दुर्दैवी : रविवार, सुट्टीचा दिवस ठरला विक्रांतसाठी काळ ! मेहरूण ट्रॅक वरील घटना

29 Aug 2022 12:44:59
 
जळगाव: रविवारी सुटीचा दिवस होता. यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी मेहरुण ट्रॅकवर सायकलिंगचा आनंद घेणाऱ्या अकरा वर्षीय बालकाला सुसाट कारने चिरडल्याची (Accident) घटना रविवारी (ता. २८) घडली. विक्रांत संतोष मिश्रा असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. शहरातील मेहरूण टॅक नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे दररोज तरुण भरधाव वेगाने वाहने पळवीत असतात. रविवारी चुलत भावासह ट्रॅकवर सायकलने फिरत असलेल्या ११ वर्षीय मुलाला रेस लावलेल्या कारने उडविल्याची दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील कारमधील तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 

res1 
 
 
 
विक्रांत मिश्रा हा वडील संतोष गिरीजाशंकर मिश्रा आई रिचा यांच्यासोबत वास्तव्याला आहे. विक्रांत हा मेहरूण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. दि.२८ रोजी रविवार असल्याने विक्रांतला शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्याने दुपारी ३ वाजेच्या सुमारास विक्रांत घरापासून जवळ असलेल्या मेहरूण ट्रॅकवर काकाचा मुलगा सुनिल जितेंद्र मिश्रा याच्यासोबत फिरायला गेला होता.

दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास एका मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये रेस लावण्यात आली होती. या रेसमधील कार क्रमांक एमएच.१९.बीयू.६००६ ने विक्रांतला जोरदार धडक दिली. या धडकेत विक्रांतचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की, विक्रांतची सायकल चक्काचूर झाली होती. विक्रांत चेडूंसारखा १२ ते १५ फूटवर उडाला होता. आणि त्याची सायकल झाडावर अडकली होती. घटना घडल्यानंतर जवळल्या नागरीकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांनी मयत घोषीत केले.

घटनेमुळे परिसरासह रुग्णालयात सुन्न वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा रूग्णाालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गुन्ह्यातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यााचे काम सुरू होते. मयत मुलाच्या पश्चात आई रिचा आणि वडील संतोष गिरीजाप्रसाद मिश्रा असा परिवार आहे. संतोष मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात तर त्यांचा डी.जे. रिपेअरींगचा व्यवसाय आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने मिश्रा परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Powered By Sangraha 9.0