विवाह सोहळ्याचे स्टिकर्स लावून जालना शहरात केला प्रवेश
जालना : शहरात आयकर विभागाने छापेमारीसाठी एक आगळी वेगळी शक्कल लढविली आहे. राहूल - अंजली असे फलक लावलेली सुमारे शंभरहून अधिक वाहनं बुधवारपासून फिरत आहेत. ही वाहनं काेणत्याही लग्न समारंभासाठी आली नव्हती तर आयकर चुकविणा-या व्यापा-यांवर कारवाई करण्यासाठी आली हाेती. या फिल्मी स्टाईल छाप्यांची माहिती व्यापारी वर्गातच पाेहचताच अनेकांचे दाबे दणाणल्याची चर्चा जालन्यातील बाजारपेठेत रंगली आहे.
जालना शहरातील औद्योगीक वसाहतीत असलेल्या नामकीत स्टील कंपनी व दहा ते बारा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाच्या १९० हुनअधिक अधिकाऱ्यांनी वाहनांवर विवाह समारंभाचे स्टिकर लावून बुधवारी सकाळपासून छापेमारी सुरू केल्याने व्यापारी वर्गात एकच खबळ उडाली आहे.
गेल्या सव्वीस तासांपासून ही छापेमारी सुरू असल्याने या छाप्यातून नेमके काय हाती आले, हे अद्याप समजून शकले नाही. दरम्यान आयकर विभागाला बॅन अकाउंटसह पक्की टीप देण्यात आल्याने ही कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये मुंबई, नाशिक, पुणे, नगर यासह औरंगाबाद येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सामावेश असल्याचे समजते.
विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी १०० हुन अधिक चार चाकी वाहनातून वाहनांवर विवाह सोहळ्याचे बॅनर लावून जालन्यात दाखल झाले. ज्या व्यावसायिक आणि घरावर छापे टाकायचे त्या त्या ठिकाणीच ही शंभरहून अधिक वाहन कुणाला काहीही न विचारता पोहचली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
मराठवाड्यातील सर्वात मोठी कारवाई
आत्ता पर्यंतची मराठवाड्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातं आहे. या कारवाईच कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलं नसले तरी या पथकाने जिंदल मार्केटमधील तीन दुकानां सील ठाेकलं आहे. तसेच सील केलेल्या दुकानांना स्टिकर चिकटविण्यात आले आहेत. तर दुसरीकडे उत्पादन आणि विक्री याबाबतच्या नोंदी तपासल्या जात असून बँकांमधील झालेले व्यवहार तपासले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
.
राहुल - अंजली स्टीकर
जालना शहरात शंभूरहुन अधिक वाहनातून हे अधिकारी राहुल-अंजली असे विवाह स्टिकर लावलेल्या गाड्यातून दाखल झाल्याने कुणाच्या तरी विवाह सोहळ्यासाठी या गाड्या आल्या असल्याचं अंदाज लावल्या जात असल्याने कुणाला ही शंका आली नाही. मात्र श्रावण महिन्यात विवाह तारखांच प्रमाण कमी असल्याने शहरातील नागरिक अचंबित झाले होते. हे दिलवाले विवाह सोहळ्यासाठी नाही तर धाडी सोहळ्यासाठी आल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.