दहीहंडी साहसी खेळाचे स्वागत

20 Aug 2022 15:40:28
 
अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांतल्या नको त्या प्रकारावर या टोळक्याच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही आणि हाच या टोळक्याचा दांभिकपणा आहे. त्या टोळक्याला सणसणीत चपराक लगावणारा निर्णय म्हणून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याकडे पाहिले पाहिजे. यातून दहीहंडीलाही शिस्त लागेल आणि दहीहंडीची लोकप्रियताही वाढेल.
 

dahi handi 
 
 
 
 
 
शिंकेचि तोडितो मडकेची फोडितो,
करी दह्या दुधाचा रबडा!
 
संत एकनाथरचित शब्द वाचले, ऐकले की, गोकुळात शिंक्यावरील मडक्यात ठेवलेले दूध, दही, लोणी थरावर थर रचून एकमेकांच्या साथीने मटकावण्यासाठी श्रीकृष्णासवे जमलेल्या बालगोपाळांचे चित्र समोर उभे राहते. गावातील दूध, दही, लोण्याच्या रुपातील धनसंपत्ती मथुरेच्या बाजारात नेण्याआधी त्यावर गावातील सर्वात खालच्या स्तरात असणार्‍या प्रत्येक बालकाचा अधिकार आहे, हा सामाजिक संदेशही यातून मिळतो.
 
मुंबई-महाराष्ट्रात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर गोपाळकाल्याला दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो, तो याच बालगोपाळांच्या आठवणीने. मात्र, आता दहीहंडी केवळ परंपरेने चालत येणारा संस्कृती सोहळा राहणार नसून त्याला फडणवीस-शिंदे सरकारने नुकताच साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. सध्या सारीकडेच साहसी खेळांची लोकप्रियता वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे, साहसी खेळांतील थरार, रोमांच आणि अंतिम निर्णयातील अनिश्चितता व जीवाचा धोका!
निसर्गातील आजूबाजूचे वातावरण आणि त्यामुळे उद्भवणार्‍या धोक्यांना सामोरे जात साहसी खेळ खेळले जातात. ज्या खेळांमध्ये प्रचंड साहस दाखवले जाते, नैसर्गिक धोके असतात, नियमावली ठरवताना अडचणी येतात, अशा खेळांना साधारणतः साहसी खेळ म्हटले जाते. त्यात पारंपरिक गिर्यारोहणासह स्किईंग, राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, विंगसुट फ्लाईंग, स्कुबा डायव्हिंग, स्कॅक लायनिंग आणि उंचावरुन खाली उडी मारणे यांसारख्या खेळांचा समावेश होतो. त्यात आता दहीहंडीचाही समावेश करण्यात आला. तशी मागणी अनेक वर्षांपासून दहीहंडी फोडणार्‍या गोविंदा पथकांकडून करण्यात येत होती. त्यालाच प्रतिसाद देत फडणवीस-शिंदे सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला.
 
दहीहंडी फोडण्यात इतर साहसी खेळांप्रमाणेच असामान्य शारीरिक क्षमता, कौशल्य, चपळता, सांघिक भावनेचे दर्शन घडत असते. थरावर थर रचून उंचावरील दहीहंडी फोडण्याचे विशिष्ट तंत्र, गोविंदांनी घेतलेले परिश्रम, सरावासाठी घेतलेले कष्ट आणि दिलेला वेळ इतर खेळांच्या तोडीस तोडच असतात. तसेच यात धोकाही असतोच आणि म्हणूनच त्याला साहसी खेळाचा दर्जा देणे आवश्यक होते.
 
मात्र, मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातच हिंदू सण-उत्सव आले की नाके मुरडणार्‍यांचे टोळके सतत वावरत असते. दहीहंडी उत्सवात अपवादाने घडणार्‍या अनपेक्षित प्रकारावरून संपूर्ण दहीहंडी उत्सवाच्याच विरोधाचे धंदे या टोळक्याकडून केले जातात. असा प्रकार इतरही हिंदू सण-उत्सवाबाबत होतो, होळी-रंगपंचमीला रंग खेळू नका, मकर संक्रांतीला पतंग उडवू नका, दिवाळीला फटाके फोडू नका आणि ही यादी अशीच वाढत वाढत हिंदूंनी आपल्या आराध्य दैवताला फुले, फळे, दूध वाहू नये, मंदिर बांधण्याऐवजी शाळा वा रुग्णालय बांधावे, इथपर्यंत जाते.
 
