‘इंटेलिजंट आयओटी सेन्सर्स’मधील उत्कृष्टता केंद्र

25 Aug 2022 11:10:48
दळणवळण तंत्रज्ञान आणि डिजिटल संपर्क प्रणालीच्या प्रगतीमुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) ही संकल्पना अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचलित होऊ लागली आहे. ‘आयओटी’च्या माध्यमातून जोडलेल्या उपकरणांच्या मदतीने जगातील कोणत्याही भागातून कोणत्याही प्रणालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. त्याविषयी सविस्तर...
 
 
 

iot 
 
 
सध्याच्या अत्यंत स्पर्धात्मक इलेक्ट्रॉनिक्स आणि ‘आयसीटी’ क्षेत्रात किफायतशीर, वेगवान आणि आकाराने लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्याचे आव्हान उत्पादकांसमोर असते. या आव्हानांना तोंड देण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञान यांचा विकास हा एक महत्त्वाचा पैलू आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान उद्योगात नवीन सामग्रीची निर्मिती करण्याची क्षमता अतिशय महत्त्वाची आहे आणि सातत्यपूर्ण तांत्रिक प्रगतीचा हा महत्त्वाचा घटक देखील आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला भारताकडून पाठबळ पुरवण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
 
दळणवळण तंत्रज्ञान आणि डिजिटल संपर्क प्रणालीच्या प्रगतीमुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) ही संकल्पना अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचलित होऊ लागली आहे. ‘आयओटी’च्या माध्यमातून जोडलेल्या उपकरणांच्या मदतीने जगातील कोणत्याही भागातून कोणत्याही प्रणालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. ‘आयओटी’ प्रणालीमधील अतिशय महत्त्वाच्या घटकांमध्ये सेन्सर्सचा समावेश होतो.
 
आरोग्य निगा, पर्यावरण आणि कृषी, उत्पादन, ऊर्जा व्यवस्थापन, होम ऑटोमेशन, स्मार्ट सिटीज, लष्करी आणि अंतराळ क्षेत्र, परिवहन अशा विविध क्षेत्रांमध्ये ‘आयओटी’ सेन्सर्सचा वापर अत्यावश्यक झाला आहे. ‘आयओटी’ सेन्सर्सचे, ‘लाईट सेन्सर्स’, ‘ऍक्सलरोमीटर’, ‘पोझिशन सेन्सर्स’, ‘टेंपरेचर सेन्सर्स’, ‘प्रॉक्सिमिटी सेन्सर्स’, ‘ह्युमिडिटी सेन्सर्स’, ‘प्रेशर सेन्सर्स’, ‘इन्फ्रारेड सेन्सर्स’, ‘केमिकल सेन्सर्स’, ‘गॅस सेन्सर्स’, ‘गायरोस्कोप’ इ. विविध प्रकार एकंदरच विविध क्षेत्रांमध्ये वापरासाठी आवश्यक असतात. जागतिक बाजारात ‘इंडस्ट्रियल सेन्सर्स’मध्ये भारतासह आशिया-प्रशांत क्षेत्राचा 51 टक्के वाटा आहे.
 
पार्श्वभूमी
 
जागतिक पातळीवर ‘इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाईन’ आणि उत्पादनाच्या बाजारपेठेचे आकारमान दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या भारतीय बाजारपेठेचे मूल्य 120 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे आणि 2018-19 मधील सुमारे 8.8 अब्ज डॉलरच्या निर्यातीमुळे सकल देशांतर्गत उत्पादनात(जीडीपी) तिचे 2.5 टक्के योगदान आहे आणि त्यामध्ये 13 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या वाढीमागे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) हा प्रमुख कारक घटकांपैकी एक असून, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत त्याला चालना मिळाली आहे.
 
