पाचोरा : केळीच्या दर प्रश्नी समिती गठीत

23 Aug 2022 20:42:21
जळगाव : केळी उत्पादक शेतकऱ्याला जाहीर दरानुसार किंवा योग्य भाव मिळावा व पुढे ग्राहकाला योग्य दरात केळी उपलब्ध व्हावी यासाठी पाचोरा बाजार समितीने समिती गठीत केली आहे.

Banana 
 
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद देत येथील बाजार समितीने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केळी उत्पादकांसाठी पाचोरा बाजार समिती बोर्ड भाव जाहीर करणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
केळीला जाहीर दरापेक्षा ( बोर्ड भाव) कमी दर मिळतात, मंदीचे कारण सांगून लूट केली जाते, व्यापारी मुजोर झाले आहेत, जे दर जाहीर होतात, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. केळीच्या शिवार खरेदीवर कुणाचेही नियंत्रण नाही. प्रशासन कारवाई करीत नाही, अशा तक्रारी केळी उत्पादकांनी बाजार समतीकडे निवेदनाद्वारे केल्या होत्या. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष संजय महाजन, पाचोरा तालुकाध्यक्ष नाना महाजन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीने यानंतर केळी दर प्रश्नी बैठक बोलावली.
या बैठकीत केळी दर रोज जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी एक सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीत शेतकरी, व्यापारी, बाजार समितीच्या प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती सावदा, रावेर, बऱ्हाणपूर येथील केळी भावानुसार भाव निश्चित करणार आहे. याशिवाय विनापरवाना केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परवाना देण्याची प्रक्रिया देखील बाजार समितीकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.
यावेळी रणजीत पाटील, चंद्रकांत धनवडे, नसीर बागवान, मोहम्मद एजाज शफी बागवान, राजेंद्र पाटील, राम केसवानी, हिंमतसिंग पाटील, डॉ. विजयसिंह पाटील, राजेंद्रसिंग पाटील, संजय महाजन, स्वरूप राजपूत, सोमनाथ पाटील, भास्कर पाटील, सचिव बी. बी. बोराडे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0