जळगाव- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेला शुक्रवापासून सुरुवात झाली. एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातून गेल्या दोन दिवसात ७५ वर्षेवयोगटावरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’व्दारे दोन हजार एकोणसाठ ज्येष्ठ नागरिकांनी लालपरी म्हणजे एसटी बसमधून मोफत प्रवास केला.
‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली. जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात येणार्या जाणार्या बसमध्ये ७५ वर्षे वयोगटातील बहुतांश प्रवासी ६० ते ६५ वर्षे वयोगटातील अर्धे तिकीट तसेच ७५ वर्षे वयोगटातील लाभार्थी असल्याचे बरेचसे वाहकांनी सांगीतले.
चाळीसगाव तालुक्यात सर्वात जास्त ३२१ ज्येष्ठ नागरिक प्रवासी
गेल्या दोन दिवसांत जळगाव- २५३, यावल-१८३, चाळीसगाव-३२१, अमळनेर-१७८, चोपडा-२६३, जामनेर-१८६, रावेर-७९, पाचोरा-१६९, भुसावळ-१००, एरंडोल-१४४ अशा एकूण २०५९ ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत सवलत प्रवास योजनेचा लाभ घेतला.
राज्य शासनातर्फे ७५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास सवलतीची अंमलबजावणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान आधार, पॅन, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, पारपत्र तसेच केंद्र, राज्य शासनातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत लागू आहे. हि सवलत राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेस मध्ये महाराष्ट्र राज्य हद्दीत लागू आहे.
भगवान जगनोर,
एसटी महामंडळ, जळगाव विभाग प्रमुख