म्हणजेच, हिंदूंची हिंदूपणापासून नाळ तोडण्यासाठीच हे टोळके काम करत असते. दहीहंडीतल्या कोणत्याही अनपेक्षित वा गैरप्रकाराचे समर्थन करता येणार नाही, हे खरेच पण, अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांतल्या नको त्या प्रकारावर या टोळक्याच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही आणि हाच या टोळक्याचा दांभिकपणा आहे. त्या टोळक्याला सणसणीत चपराक लगावणारा निर्णय म्हणून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याकडे पाहिले पाहिजे. यातून दहीहंडीलाही शिस्त लागेल आणि दहीहंडीची लोकप्रियताही वाढेल.
 
फडणवीस-शिंदे सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देताना इतरही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्याचे स्वागत केले पाहिजे. दहीहंडी खेळताना एखाद्या गोविंदाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास दहा लाखांची आर्थिक मदत, गंभीर जखमी झाल्यास साडेसात लाखांची आर्थिक मदत आणि जखमी झाल्यास पाच लाखांची आर्थिक मदत, देण्याचे जाहीर करण्यात आले. अर्थात, हा आदेश यंदाच्या वर्षासाठी लागू असून पुढील वर्षार्ंपासून गोविंदांच्या विम्याचाही निर्णय घेण्यात येईल.
 
मात्र, दहीहंडीचा साहसी खेळात समावेश झाल्याने त्यात सहभागी होणार्‍या गोविंदांनाही यातून फायदा होणार आहे. दहीहंडी खेळणार्‍या गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. पुढचा मुद्दा म्हणजे, महाराष्ट्रात वर्षानुवर्षांपासून कबड्डी खेळली जाते. पण, ‘प्रो-कबड्डी’ स्पर्धा सुरू झाली आणि कबड्डी खेळाचा कायापालट झाल्याचे पाहायला मिळाले. नुसता खेळच नाही, तर त्यात सहभागी खेळाडूंनाही अमाप प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळू लागला.
 
महत्त्वाचे म्हणजे, संपूर्ण देशभरातून खेळाडू आणि संघ सहभागी झाल्याने स्पर्धा वाढली व वाढत्या स्पर्धेने खेळातील दर्जा आणि गुणवत्तेतही वाढ झाली. आता दहीहंडीतही ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धा घेण्याचे फडणवीस-शिंदे सरकारने घोषित केले आहे. यातून दहीहंडीच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित होऊन गोविंदांसाठी ‘प्रो-कबड्डी’तील खेळाडूंप्रमाणे ‘स्पॉन्सर’ मिळू शकतात, बोली लावली जाऊ शकते, यातून गोविंदा आर्थिकदृष्ट्याही सक्षम होऊ शकतात. त्यातून दहीहंडीकडे इतर खेळांप्रमाणे करिअर म्हणूनही पाहिले जाऊ शकते.
 
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडीही होतीलच. त्यात दहीहंडीसाठी शिखर संघटनेची स्थापना, सभासदत्व, निवडणुका आणि दहीहंडी या साहसी खेळाच्या नियमावलीची रचना करावी लागेल. तसेच, त्यासाठी अधिकृत प्रशिक्षणही दिले जाऊ शकते. त्या माध्यमातून दहीहंडीला अधिक व्यावसायिक रुप मिळू शकेल.
 
या पार्श्वभूमीवर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देणारा निर्णय महत्त्वाचा. तसेच यासाठी फडणवीस-शिंदे सरकारचेही अभिनंदन केले पाहिजे. कारण, या सरकारने आधी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आणि हिंदूंना हिंदू सणोत्सवात आनंदाने सहभागी होण्यासाठी पुरेपूर संधी दिली, वेळ दिला. त्यानंतर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याने हिंदू गोविंदा पथकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीलाही न्याय दिला. या निर्णयाचे आनंददायी व जल्लोषी परिणाम येत्या काळात आपल्याला पाहायला मिळतीलच, अशी आशा!
Powered By Sangraha 9.0