राहुल गांधींनी काँग्रेसाध्यक्षपदाला नकार देण्यामागे किंवा त्यापासून पलायन करण्यामागे अनेक कारणे आहेत. राहुल गांधी स्वतः पूर्णवेळ राजकारणी नाहीत. उद्धव ठाकरेंप्रमाणेच राजकारणापेक्षाही निराधार, निरर्थक बडबड करण्यालाच ते राजकारण समजतात. भाजपशासित राज्यात काही झाले की, ट्विटरवर दोन शब्द टंकित केले की, झाले आपले काम असे त्यांना वाटते.
वर्षानुर्षांपासून काँग्रेसला आपली वैयक्तिक जहांगिरी समजणार्या गांधी खानदानाच्या राजकुमाराने पक्षाध्यक्षपदाला नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता पक्षाचा पुढचा अध्यक्ष नेमका कोण असेल, असा प्रश्न काँग्रेसीजनांना भेडसावू लागला आहे. त्यावरच पक्षात महामंथन सुरु असून कदाचित २४ वर्षांनंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसाध्यक्षपदी येऊ शकते. मात्र, तसे झाले तरी गांधी कुटुंब काँग्रेसवरील अधिकार सोडेल का व काँग्रेसी कार्यकर्ते राहुल, प्रियांका, सोनिया गांधींकडे अध्यक्षपदाव्यतिरिक्तचे नेते म्हणून पाहतील का? कारण, दोघांचाही स्वभाव.
आज गांधी खानदानातील राजकुमार राहुल काँग्रेसाध्यक्षपदी यावेत, अशी बहुसंख्य काँग्रेसजनांची इच्छा आहे. त्यांना अध्यक्ष व्हायचे नसेल, तर प्रियांका किंवा सोनिया गांधी चालू शकतील. पण, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात आजीसारखे नाक असल्याची कितीही जाहिरात केली तरी मतदाराने प्रियांका गांधी-वाड्रांना सपशेल नाकारले. सोनिया गांधी आताच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष असून आरोग्याच्या तक्रारींमुळे त्या पूर्णवेळ अध्यक्षपद सांभाळू शकत नाहीत. त्यामुळे कितीही काही झाले, तरी काँग्रेसींसमोर अध्यक्षपदासाठी गांधी घराण्यातल्यापैकी एकच पर्याय उरतो तो म्हणजे, राहुल गांधी. म्हणूनच राहुल गांधींनीच पुन्हा एकदा पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, अशी काँग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे. पण, राहुल गांधींचीच त्यासाठी तयारी नाही, कारण, त्यांच्यात अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याइतकी पात्रता नाही. म्हणूनच ते त्यापासून लांब पळताना दिसतात. पण, तरीही आपल्यालाच काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व मानले जावे, असेही त्यांना वाटते. म्हणूनच ते अध्यक्षपदी नाही आले, तरी अध्यक्ष असल्याच्याच थाटात वावरतील हे नक्की.
राहुल गांधींनी काँग्रेसाध्यक्षपदाला नकार देण्यामागे किंवा त्यापासून पलायन करण्यामागे अनेक कारणे आहेत. राहुल गांधी स्वतः पूर्णवेळ राजकारणी नाहीत. उद्धव ठाकरेंप्रमाणेच राजकारणापेक्षाही निराधार, निरर्थक बडबड करण्यालाच ते राजकारण समजतात. भाजपशासित राज्यात काही झाले की, ट्विटरवर दोन शब्द टंकित केले की, झाले आपले काम असे त्यांना वाटते. त्यानंतर राहुल गांधी मौजमजा करायला, पार्टी करायला, परदेशवारी करायला सज्ज असतात. पण, याला राजकारण म्हणत नाहीत किंवा राजकारण असे चालत नाही. उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधींना राजकारणाची समज नसल्यानेच प्रशांत किशोरसारख्या कंत्राटी राजकीय सल्लागारानेदेखील राहुल गांधींबरोबर काम करायला नकार दिलेला आहे. त्यांनी काँग्रेस व राहुल गांधींबाबत सार्वजनिकरित्या केलेले मतप्रदर्शन जगजाहीर आहे. म्हणजे, जो राजकीय रणनीतिसाठी पैसे आकारतो, तो माणूसही राहुल गांधींबरोबर सशुल्क काम करायला तयार नाही, हे स्पष्ट होते.
तरीही काँग्रेसींना राहुल गांधीच अध्यक्षपदी हवे आहेत. त्यामागचे एक कारण म्हणजे, काँग्रेसमध्ये स्पर्धा नेहमी क्र.१ साठी नसते तर क्र. २ साठी असते. एकदा का पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व गांधी घराण्यातील व्यक्तीकडे सोपवले की मग इतर काँग्रेसी नेते घोळ घालायला मोकळे असतात. संपुआच्या सत्ताकाळातही सोनिया गांधींकडे काँग्रेसाध्यक्षपद होते, तरी नंतर त्यांनाच संपुआच्या अध्यक्षपदाचा आग्रह केला गेला. त्यानंतर पी. चिदंबरम यांच्यासह अन्य काँग्रेसी नेत्यांनी काय काय दिवे लावले, हे सर्वांसमोर आहे. म्हणूनच आताही गांधी कुटुंबातीलच व्यक्तीने अध्यक्ष व्हावे, अशी काँग्रेसींची इच्छा आहे व त्यासाठी ते राहुल गांधींना विनवणी करत आहेत.
