अल्पवयीन वधूच्या धाडसाने समोर आले बालविवाहाचे प्रकरण ; आई- मामा, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

18 Aug 2022 13:32:28
 
सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले पोलीस ठाणे, जळगावशी कनेक्‍शन
 
बीड : जळगाव येथील अवघ्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंबरी गावच्या तरुणाशी बळजबरीने लावून दिला. सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून थेट अंबड (Police) पोलिस ठाणे गाठले. तेथे आपली आपबीती पोलिसांना सांगितली. यानंतर आई- मामा, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
 

child marrage
 
  
 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून खानदेशातील जळगाव (Jalgaon) येथील 15 वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मृत्यूपूर्वी तिचा (Marriage) विवाह बीडच्या (Beed) पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावच्या एका तरुणाशी ठरवला होता. वडील गेल्यानंतर मुलगी अल्पवयीन असतांना देखील तिच्या आई व मामा यांनी त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने पती पसंत नसल्याचे सांगून मला माहेरी घेऊन जा; अशी विनंती आई आणि मामाकडे केली. त्यामुळे त्यांनी तिला जळगावला परत आणले.
 
नजर चुकवत गाठले पोलिस स्‍टेशन
 
गत महिन्यात 23 जुलैला मुलीचा सासरा तिला घेण्यासाठी जळगावला आला. यावेळी सासरी निघालेल्या मुलीने जळगाव बसस्थानकातून सासऱ्याची नजर चुकवली व दुसऱ्या बसने जालना जिल्ह्यातील अंबडला पोहोचली. यावेळी तिने अंबड पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आई, मामा, पती आणि सासऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये अंबड पोलिसात गुन्हा नोंदविला. त्यानंतर हा गुन्हा बीडच्या पाटोदा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तर मुलीला जवळच्या कोणत्याही नातेवाईकाचा आधार नसल्याने तिला जालना येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिलीय.
Powered By Sangraha 9.0