वेध
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून वाघोबाची मांजर झाली. त्याची सुरुवात अडीच वर्षांपूर्वीच झाली होती. त्याचा शेवट वेदनादायक झाला...
पण, आजचा वाघोबा तो थंडोबा होणारा नाही तर आपल्या राज्यावर काबू ठेवणार्या Tiger वाघोबामुळे बळीराजा, मजूर सोबतच शासन आणि प्रशासनाच्या वाढलेल्या चिंतेचा विषय आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक ठरणार आहे आणि ती म्हणजे आज जे काही घडते आहे त्याला वाघोबा जबाबदार नाही. कारण वाढत्या लोकसंख्येत मानवानेच त्याच्या अधिवासात प्रवेश केला. त्याच्या गावातच आपली वस्ती वाढवली. त्यामुळे वाघोबा गावाच्या दिशेने शिकार आणि पाणी शोधण्यासाठी येतो, हे म्हणणे चुकीचे होईल. मुळात वाघ आपली परिसीमा आखून घेतो. त्याच्या बाहेर तो जात नाही. आपणच त्याच्या परिसीमेत प्रवेश केल्याने तो स्वरक्षणासाठी जे काही करतो ते प्रत्येक जिवंत व्यक्ती जे करतो तेच तोही करतो. मात्र, पैशाच्या लोभापायी त्याची शिकार करून नखे, दात, कातडे काढणे त्याचे समर्थन कदापिही होऊ शकत नाही. त्यासाठी कायद्यात असलेली शिक्षा शिकार्यांना झालीच पाहिजे. मात्र, तिथेही वन विभागाचे अधिकारी हातचा एक राखून काम करतात. त्यामुळे किती शिकार्यांना शिक्षा झाली, हा अभ्यासाचा विषय ठरेल. वर्धा वन विभागाने सहा महिन्यांपूर्वी वाघाचे कातडे विकणार्याच्या टोळीतील एकाला कसे सहजरीत्या दुर्लक्षित केले, हा एक नमुनेदार दाखला म्हणावा लागेल.
फार मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेला, पण आज नामशेष होत चाललेला जंगलांचा शिकारी म्हणजे वाघ. खर्या अर्थाने शिकारी असलेला हा प्राणी मोजकेच प्राणी, तेही मोठे धष्टपुष्ट असे मारतो. गाई, बैल, म्हशी, हरणे, रानडुकरे, गवे हे याचे शिकारीचे भक्ष्य. नरभक्षक वाघ हा सर्वत्रच त्रासदायक ठरलेला प्राणी आहे. Tiger वाघ भारत, इंडोनेशिया, चीनमध्ये सरसकट आढळतो. सैबेरियातील जंगलात मोजके वाघ आढळतात. खरे म्हणजे सर्वत्रच मोजके वाघ आहेत, पण अन्यत्र मारले जाऊनही वाघ कमी होत गेले आहेत. नरभक्षक वाघाची शिकार साधने कठीण होऊन बसते. वाघ मुख्यतः निशाचर आहे. दिवसा त्याला सिंहाप्रमाणे ऊन खाणे, आराम करणे आवडत नाही. जाळीमध्ये, आडोशाला त्याचा सारा दिवस जातो. सायंकाळी वा मध्यरात्री त्याचा वावर व शिकार चालते. त्याला साजेशी त्याच्या डोळ्यांची रचना आहे. कानांवरही त्याचा भरपूर भरवसा राहतो. भक्ष्याच्या वासावरून माग काढणे वाघाच्या रक्तात नाही. वाघ मुळात मांजरकुळातला असल्याने झाडावर चढणे त्याला जमू शकते. पण सरळसोट उभा बुंधा असला तर हा प्रयत्न फार नेटाने करीत नाही. त्यामुळेच उंचावर सुरक्षित मचाण बांधून वाघाची शिकार केली जाते. वाघांची भारतातील संख्या कमी झाली. त्याला बिचकूनच आसपासचे गावकरी, शेतकरी राहतात तर अनेकदा आदिवासी, तेंदूपत्ता वेचणारे, जंगलात जनावरं चारायला नेणारे गुराखी त्याला बळी पडतात.
Tiger वाघांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने त्यांच्यासाठी भारतात संरक्षित वनांची योजना आखली गेली. वाघांसाठी 19 संरक्षित वने आहेत. अभयारण्याजवळच्या लोकवस्तीत वाघांचा वावर अनेकदा दिसून येतो. अशा वेळी तेथील स्थानिक जनतेतील घबराट व वाघांचे संरक्षण यापैकी प्राधान्य कशाला हा प्रश्न गंभीर रूप धारण करतो. नरभक्षी सोडल्यास अन्य कुठलाही वाघ एकाएकी हल्ला करीत नाही. काही घटना यास अपवाद आहेत. 14 फेब्रुवारी 2022 च्या गणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत. 2002 मध्ये भारतात 3642 वाघ होते व ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. राज्यात 340 ते 350 पेक्षा अधिक वाघ असल्याची नोंद आहे. या सर्वात गंभीर विषय म्हणजे शेतकर्यांवर निसर्गाची अवकृपा आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट त्याच्यावर असते. त्यातच आता वन्यप्राणी गावाच्या दिशेने येऊ लागले म्हणजे त्याची वाट शेतातूनच! अशावेळी वाघ आपली शिकार शोधतो आणि त्यात शेतकरी, शेतमजूर किंवा वनात काम करणार्या मजुरांचा बळी जातो. शेतकर्यांना स्वत:च्या उत्पादित धान्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे दलाल म्हणेल त्या भावात धान्य विकावे लागते. त्यात गेल्या 8-10 वर्षांत पुन्हा जंगली श्वापदांचा वाढलेला उच्छाद शेतकर्यांना धास्ती वाढवणारा आहे. त्यामुळे Tiger वाघोबाही वाचावा आणि शेतकरीही! मात्र, शिकार्यांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही...
- प्रफुल्ल व्यास
- 9881903765