पुढचा मुद्दा राहुल गांधींच्या वर्तणुकीचा आहे. राजकारणात मतदार जितका महत्त्वाचा असतो, तितकाच महत्त्वाचा पक्षाचा कार्यकर्ता आणि अन्य पदाधिकारी वर्गही असतो. पण, राहुल गांधींना इतरांना वेळ, महत्त्व द्यावेसे वाटत नाही. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचे उदाहरण बोलके आहे. काँग्रेसमध्ये असताना हिमंता बिस्व सरमा राहुल गांधींची भेट घ्यायला गेले, तर राहुल गांधी आपल्या नेत्याला भेटायचे सोडून कुत्र्याशी खेळत बसले. इथेच राहुल गांधी इतरांना किती तुच्छ समजतात, हे स्पष्ट होते. पण, यानेच पूर्वोत्तरातून काँग्रेसचा सुपडा साफ व्हायला सुरुवात झाली. तरीही राहुल गांधींमध्ये बदल झालेला नाही, ते आजही तसेच वागतात, जसे सात वर्षांपूर्वी वागत होते. राहुल गांधींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधासाठी विरोधी टीका करायला भरपूर वेळ आहे, म्हणूनच ते सदैव ट्विटरवर पडीक असतात अथवा जिथे नको तिथे जायलाही त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो. पण, स्वतःचा पक्ष चालवायला त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो.
राहुल गांधींना कार्यकर्त्यांना, अन्य नेत्यांना दररोज भेटावेसे वाटत नाही. त्यातून काही विचारविमर्श व्हावा, पक्षाला जरा बरे दिवस यावेत म्हणून रुपरेषा आखावी, असे काहीही त्यांना वाटत नाही. राज्याराज्यांतल्या काँग्रेस समित्यांच्या, प्रदेशाध्यक्षांच्या भेटीगाठी घ्याव्यात, जनतेशीही संवाद साधावा, असे त्यांना वाटत नाही. नुकतीच महाराष्ट्रातली काँग्रेसचा सहभाग असलेली महाविकास आघाडीची सत्ता गेली. पण, त्यानंतरही राहुल गांधींना महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांची भेट घ्यावी, त्यांना प्रोत्साहन द्यावेसे वाटले नाही. फक्त ट्विटरवरुन टिवटिवाट करण्यालाच राजकारण समजण्याचा हा परिणाम. यातूनच काँग्रेसची फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात वाट लागली आहे. अध्यक्षपद आले तर ही सगळीच कामे राहुल गांधींना करावी लागतील आणि ती करायची नाहीत, म्हणून राहुल गांधी त्याला नकार देत आहेत.
गेल्या काही काळापासून गांधी कुटुंबाशी संबंधित ‘नॅशनल हेराल्ड’च्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्याअनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधींची तासन्तास चौकशीही केली. पण, त्यादरम्यान राहुल गांधींची अटकेची नौटंकीही पाहायला मिळाली. इतर कोणत्याही जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर न उतरणारे राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी आपल्यावरील ‘ईडी’ कारवाईविरोधात मात्र काळे कपडे घालून तत्काळ रस्त्यावर उतरले. पण, जर राहुल गांधी किंवा सोनिया गांधींनी ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात भ्रष्टाचार केलाच नसेल तर त्यांनी कशाला घाबरावे? उलट एकदा काय हजारदा चौकशी केली तरी ‘ईडी’ला माझे निर्दोषत्वच दिसून येईल, असे ठणकावून सांगत त्यांनी चौकशीला हिंमतीने सामोरे जायला हवे होते. पण, तसे काही झाले नाही.
त्यांना ट्विटरवर टिवटिवाट करण्याच्या कार्यबाहुल्यातून वेळ मिळाला आणि ते ‘ईडी’ कारवाईविरोधात रस्त्यावर उतरले. पण, राहुल गांधींनी असाच जोश कधी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी दाखवल्याचे पाहायला मिळाले नाही. पक्षासाठी जमिनीवर उतरावेसे त्यांना वाटले नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी सत्ता मिळण्याआधी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते, रस्त्यावर उतरुन कार्यकर्ते, नेते, जनतेशी संवाद साधला होता. ते आधी काँग्रेसमध्येच होते, पण आज ते स्वतःच्या कर्तृत्वावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वही सदैव आपल्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या संपर्कात असते, पक्ष संघटनेसाठी सतत बैठका, चिंतन-मंथन सुरु असते. पक्ष त्यातून मोठा होत असतो. पण राहुल गांधींना यातले काहीच करावेसे वाटत नाही आणि म्हणूनच त्यांना अध्यक्षही व्हायचे नाही, नुसताच त्यापासून पळ काढायचा आहे.