पेशावर : सध्या पाकिस्तानला पुराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही भीषण बनली असून, पूरग्रस्त भागातील लोकांना जीव वाचवण्यासाठी डोंगर व इतर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे.
बलुचिस्तानमधील अचानक आलेल्या पुरामुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील 30 गावे बुडाली असून, डोंगराळ भागातील एकूण गावांची संख्या 50 झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुचिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि अचानक पूर आला. ज्यामुळे पुराचे पाणी लगतच्या कंबार-शहदादकोट आणि दादू जिल्ह्यातील कछोच्या डोंगराळ भागात घुसले आणि या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बाधित भागातील लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी डोंगर आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. पूरग्रस्त गावात एका ७० वर्षीय वृद्ध आणि आजारी महिलेला वैद्यकीय मदत न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात पाकिस्तानमध्ये, विशेषतः बलुचिस्तानमध्ये अनपेक्षितपणे मुसळधार पाऊस पडला आहे. पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, अतिवृष्टी आणि पुरात आणखी १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात शेकडो लोक अडकले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी (Pakistan heavy Rain) पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, गेल्या २४ तासांत एका कुटुंबातील नऊ जण पुरात वाहून गेले आहेत. वृत्तानुसार मृतांमध्ये सात मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय खैबर पख्तुनख्वामध्ये पूर आणि घराचे छत कोसळल्याने किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत.
तसेच, गेल्या 36 तासांत सुमारे 100 घरांचे पुरात पूर्ण नुकसान झाले असून, त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने बलुचिस्तान प्रांतात कलम 144 लागू केले आहे. बलुचिस्तानचे मुख्य सचिव अब्दुल अझीझ उकाली यांनी सांगितले की, 1 जूनपासून पावसामुळे प्रांतातील 124 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 10,000 घरांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे सुमारे 565 किमी रस्ते आणि 197,930 एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे, तर 712 पशुधनही मरण पावले आहेत.