लढवय्या नेता

17 Aug 2022 10:37:07
 
वेध
 
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अरबी समुद्रात होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष, मराठा आरक्षणासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर पोटतिडकीने बोलणारे (MLA Vinayak Mete) आमदार विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने एका लढवय्या नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे.
 
 

mete 
 
 
 
झुंझार नेता म्हणून त्यांची ओळख होती. ते उत्तम संघटक होते. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कदापिही भरून निघणे शक्य नाही. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीसाठी जातानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. शेवटच्या श्वासापर्यंत मेटे मराठा आरक्षण व शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी लढत राहिले. हे विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे होते. प्रत्येक व्यासपीठावर मुद्देसूदपणे या दोन्ही विषयांची त्यांनी वेळोवेळी मांडणी केली. याच विषयासाठी त्यांनी गेल्या आठ ते दहा वर्षांत महाराष्ट्र पिंजून काढला व जनमत तयार केले होते. याशिवाय शेतकर्‍यांचे, ऊस तोड कामगारांचे, सामाजिक समस्यांचे प्रश्नही त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी उपस्थित केले. टोकाचा संघर्ष करून त्यांनी अनेक प्रश्न निकाली काढले. 1996 पासून आमदार राहिलेल्या विनायक मेटेंचा राजकीय प्रवास तसा संघर्षमय राहिला आहे. त्यांची कौटुंबिक पृष्ठभूमी राजकीय नव्हती. मेटे यांनी पदवीपर्यंत (बी. ए.) शिक्षण घेतले होते.
 
1986 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटेंनी (MLA Vinayak Mete) सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले होते. 1987 मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. 1994 मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. 1995 मध्ये त्यांनी मराठवाडा लोकविकास मंचची आणि त्यानंतर 1998 मध्ये नवमहाराष्ट्र विकास पार्टीची स्थापना केली होती. विनायक मेटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग'ेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. 2002 मध्ये त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. 31 जानेवारी 1996 ते 20 एप्रिल 2000 या काळात ते पहिल्यांदा विधान परिषदेत गेले. राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 28 जुलै 2000 ते 27 जुलै 2006 मध्ये तसेच आजपर्यंत ते विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेत निवडून गेले होते. म्हणजेच सलग पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते. उपमु'यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नुकताच त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा झाला होता. त्या सोहळ्यात फडणवीस यांनी त्यांच्या व मेटे यांनी फडणवीस यांच्या कार्यशैलीचे तोंडभरून कौतुक केले होते.
 
संपूर्ण राजकीय प्रवासात त्यांची वैचारिक बैठक कधीच बदलली नाही. ते राजकारणी कमी अन् समाजकारणीच अधिक होते. लोकविकास मंच व शिवसंग्राम या दोन्ही संघटनांचा उपयोग त्यांनी चळवळीसाठीच जास्त केला. ते बेधडकपणे आपली मते मांडत. स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करून मजबूत संघटन त्यांनी उभे केले होते. (MLA Vinayak Mete) मराठा समाज राजकीयदृष्ट्या शक्तिशाली असला, तरी समाजातील मोठ्या वर्गापर्यंत राजकीय सत्तेचे फायदे पोहोचलेले नाहीत, हे सत्य त्यांनी प्रयत्नपूर्वक राजकीय पटावर आणले. त्यांच्या निकराच्या लढाईचा शेवट दृष्टिपथात असतानाच विनायक मेटे यांनी निरोप घेतला. हा आणि स्मारकाचा प्रश्न निकाली काढणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सध्याचे राजकारण फारच गतिमान झाले आहे. ती अपरिहार्यता म्हणून सतत फिरणार्‍या नेत्यांनी अपरात्री प्रवास करण्याचे टाळायला हवे, असे अनेकदा सांगितले गेले. पुढे त्याचा सर्वांनाच विसर पडतो आणि त्यातून नेमके मेटे यांच्या अपघातासारखे दुर्दैवी प्रसंग ओढवतात. मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर काही गोष्टी समोर येतीलच. पण, रस्ता कोणताही असो; प्रत्येक वेळी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे. ही खबरदारी प्रत्येकानेच घ्यायला हवी. (MLA Vinayak Mete) मेटे यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय व जिवाभावाचे कार्यकर्ते पोरके झाले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 
- गिरीश शेरेकर
 
- 9420721225
Powered By Sangraha 9.0