पार्थ कपोले
काँग्रेसने ‘भारत जोडो’नामक यात्रा सुरू केली आहे. मात्र, यामुळे काँग्रेसचे संघटन किती कमकुवत झाले आहे, ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. कारण, ही यात्रा यशस्वी होण्यासाठी काँग्रेसने ‘प्रोफेशनल अराजकतावादी’ अशी ओळख असलेल्या योगेंद्र यादव आणि त्यांच्या साथीदारांची मदत घेतली आहे. मोठमोठ्या कंटेनरचे रुपांतर एसी असलेल्या आलिशान खोल्यांमध्ये करण्यात आले असून हे सर्व ‘आंदोलनजीवी’ या कंटेनर्समध्ये बसून प्रवास पूर्ण करणार आहेत.
"आज तुम्ही-आम्ही जे काही आहोत, ते केवळ संघटनेमुळे आहोत. सरकारदेखील संघटनेमुळेच आहे. त्यामुळे संघटनेस आणि संघटनकार्यास सर्वोच्चप्राधान्य द्यावेच लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावावर कोणीही जिंकू शकतो, पण जर जमिनीवर संघटना नसेल तर त्याचा फायदा आपल्याला घेता येणार नाही....” भाजपच्या दिल्लीतल्या पं. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरच्या मुख्यालयात नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकीमध्ये देशाचे विद्यमान गृह व सहकारमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्यांना अतिशय स्पष्ट शब्दांत सांगत होते.
अर्थात, भाजपच्या राजकीय व्यवस्थेशी परिचित असलेल्यांना याविषयी आश्चर्य वाटणार नाही. कारण, संघटनेस सर्वोच्च प्राधान्य देणे हीच भाजपची सुरुवातीपासूनची कार्यशैली. मात्र, आता देशात आठ वर्षांपासून असलेली सत्ता आणि देशातील अनेक राज्यांमध्ये सत्ता असूनही भाजपने संघटनेस शैथिल्य येऊ दिले नाही. यामध्ये भाजपच्या सातत्यपूर्ण विजयांचे सार आहे. त्यामुळे संघटनेच्या बाबतीत अतिशय कर्तव्यकठोर असलेल्या भाजपचा सामना विस्कळीत झालेला आणि कुटुंबाला शरण गेलेला काँग्रेस पक्ष जर ‘कंटेनर यात्रा’ काढून करणार असेल, तर पुन्हा एकदा 2024 साली काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागण्याची शक्यता आहे.
भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या कार्यशैलीचा विचार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला, तर सध्या दोन्ही पक्षांचे काही पक्षांतर्गत उपक्रम-बदल सुरू आहेत. भाजपमध्ये राज्य प्रभारी, सहप्रभारी, निवडणूक प्रभारी, सचिव, महासचिव, केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा-बैठका सुरू आहेत. सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात आले आहेत. त्याचवेळी काँग्रेसमध्येही पक्षांतर्गत निवडणुका होत असून पुढील महिन्यात अध्यक्षपदाची निवडणूक प्रस्तावित आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाने ‘भारत जोडो’नामक यात्रा सुरू केली आहे. मात्र, या यात्रेमुळे काँग्रेस पक्षाचे संघटन किती कमकुवत झाले आहे, ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
कारण, ही यात्रा यशस्वी होण्यासाठी काँग्रेसने ‘प्रोफेशनल अराजकतावादी’ अशी ओळख असलेल्या योगेंद्र यादव आणि त्यांच्या साथीदारांची मदत घेतली आहे. मोठमोठ्या कंटेनरचे रुपांतर वातानुकूलन यंत्रे (एसी) असलेल्या आलिशान अशा खोल्यांमध्ये करण्यात आले असून हे सर्व ‘आंदोलनजीवी’ या कंटेनर्समध्ये बसून प्रवास पूर्ण करणार आहेत. यात्रेच्या प्रारंभीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांचा हा टी-शर्ट 40 हजारांपेक्षाही जास्त रकमेचा असल्याचा दावा भाजपने केला. त्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्यांपासून ते समाजमाध्यमांवरील भाट, अशा सर्वांना या कथितरित्या महागड्या टी-शर्टचे समर्थन करावे लागत आहे. त्यामुळे भाजपचा बाण योग्य जागी लागल्याची चर्चा आता रंगली आहे, तर सध्या देशातल्या दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या बदलांच्या वार्यांनी 2024ची दिशा ठरणार आहे.