पुढील काही वर्षांमध्ये बहुधा 2025 पर्यंत भारतातील ‘इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाईन’ आणि उत्पादन क्षेत्र 130 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या स्थानिक उत्पादन उद्योग गरजेच्या केवळ 30 टक्के योगदान देत आहेत आणि उर्वरित गरज आयातीद्वारे भागवली जात आहे. ही बाब विचारात घेतली, तर ‘आत्मनिर्भर भारता’च्या राष्ट्रीय धोरणाला अनुसरून भारतामध्ये उद्योगांच्या शाश्वत विकासाकरिता रचना आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतांसह ‘आयओटी सेन्सर्स’ची उत्पादन परिसंस्था विकसित करणे अतिशय गरजेचे आहे.
 
भारतीय सेन्सर्स बाजारपेठ स्वयंपूर्ण आणि जागतिक उद्योगांना आकर्षित करणारी बनवण्यासाठी आणि तिचे ब्रॅ्रण्डिंग करण्यासाठी आम्ही ‘उत्कृष्टता केंद्र’(सीओई) स्थापन करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत ‘इंटेलिजेन्ट इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) सेन्सर्सवर विशेषत्वाने भर दिला जाईल. आतापर्यंत भारतातील बहुसंख्य कंपन्या सेन्सर्सचा वापर डेटा संकलनासाठी करत असतात आणि डेटा ट्रान्स्मिशनमध्ये कोणत्याही ‘इन बिल्ट इंटेलिजेंट प्रोससिंग’चा अभाव असतो. मात्र, ‘इंडस्ट्री 4.0’चा प्रवेश झाल्यापासून ‘इंटेलिजेंट सेन्सर्स’च्या वापरात वाढ झाली आहे आणि यापैकी बर्‍याच सेन्सर्सना स्वयं-सुधारणा युनिट्सची आणि ‘इंटेलिजेन्ट डेटा प्रोसेसिंग’चे सेन्सर नोड्समध्ये ऑफलोडिंग करण्याची गरज असते. उद्योगांमध्ये याला मोठ्या प्रमाणावर असलेल्या मागणीमुळे ही अतिशय झपाट्याने वाढणारी बाजारपेठ आहे, असे आम्हाला वाटते.
‘आयआयओटी’मधील ‘उत्कृष्टता केंद्र’ (सीओई)
 
केरळमधील त्रिसूरच्या ‘सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी’ (कॅमेट) आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’- केरळ (आयआयटीएमएके), त्रिवेंद्रम येथील सेन्सर संशोधन, विकास आणि अ‍ॅप्लिकेशन तज्ज्ञांच्या मदतीने मेकर व्हिलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स इन्क्युबेटर केंद्रालगत उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय (चशळींध), भारत सरकार आणि केरळ सरकारने या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य केले असून इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांच्या सहकार्याने त्याची उभारणी करण्यात येत आहे. उत्कृष्टता केंद्राच्या (सीओई) उपयोजन क्षेत्रांचा विकास मेकर व्हिलेजमधील स्टार्टअप्सबरोबरच केरळच्या स्टार्टअप मिशन परिसंस्थेमधील उद्योजकांसह उद्योगातील भागीदारांच्या पाठबळाने करण्यात येणार आहे.
 
सुरुवातीला यामध्ये पुढील गोष्टींवर भर असेल.
 
1) सेन्सर्सवरील (तापमान, आर्द्रता, दाब आणि ध्वनीशास्त्र) संशोधनाचा उपयोग व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान उत्पादनांसाठी करणे.
 
2) (अ) सेन्सर उत्पादन, (ब) इंटेलिजेंट सेन्सर प्रणालीचे हार्डवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर विकास आणि (क) सर्वसमावेशक अनुपालन चाचणी यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणे.
3) उद्योगांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली नवोन्मेषी उत्पादने आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.
 
4)उद्योगांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी पुष्टीकरण आणि अनुपालन प्रमाणपत्र मिळवण्याकरिता पूर्वपात्रतेसाठी सामाईक सुविधा उपलब्ध करून देणे.
 
