जनजातीविरोधी काँग्रेस

30 Jul 2022 11:28:25
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची ‘ईडी’ चौकशी होत असताना द्रौपदी मुर्मूंच्या रुपात एक गरीब, वनवासी समाजातील महिला राष्ट्रपतीपदावर आरुढ झाल्याचे काँग्रेसला सहन झालेले नाही. त्यातूनच काँग्रेसने स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत जोपासलेला गरीब, वनवासी, जनजाती समुदायाबद्दलचा विखार अजय कुमार वा अधीररंजन चौधरींच्या तोंडातून बाहेर पडू लागला.
 
 
 

murmu2 
 
 
 
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना ‘ईडी’ने ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी चौकशीसाठी बोलावताच काँग्रेसी नेते-कार्यकर्ते बावचळून गेले. सोनिया गांधी ‘ईडी’ कार्यालयात येण्याआधीच काँग्रेसी गुलामांनी ठिकठिकाणी धुडगूस घालायला सुरुवात केली. पण, काँग्रेसी नेते-कार्यकर्त्यांनी सत्याग्रहाच्या नावावर रस्त्यावर उतरुन केलेली नौटंकी लोकशाहीद्रोहाशिवाय काहीही नाही. कारण, लोकशाही व्यवस्थेत कायद्यासमोर देशाचा प्रत्येक नागरिक समान असतो. पण, काँग्रेसी गुलाम सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधींना राज्यघटना, देशापेक्षाही वरचढ मानतात. काँग्रेसी नेते-कार्यकर्त्यांच्या मते गांधी कुटुंब कोणालाही उत्तरदायी नाही. त्यांनी काहीही करावे, भ्रष्टाचार करावा, हेराफेरी करावी, लष्करावर प्रश्नचिन्ह लावावे, चिनी कम्युनिस्ट पक्षाशी करार करावा, चिनी राजदुतांची लपून-छपून भेट घ्यावी. पण, त्यावर गांधी कुटुंबाकडे कोणी स्पष्टीकरण मागू नये, गांधी कुटुंबाची कोणी चौकशी करु नये, असे काँग्रेसी गुलामांना वाटते. आता ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी गांधी माय-लेकाची चौकशी सुरू झाली, तर त्याला कॉँग्रेसी नेते-कार्यकर्ते सोनिया गांधी-राहुल गांधींच्या ‘शानमध्ये गुस्ताखी’ समजतात! त्यातूनच काँग्रेसी गुलामांनी मानसिक संतुलन गमावले आणि संवैधानिक पदांवरील व्यक्तींविरोधातच अद्वातद्वा बडबडण्याचा उद्योग सुरू केला.
 
द्रौपदी मुर्मू वनवासी समुदायाचे नव्हे, तर ‘इव्हिल फिलॉसॉफी’चे प्रतिनिधित्व करतात, असे विधान काँग्रेस नेते अजय कुमार यांनी केले. त्यांच्या विधानाने काही फरक पडला नाही व द्रौपदी मुर्मूंनाच मतदारांनी राष्ट्रपतीपदी बहुमताने विराजमान केले. पण, त्याचेही काँग्रेसी नेते-कार्यकर्त्यांना अतिव दुःख झाले व त्यातून त्यांनी द्रौपदी मुर्मूंचा जास्तच द्वेष सुरू केला, त्यातलाच एक नग म्हणजे अधीररंजन चौधरी. खासदारपदी पोहोचलेल्या अधीररंजन चौधरींना आपण काय बोलावे, कसे बोलावे, याचे भानच नसते. उचलली जिभ लावली टाळ्याला छापात ते फक्त तोंडाचा पट्टा चालवत असतात आणि बोलून झाले की मग मला माहितीच नव्हते, अमूक शब्दाचा तमूक अर्थ होतो किंवा चुकून माकून बोललो, असे म्हणत सारवासारवीचा करतात. त्यांनीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सार्वजनिक ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ‘राष्ट्रपत्नी’ म्हणत अतिशय घाणेरड्या पद्धतीने अपमान केला. त्यासाठी त्यांच्यावर ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल होऊन त्यांची रवानगी तुरुंगातच झाली पाहिजे.
 
