टीईटी घोटाळा ; जळगावातील ८५ शिक्षकांच्या बोगस मान्यता रद्द

25 Aug 2022 16:48:07
जळगाव: जळगाव जिल्ह्यातल्या शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकारणे समोर आलेले आहेत. राज्यभरात चर्चेत असंलेल्या टिईटी घोटाळ्याची पाळेमुळे जिल्ह्यात रूजलेली असून अलीकडेच याच प्रकरणात ७१ शिक्षकांचे वेतन रोखण्यात आलेले आहे. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता बोगस शिक्षण मान्यतेतही जळगावचे नाव आले आहे.


scam1 
एकीकडे टिईटी घोटाळ्यात जळगावातील शिक्षकांचा समावेश निष्पन्न झाला असतांनाच आता तब्बल ८५ शिक्षकांच्या बोगस मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 
शिक्षक मान्यता अर्थात ऍप्रुव्हलमध्ये मोठा गैरव्यवहार होत असतो. यात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे आरोप करण्यात येतात. या अनुषंगाने नुकतेच यातील मोठे प्रकरण समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यात २०१५ ते २०१९ या कालखंडात एकूण साडेसातशे शिक्षकांना मान्यता प्रदान करण्यात आली होती. यातील अनेक शिक्षकांनी निकष पूर्ण न करतांनाही त्यांना ऍप्रुव्हल देण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित केला होता.
 
या मागणीनंतर संशयास्पद वाटणार्‍या ३०० शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली. यातील तब्बल ८५ शिक्षकांची मान्यता बोगस आढळून आल्याने रद्द करण्यात आली आहे. नाशिक येथील शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0