धक्कादायक..प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून केली हत्या ; तीन दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे घेऊन पोहचला पोलिसात !

17 Aug 2022 17:28:34
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा आज पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर म्हणून गावातील एका युट्यूबरने आपल्याच प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यावर मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात घालून थेट पोलिसात पोहचला. अंकिता श्रीवास्त असे मृत महिलेचे नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
hattya 
 
 
 
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध होते. दरम्यान अंकिता सतत लग्नासाठी तगादा लावत असल्याने सौरभने तिची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच त्याने हत्या केली होती. मात्र आज मृतदेह घेऊन तो पोलिसात पोहचला.
 
दोघांमध्ये होते विवाहबाह्य संबंध
 
सौरभ राहत असलेल्या शिऊरमध्येच अंकिता पती आणि मुलासह राहत होती. दोघांचे घर आजूबाजूलाच असल्याने दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे सौरभच्या सांगण्यावरून अंकिताने पतीला सोडून शहरात भाड्याने खोली घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. याच काळात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली. सौरभही तिच्याकडे येत असे आणि आर्थिक रसद सुद्धा पुरवत होता.
 
गेल्या काही दिवसांपासून अंकिताने आपण आता लग्न करून घेऊ असा तकादा सौरभच्या मागे लावला होता. मात्र तिची समजूत काढून प्रत्येकवेळी सौरभ विषय बदलायचा. पण आता अंकिताचा लग्नाचा जोर अधिकच वाढला होता. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी अंकिताला भेटायला आलेल्या सौरभने तिची गळा चिरून हत्या केली. त्यांनतर तेथून निघून गेला. आज सकाळी पुन्हा आला आणि मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले.
 
मृतदेह पाहून पोलिसांना बसला धक्का !
 
सौरभने मृतदेहाचे तुकडे एका पोत्यात भरून कारमध्ये टाकून शहराच्या बाहेर पडला. मात्र रूम उघडाच सोडल्याने शेजाऱ्यांना वास आला आणि आतमध्ये जाऊन पाहीले तर काही मृतदेहाचे तुकडे रूममध्ये पडलेले होते. याचवेळी सौरभ मृतदेह घेऊन देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात घेऊन पोहचला. आपण हत्या केल्याची कबुली देत त्याने मृतदेह दाखवला. यावेळी पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर पोलिसांना याची माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0