5) ‘स्टार्टअप’ कंपन्यांना ‘इंटेलिजेंट आयओटी सेन्सर्स’सह इंडस्ट्री स्टॅण्डर्ड प्रॉडक्ट सोल्युशन स्वीकृत करण्यासाठी सुविधांसोबत व्यवसाय आणि मार्गदर्शकत्वाचे पाठबळ पुरवणे
 
6) डिझाईन चॅलेन्जेस, आऊटरिच प्रोग्राम आणि इन्क्युबेशन ग्रांट्स यांच्या माध्यमातून नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.
 
विस्तृत स्वरुपात या सर्व प्रयत्नांचे एकीकरण ‘इंटेलिजेंट आयओटी सेन्सर्स’ अवकाशात स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध बनवणार्‍या ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने होत आहे. ‘आयआयओटी’मधील उत्कृष्टता केंद्र (सीओई) अंतर्गत नियोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती खालील आकृतीत दिली आहे:
 
‘आयओटी’ सेन्सर्समधील उत्कृष्टता केंद्र (साओई)चा आढावा
 
यापूर्वी उल्लेख केल्यानुसार, ‘सीओई’चे स्थान केरळमधील कोच्ची येथील मेकर व्हिलेजच्या शेजारी एकात्मिक स्टार्टअप संकुलाच्या जवळच्या परिसरात एका अशा परिसंस्थेमध्ये धोरणात्मक दृष्टिकोनातून निश्चित केले जाईल. संस्थांमधील या जवळीकीमुळे ‘स्टार्टअप्स’ आणि ‘इंटेलिजेन्ट सेन्सर्स’ व ‘आयओटी’ क्षेत्रात काम करणारा संशोधक समुदाय यांच्यात नावीन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे.
 
‘सीओई’ने यापूर्वीच ‘आयओटी’ क्षमता असलेली काही सेन्सर उत्पादने विकसित केली आहेत आणि उद्योगांशी आणि शेवटच्या उपभोक्त्यांशी अगदी जवळून संपर्क साधून आणखी अनेक प्रकार विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
‘आयओटी’मधील ‘सीओई’ येथे ‘स्मार्ट डिजिटल थर्मामीट’, ‘अ‍ॅब्सॉल्युट ह्युमिडिटी सेन्सर्स’, औद्योगिक फायर अलार्म सेन्सर, सीओ2 सेन्सरहे विकसित करण्यात आले आहेत, तर टेंपरेचर सेन्सर्स, ह्युमिडिटी सेन्सर्स, प्रेशर सेन्सर्स, स्ट्रेन सेन्सर्स, प्रॉक्सिमिटी सेन्सर्स, की सेन्सर्स, गॅस सेन्सर्स इ.सह विविध प्रकारचे ‘आयआयओटी’ सेन्सर्स तयार करण्यात ‘सीओई’ गुंतलेली आहे.
 
समारोप
 
संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, उत्पादन उद्योग आणि शेवटचा उपभोक्ता यांच्या क्षमतांमध्ये ताळमेळ साधून आपल्या देशात ‘इंटेलिजेंट आयओटी सेन्सर्स’ आणि उपकरणे यांच्यासाठी एक पूरक व्यवस्था निर्माण करणे हा ‘आयओटी’ सेन्सर्समधील ‘सीओई’चा उद्देश आहे. या संदर्भात एक सामाईक सुविधा केंद्र, अनुपालन-पूर्व चाचणी प्रयोगशाळा आणि एक इन्क्युबेशन केंद्र यांची स्थापना या संस्थेकडून होण्याची अपेक्षा आहे. या सुविधांमुळे ‘इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट’ उत्पादन आणि ‘डिव्हाईस इंटिग्रेशन’ क्षेत्रात आणखी जास्त ‘स्टार्टअप्स’ आणि ‘एमएसएमई’ निर्माण होण्यास मदत होईल. यामुळे भारतीय सेन्सर बाजारपेठेतील शाश्वत विकासाला चालना मिळेल आणि जगाच्या नकाशात स्वतःचे स्थान कोरता येईल.
 
-डॉ. ए. सीमा
Powered By Sangraha 9.0