गुलाम नबींची आझादी

27 Aug 2022 10:40:17



वेध


काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे कद्दावर नेता Ghulam Nabi Azad गुलाम नबी आझाद यांनी अ. भा. काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला होता.

 
 
 
gulam

 

 
 
त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसच्या सर्व पद व प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे आता 'आझाद' गुलाम नबींनी काँग्रेसला खुदा हाफीज केल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय अपेक्षित होता. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेते किंवा हायकमांडला ते असे काही पाऊल उचलतील, असे वाटत नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
 

वास्तविक, राज्यसभेतील त्यांच्या निवृत्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याविषयी केलेल्या गौरवास्पद वक्तव्यानंतर काँग्रेस त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठविणार नसल्याचे निश्चित मानले जात होते; झालेही तसेच. काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पुन्हा पाठविण्याची तयारी दाखविली नाही. तरीही, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्याची विनंती जी-23 गटाच्या माध्यमातून केली होती. तसे झाल्यास पक्षाच्या प्रमुखपदी आपली निवड, नियुक्ती होऊ शकेल, असे त्यांना वाटले होते. पण, काँग्रेसने पक्षांतर्गत निवडणुकांबाबत काहीही निर्णय न घेता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त काल प्रसार माध्यमातून झळकले आणि Ghulam Nabi Azad गुलाम नबींच्या आशेवर पाणी फेरले. त्यामुळे काँग्रेसचा त्याग करून 'आझाद' होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज त्यांनी काँग्रेसला खुदा हाफीज म्हटले.

 

1973 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जम्मू-काश्मीरचे ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री, राज्यसभेत पक्षनेता, विरोधी पक्षनेतेपद भूषविले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात ते पक्षाच्या कोअर कमेटीमध्ये होते. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधींना पक्षात आणणे. राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. गांधी परिवाराच्या ते नेहमी जवळ राहिले. पण, राजाची तिसरी पिढी राज्य गमावते, असे म्हटले जाते. इतिहासात त्याचे दाखलेदेखील सापडतात. काँग्रेस आणि Ghulam Nabi Azad आझाद यांच्याबाबतीतही तेच झाले. इंदिरा गांधींच्या वेळी त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेले काम राजीव गांधी यांना माहीत होते. त्यामुळे इंदिराजींनंतर राजीव गांधींनी त्यांना आपल्या सल्लागार मंडळात ठेवले. सोनियाजींनादेखील ते माहीत होते. त्यामुळे त्यांना त्यांनी अंतर दिले नाही. पण, राहुल गांधींना याची तेवढी जाणीव नसावी. त्यांनी युवकांना संधी देण्याच्या प्रयत्नात ज्येष्ठांना बाजूला केले. त्यात आझाद अडगळीत फेकले गेले. आता आपली पक्षातील किंमत संपली, हे त्यांनी ओळखले आणि आज त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी पक्षात बालिशपणा किंवा बाचकळपणा वाढला आहे. पंतप्रधानांचादेखील अपमान केला गेला. पक्ष रिमोट कंट्रोलवर चालविला जात आहे. काँग्रेसची स्थिती अत्यंत खिळखिळी झाली आहे. पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकणार नाही. ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात आहे इत्यादी दहा कारणे दिली.

 

याला खासदार राहुल गांधी जबाबदार असून त्यांचे स्वीय सहायक व संरक्षक पक्ष चालवित असल्याचे त्यांनी त्यांच्या राजीनामापत्रात म्हटले आहे. त्यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील व जी-23 मधील अनेक नेतेदेखील काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, जम्मू-काश्मीरमधील माजी आमदार मो. अमिन भट यांनी आजच राजीनामा दिला आहे. कपिल सिब्बल यांनी यापूर्वीच समाजवादी पक्षातून राज्यसभेत खासदारकी मिळविली आहे. Ghulam Nabi Azad आझाद हे काँग्रेसचे नेते असले, तरीही त्यांनी जम्मू-काश्मीरमधील अलगाववादी गटांशी कधीच जवळीक ठेवली नाही.

 
राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या पक्षकार्यामुळेच त्यांना काँग्रेसने वाशीम येथून खासदार केले होते. याची जाणीव त्यांना आजही आहे. आता गुलाम नबी काँग्रेसमधून आझाद झाले आहेत. बघूया त्यांच्या सोबत आणखी कोणकोणते नेते काँग्रेसचे जोखड झुगारतात. त्यानंतर काँग्रेस त्यातून सावरण्यासाठी काय करते. मात्र, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचा देखावा केला जातो. पण, प्रत्यक्षात एकाच घराण्याची हुकूमत चालते. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांचे नाव जरी चर्चेत असले, तरीही तो केवळ देखावा असू शकतो. शेवटी गांधी-नेहरू घराण्याशिवाय कार्यकर्त्यांना इतरांचे नेतृत्व मान्य होत नाही. त्यामुळे नाईजास्तव राहुल गांधी यांनाच पक्षाध्यक्ष केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघूया पुढे काय होते ते!
 
- विजय कुळकर्णी
 

- 8806006149

Powered By Sangraha 9.0