त्यापैकी संघटनात्मकदृष्ट्या विचार केल्यास काँग्रेस त्यामध्ये मागे आहे. पक्षाचे एकेकाळचे देशव्यापी संघटन आज उद्ध्वस्त झाले असून जागोजागी गांधी कुटुंबाचे निष्ठावंत बसले अथवा बसवले गेले आहेत. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा एकेकाळचे कुटुंबाचे निष्ठावंत गुलाम नबी आझाद यांनी करून नुकताच पक्ष सोडला आहे. आझाद यांचा हात धरून पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, शशी थरूर हे निष्ठावंतदेखील अधूनमधून आपली नाराजी व्यक्त करत असतात. पक्षातील सर्व नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना असल्यानेच निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसला आंदोलनजीवींची साथ घ्यावी लागत आहे. अर्थात, त्यामागे केवळ हेच एकमेव कारण नाही. राहुल गांधी यांनी या वर्षाच्या प्रारंभी लोकसभेत बोलताना ‘भारत हे राष्ट्र नाही’ अशी धक्कादायक मांडणी केली होती.
योगेंद्र यादव आणि मंडळींनी त्याचीच री अनेकदा ओढली आहे. दिल्लीतील ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’विरोधातील दंगल असो किंवा कथित शेतकरी आंदोलनातली दंगल असो, त्यामागे राहुल गांधी यांनी मांडलेलीच भूमिका होती. त्यामुळे काँग्रेसचे हे असे ‘आऊटसोर्सिंग’ आणि ‘कंटेनर यात्रा’ 2024 साली विजय मिळवून देईल, असा काँग्रेसचा आणि समर्थकांचा दावा असल्यास देशात अराजकताच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या यात्रेनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा फार्स होईल आणि त्यामध्ये पुन्हा एकदा गांधी कुटुंबातील व्यक्ती अथवा गांधी कुटुंबाचे पूर्ण वर्चस्व असलेल्या व्यक्तीची नियुक्ती होईल.
त्याचवेळी भाजप अतिशय नियोजनबद्धपणे ‘मिशन 2024’च्या तयारीस लागली आहे. ‘मिशन 2024’ अंतर्गत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत 144 लोकसभा जागांवर पक्ष आणखी मजबूत करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. या अशा जागा आहेत जेथे पक्षाला 2019 साली अतिशय कमी फरकाने पराभव पत्करावा लागला होता. या बैठकीमध्ये अशा जागांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच 2019 साली गमाविलेल्या 50 टक्के जागा जिंकण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या मतदारसंघांची जबाबदारी विविध केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये मंत्र्यांकडे असलेल्या मतदारसंघांतील त्यांच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला.
या 144 मतदारसंघांमध्ये विविध पक्षातील दिग्गजांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. ज्यांना 2014 आणि 2019 साली आपले मतदारसंघ राखण्यात यश आले होते. त्यासाठी पक्षसंघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील 69 जणांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती पक्षातील एका वरिष्ठ महासचिवांनी दिली. भाजपने 2019 साली अमेठी येथून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा पराभव करून काँग्रेसला जोरदार धक्का दिला होता. त्याचीच मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा मानस असल्याचे समजते. त्यामध्ये सोनिया गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ, सुप्रिया सुळे यांचा बारामती, मनीष तिवारी यांचा आनंदपूरसाहिब, अधीररंजन चौधरी यांचा बहरामपूर, कार्ति चिदंबरम यांचा शिवगंगा, शशी थरूर यांचा तिरुअनंतपुरम या मतदारसंघांचा समावेश असल्याचे समजते.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याद्वारे स्पष्ट झाला आहे. एकीकडे भाजप आपले संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सतत कार्यरत आहे, तर काँग्रेस पक्षांतील लाथाळ्या संपविण्याऐवजी पक्षाबाहेरील लोकांच्या साथीने कंटेनरमध्ये यात्रा करण्यात व्यस्त आहे.