावासह तैवानच्या हद्दीत प्रवेश करणे, क्षेपणास्त्र डागण्याचे उद्योगही केले.
 
तो चीन एखादा मानवी समूह आपल्यापासून फुटून निघून स्वतंत्र देश स्थापन करण्याची मनीषा बाळगत असेल तर त्याला चिरडणारच. तिबेटींबाबत चीनने तसेच केले. त्यांचीही स्वातंत्र्याकांक्षा होती व आहे. पण, चीनने त्यांच्यावर कमालीचे अत्याचार केले, त्यांच्या वंशाच्या मुलींशी हान वंशीय मुलांची लग्ने लावली, जेणेकरुन जन्माला येणारी संतती चीनशी एकनिष्ठ राहील. चीन आता उघूरांबाबतही तसेच करत आहे. तिथेही अन्य अन्यायाबरोबरच उघूरांच्या कुटुंब नियोजन आणि मुले जन्माला घालण्याबाबत भेदभावच केला जातो. पण, यात उघूर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील, असे म्हणता येत नाही. म्हणजे, जगभरच्या मुस्लीम देशांचा विचार करता, त्यातली अगदी अपवादात्मक राष्ट्रे शांत, स्थिर आहेत, तर उर्वरित देशांत अशांतता, अस्थैर्यच असल्याचे दिसते.
 
तसे करणार्‍यांना धर्मांध मुस्लीम, कट्टरपंथी मुस्लीम, मूलतत्त्ववादी मुस्लीम वगैरे वगैरे म्हटले जाते अन् त्यांच्या संघटनांनी ‘इसिस’, ‘अल-कायदा’, ‘बोको हराम’ आदी नावे धारण केलेली आहेत. जिहादी, दहशतवादी हल्ले करण्यातून जन्नतचा मार्ग जातो, असे त्यांना वाटते. याव्यतिरिक्त याच मुस्लीम देशांतून, याच संघटनांच्या जाचाला कंटाळून युरोपात आश्रय घेतलेले लाखोंच्या संख्येने मुस्लीम आहेत. पण, त्यांनी तिथे जाऊन काय केले? ज्या देशांनी आपल्याला आश्रय दिला, त्याच देशांतले नियम, कायदे पायदळी तुडवायचे, तिथली संस्कृती नाकारायची, तिथेही शरिया कायद्यासाठी हिंसक आंदोलने करायची, हाच प्रकार त्यांनी केला. त्यामुळे आज अनेक युरोपीय देशांतली शांतता, स्थानिक समाज धोक्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरही उघूरांकडे पाहिले पाहिजे.
 
पुढचा मुद्दा, मुस्लीम राष्ट्रांच्या मौनाचा आहे. गेली कित्येक वर्षे काश्मिरात मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जातो. त्याला इतरही मुस्लीम देशांनी पाठिंबा दिला होता. पण, भारतात मोदी सरकार आल्यापासून काश्मीरवर पाकिस्तान, तुर्की वगळता अन्य मुस्लीम देश बोलताना दिसत नाही. पण, हे दोन्ही देशही उघूरांवरील चिनी अत्याचारावर तोंड उघडत नाहीत. मुस्लीम देशांची ‘ओआयसी’ संघटनाही त्यावर चिडीचूप आहे. कारण, त्यांना इथे धर्मापेक्षाही चिनी गुंतवणूक हवी आहे, चीनने खनिज तेलाची आयात करावी आणि आपली तिजोरी भरावी, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजेच, या देशांनी अर्थापुढे धर्म फिकाच असल्याचे दाखवून दिले आहे.
 
त्याचबरोबर इस्लामी दहशतवादी संघटना, ‘इस्लाम खतरे में’ची बांग देणारे, ‘सर तन से जुदा’वाल्या टोळ्याही चीनमधील उघूर मुस्लिमांच्या छळावर शब्दही उच्चारताना दिसत नाहीत. त्यांचे सगळे चाळे भारतासारख्या लोकशाही देशांतच चालतात, चीनमध्ये त्यांनी असे काही करण्याचे ठरवले तर त्यांचे नामोनिशाणही राहणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. त्यांच्याबरोबरच ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ वा भारतासमोर मानवाधिकाराची, धर्मस्वातंत्र्याची पोपटपंची करणारेही चीनविरोधात शांतच असतात. त्याचेही कारण अर्थ अन् चिनी हुकूमशाहीची भीती हेच आहे. यावरुनच या सगळ्यांचा ढोंगीपणा दिसून येतो. जिथे फायदा असेल तिथे कितीही अत्याचार झाला तरी गप्प बसायचे अन् इतरत्र जिभ चालवायची, असे त्यांचे काम आहे. पण, यातून ना मुस्लिमांचे भले होईल ना उघूर चिनी तडाख्यातून वाचतील.
Powered By Sangraha 9.0