महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शिकवला जाणार शेती विषय ; कृषी मंत्री अब्दुल सत्तार

17 Sep 2022 12:17:57

 
मुंबई  : महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाणार आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा एका धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली आहे. सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. यामागचा हेतू असा असेल कि , भविष्यात नोकरी जरी नाही लागली तरी शेती विषयात विद्यार्थी निपुण असतील या निर्णयामुळं शेती सुधारेल पर्यायनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील असेही सत्तार म्हणाले.
 
 
 
sattar
 
 
अत्याधुनिक शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढेल यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासून शेती हा विषय शिकविण्याचे नियोजन केले आहे. शेतीचे धडे गिरविण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावांमध्ये असलेल्या सरकारी जागा दिल्या जाणार आहेत. शिक्षकांनासुद्धा काही दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे ते म्हणाले. बहुतेक मुले-मुली ही शेतकर्‍यांची असतात. ही मुले पदवीधर झाल्यानंतर सगळ्यांनाच नोकर्‍या लागत नाहीत. त्यांना वडिलोपार्जित शेतीचा धंदा समजावा यासाठी इयत्ता पाचवीपासूनच शेतीचा विषय शिकविला जाणार आहे, असे ते Abdul Sattar म्हणाले.
 
शेतात फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी-म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या गोष्टी लहानपणापासूनच शिकविल्या तर याचे परिणाम भविष्यात चांगले दिसतील. शिक्षकांना जर यासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले तर, ते विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवतील, असे कृषिमंत्री म्हणाले. दरम्यान, यासबंधीची सर्व माहिती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्र्यांना दाखवू. त्यांचे समाधान झाले तर, शिक्षणमंत्री यामध्ये शेतीविषयक एक तास कसा घेता येईल याबाबतचा निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. अभ्यासक‘म तयार करण्यासाठी कृषी विभागाचे दोन तसेच शिक्षण विभागाचे दोन अशा चार व्यक्तींची समिती तयार केली जाईल. ही समिती चारही बाजूने अभ्यास करेल. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे Abdul Sattar त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0