अधीररंजन चौधरींच्या विधानानंतर भाजप नेत्यांनी त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यावर अधीररंजन चौधरींनी दिलेले स्पष्टीकरण ‘गिरे तो भी टांग ऊपर’ असे आहे. अनावधानाने वक्तव्य केले असून झालेल्या चुकीबद्दल फासावर चढवणार का, असे ते म्हणाले. पण, अधीररंजन चौधरींच्या पत्रकाराबरोबरच्या संवादाची ध्वनिचित्रफित पाहिल्यास त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अगदी जाणीवपूर्वक ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याचेच स्पष्ट होते. “हिंदुस्थान की राष्ट्रपती जी सबके लिए है, राष्ट्रपतीजी... (थांबतात) नहीं (जोर देऊन) राष्ट्रपत्नीजी... हिंदुस्थान की राष्ट्रपत्नीजी सबके लिए है!” अशाप्रकारे अधीररंजन चौधरी बोलत असल्याचे दिसते. त्यातून त्यांनी राष्ट्रपतींना मुद्दाम हिणवण्यासाठीच राष्ट्रपत्नी म्हटल्याचे स्पष्ट होते. कोणतीही व्यक्ती भराभर बोलण्याच्या ओघात अनावधानाने एखादी चूक करू शकते. पण, इथे तसे नाही. काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींची ‘ईडी’ चौकशी होत असताना द्रौपदी मुर्मूंच्या रुपात एक गरीब, वनवासी समाजातील महिला राष्ट्रपतीपदावर आरुढ झाल्याचे काँग्रेसला सहन झालेले नाही. त्यातूनच काँग्रेसने स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत जोपासलेला गरीब, वनवासी, जनजाती समुदायाबद्दलचा विखार अजय कुमार वा अधीररंजन चौधरींच्या तोंडातून बाहेर पडू लागला.
 
काँग्रेसने गेली ७० वर्षे गरीब, वनवासींसाठी कोणतेही भरीव कार्य केले नाही, आज भाजपने त्यांच्यातल्याच एका व्यक्तीला देशाच्या सर्वोच्चपदीबसवले, तर त्यानेही काँग्रेसींच्या बुडाला आग लागली. इतकेच नव्हे, तर अधीररंजन चौधरींनी वापरलेला राष्ट्रपत्नी शब्द हिंदू व महिलाविरोधी आहे. काँग्रेसींना हिंदू धर्मग्रंथांना नाकारण्याचा वा त्यांचा विकृत अर्थ लावण्याचा रोग जडलेला आहे. महाभारतातील द्रौपदीला पाच पती होते, पण हिंदू द्रौपदीला पाच पतीव्रतांपैकी एक मानतात. आता द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती झाल्या, तर त्यांच्या नावाचा इतिहासातील द्रौपदीशी संबंध जोडून काँग्रेसींना हिंदू व दोन्ही महिलांचा गुंड-मवाल्यांच्या भाषेत अपमान करायचा आहे. ‘राष्ट्रपत्नी’ शब्दातून अधीररंजन चौधरींनी तेच केल्याचे स्पष्ट होते.
 
महत्त्वाचे म्हणजे, आज सोनिया गांधी काँग्रेसाध्यक्षपदी आहेत. पण, त्यांनाही अधीररंजन चौधरींच्या विधानाचा खेद, मनस्ताप, लाज वाटल्याचे दिसले नाही. त्यांनी त्यावरून स्वतःहून अधीररंजन चौधरींना माफी मागायला लावले नाही वा स्वतःही माफी मागितली नाही. वनवासी असल्याने आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे म्हणणार्‍या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याच्या शब्दाचा निषेध केला नाही. यावरून, उद्धव ठाकरेंनी वनवासी समुदायाच्या व्यक्तीला पाठिंब्याचे फक्त तोंडदेखले विधान केल्याचे दिसून येते, त्यांना वनवासी समुदायाबद्दल कसलीही आत्मियता वाटत नाही. कारण, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची संगत महत्त्वाची वाटते अन्य काही नाही. काँग्रेस तर पहिल्यापासूनच गरीब आणि वनवासीविरोधी पक्ष आहे. म्हणूनच भाजपच्या बुथस्तरीय कार्यकर्त्याने एखादी कृती केली की त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची वा राजीनामा देण्याची मागणी करणार्‍यांना स्वतःच्या लोकसभेतील गटनेत्याने राष्ट्रपतींचा घृणास्पद पद्धतीने अपमान केल्याचे काहीच सोयरसुतक वाटत नाही. उलट माझे नाव का घेतले, म्हणून सोनिया गांधी भाजपच्या महिला खासदारांनाच धमकावू लागल्या.
 
त्यानंतर सोनिया गांधींचा सुंभ जळला पण पीळ नाहीचा अहंकार उतरवायला स्मृती इराणींनी मध्यस्थी केली, तर सोनिया गांधी ‘डोंन्ट टॉक टू मी’म्हणत तिथून निघून गेल्या. २०१४ आधी गांधी कुटुंब स्वतःची सत्ता असताना ज्या मस्तीत जगत होते, तीच गुर्मी आजही त्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यात अगदी ठासून भरलेली असल्याचेच त्यातून दिसून आले. सोनिया गांधींनी ज्या लहेजात उत्तर दिले, त्यातून त्या अजूनही स्वतःला सर्वसत्ताधीश असल्याचे समजतात, हे स्पष्ट होते. म्हणूनच स्मृती इराणी असोत वा रमा देवी असोत वा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यापैकी कोणाचाही आदर-सन्मान करावा, असे सोनिया गांधींना वाटत नाही. यावरुन अधीररंजन चौधरींनी द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वापरलेल्या ‘राष्ट्रपत्नी’ शब्दाला सोनिया गांधींचीही संमती असल्याचे सिद्ध होते. अर्थात, यातून काँग्रेसच अधिकाधिक गर्तेत जात राहील, हेही नक्कीच!
Powered By Sangraha 9.0