निलंबनाचा आठवडा : सीईओंच्या कारवाईने कामचुकारांना चाप!

    दिनांक : 29-Aug-2022
Total Views |
जिल्ह्यातील 5 जिल्हा परिषद कर्मचारी निलंबित; 15 कर्मचार्‍यांना नोटिसा
 
 
ZP Rokthok
 
जळगाव : जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी प्रशासकीय कामात दिरंगाई आणि कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई सत्र सुरू केले आहे. आठवडाभराच्या कालावधीत कामातील दिरंगाईप्रकरणी त्यांनी 4 ग्रामसेवकासह जि.प.मुख्यालयातील एका कर्मचार्‍यास निलंबित केले आहे. जि.प.च्या कर्मचार्‍यांमध्ये या कारवाईने धडकी भरली आहे. परिणामी कामचुकार कर्मचार्‍यांना एकप्रकारे सीईओंनी झटका दिला आहे. त्यामुळे हा आठवडा निलंबनाचा आठवडा ठरला आहे.
 
ZP4
 
जिल्हा परिषदेत सीईओंनी 19 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागास अचानक भेटी देऊन याठिकाणच्या कर्मचार्‍यांच्या कामकाजाच्या नोंदीसह कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी या विभागातील बहुतांश कर्मचारी जागेवर नव्हते. त्यात काहींच्या मस्टरवर स्वाक्षर्‍या नव्हत्या. त्यात दोन अधिक्षक व एका कक्ष अधिकार्‍यांसह 15 कर्मचार्‍यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. याच विभागातील कनिष्ठ सहाय्यक नदीम बेग मिर्झा यास निलंबित करून त्याची मुक्ताईनगर येथे बदली करण्यात आली होती.
 

ZP3 
 
त्यानंतर सीईओंनी धरणगाव 25 ऑगस्ट रोजी धरणगाव पंचायत समितीत कामकाजाचा आढावा घेतला होता. त्याठिकाणी दफ्तर तपासणी केली होती. त्यात स्वच्छ भारत मिशन व घरकुलचे उद्दीष्ट पूर्ती न करणार्‍या आर.डी.पवार, बी.डी.बागूल या दोघांवर निलंबनाची कारवाई केली. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सीईओंनी जळगाव पंचायतीत कामकाजाचा आढावा घेतला. त्यात स्वच्छ भारत मिशन, जळगाव तालुक्यातील घरकुल योजना यांचे उद्दीष्ट पूर्ती न करणारे उमाळे येथील ग्रामसेवक किरण लंके, धानवड येथील ग्रामसेवक सुनिल चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत 26 रोजी आदेश काढले.

ZP1 
 
जिल्ह्यात आठवडाभरात त्यांनी धरणगाव, जळगाव पंचायत समितीतील प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात व केंद्र शासनच्या योजनांचा आढावा घेतला. कामात दिरंगाई करणार्‍या कर्मचार्‍यांची कुठलीही गय केली नाही. सीईओंच्या या कारवाईचे परिणामी जिल्हाभरातील यंत्रणेवर झाला असून यंत्रणेतील काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या कामास वेग आला आहे. कामास गती आल्याने प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली आहे.
 

ZP2