शिंदे सरकारचा मोठा निर्णय... एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी १०० कोटींची तरतूद

02 Aug 2022 18:20:51
मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यातील लाल परी अशी ओळख असलेल्या एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. त्यामुळे महामंडळाचे व कर्मचाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले .
 
 

lalpari 
 
 
एस. टी . महामंडळाच्या कर्मचारी संपामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास महिनाभर आंदोलन चालले होते. या दरम्यानच्या काळात जिल्हे आणि गावं यांचा संपर्कच जणू काही तुटला होता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामध्ये पगारवाढीच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करण्यात आल्या होत्या. पण या संपामुळे एसटी महामंडळाचं मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि एसटी महामंडळाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनासाठी शासनाने 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाला 360 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने 2022-23 च्या अर्थसंकल्पात 1 हजार 450 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील 300 कोटी रुपये एप्रिलसाठी, तर 360 कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत.
 
गेल्यावर्षी वेतन विलंबामुळे एसटी कामगारांनी संप केला होता. कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस संप केला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे यासाठी शासनाने एसटीला पुन्हा मोठी मदत केली आहे.
Powered By Sangraha 9.0