‘फाईव्हस्टार’ पर्यावरणवाद्यांमध्ये हरवले संत विजयदास

29 Jul 2022 11:41:00
खरोखरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणारे कधीही ‘फाईव्हस्टार’ मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत, त्यांना उंची कपडे, उंची मद्य, गुळगुळीत कागदाच्या मासिकांमध्ये मुलाखती आणि अन्य अपेक्षा नसते. त्यामुळे ते अतिशय शांतपणे त्यांचे काम करत राहतात आणि त्यासाठी गरज पडल्यास आपल्या प्राणांचे बलिदानही देतात.
 
 
 

aare 
 
 
देशातल्या नागरिकांना मेधा पाटकर हे नाव माहिती आहे. त्यांचे नाव माहीत नसलेल्या व्यक्ती सापडणे तसे विरळच. केवळ देशभरातच नव्हे, तर जगभरात त्यांना अतिशय महान पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांच्यातर्फे चालविण्यात येणारे ‘नर्मदा बचाव’ हे आंदोलन तर जणू पर्यावरण रक्षणाचे दुसरे नावच! या आंदोलनाद्वारे मेधा पाटकर यांनी देशातील वनवासी समुदायासाठी लढा देत असल्याचा दावा अनेक दशके चालविला. त्यासाठी देशातून आणि परदेशातून निधीही मिळविला आहे. नर्मदा नदीवरील ‘सरदार सरोवर’ या प्रकल्पामुळे देशातील पर्यावरणास फार मोठा धक्का बसल्याचा दावा पाटकर आणि गँगकडून सातत्याने केला जातो.
 
हा दावा करताना असा काही आव आणला जातो की, सर्वसामान्य माणूसही कोणताही विचार न करता ‘सरदार सरोवर’ हा प्रकल्प अतिशय वाईट असून त्यामुळे आता पर्यावरण पूर्णपणे नष्ट होणारच, या विचाराने भयभीत होतो आणि त्या भितीपोटी पाटकर आणि गँगच्या अजेंड्यास बळी पडतो. अर्थात, हे करताना पाटकर आणि गँग हळूच हिंदूविरोधी अजेंडाही राबवतात. मग त्या गुजरात दंगलीविषयी खोटे आरोप करतात, रा. स्व. संघावर फॅसिस्टवादी असल्याचा आरोप करतात, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसाचारास प्रोत्साहन देतात आणि भारतविरोधी भूमिकाही मांडतात. मात्र, तरीदेखील मेधा पाटकर यांना सर्व देश ओळखतो, कारण त्या पर्यावरणवादी असतात.
 
दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात सध्या आरेवादी पर्यावरणप्रेमींचा नवा पंथ उदयास आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मेट्रो प्रकल्पास विरोध करण्यासाठी पांढरे झगेवाल्या ख्रिस्ती पाद्य्रांनी या विषयाला हवा दिली आणि बघता बघता आरेमधील मेट्रो कारशेड प्रकरण थेट जागतिक झाले. याप्रकरणी मग कोट्यवधी रुपयांच्या मोटारींमधून फिरणार्‍या आणि आयुष्यात कधीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते - अभिनेत्रींकडून ‘सेव्ह आरे’ नावाचे फलक हाती देऊन महागडे फोटोशूट करण्यात आले. अर्थात, हे फोटोशूट केल्यानंतर ही मंडळी आपापल्या कामांना लागली आणि त्यानंतर मग स्वयंप्रेरणेने वगैरे आलेले कथित पर्यावरणप्रेमी आणि काही भाडोत्री आंदोलनजीवी यांनी एकत्र येऊन ‘सेव्ह आरे’विषयी गळा काढण्यास प्रारंभ केला.
 
त्यानंतर मग पुन्हा सर्वसामान्य जनतेने कोणताही विचार न करता हवी कशाला मुंबईत मेट्रो असे मत व्यक्त करण्यास प्रारंभ केला. मात्र, पांढरे झगेवाल्यांच्या नादी लागलेल्या या टोळक्यास पर्यावरणवादी असे बिरूद लागले आहे. त्यामुळे त्यांच्यातील काही मंडळींचे दुकान आता व्यवस्थित सुरू झाले असून आता देशी आणि परदेशी मासिके, वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिणे, देशातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जाऊन व्याख्याने झोडणे हे सर्व अतिशय सुखनैवपणे सुरू असणार आहे, तर देशात अशा ‘फाईव्हस्टार’ पर्यावरणवाद्यांची चलती अजूनही सुरू आहे. अर्थात, त्यांचे दुकान आता बर्‍यापैकी बसायला लागले असले आणि पाटकर वगैरेंच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशीही सुरू झाली असली तरी या ‘फाईव्हस्टार’ पर्यावरणवादी आणि त्यांचे अनुयायी देशात अजूनही कार्यरत आहेत. या मंडळींचा एकच अजेंडा असतो, तो म्हणजे पर्यावरणाच्या नावाखाली एकतर विकास प्रकल्पांना विरोध करायचा (ते करताना बर्‍याचदा त्यांना तोडपाणी व्हावी, अशीच अपेक्षा असते) किंवा आंदोलनाच्या नावे सरकारला ‘ब्लॅकमेल’ करायचे.
 
त्यासाठी मग बहुतांशी वेळा अस्तित्वात नसलेलेच मुद्दे जन्माला घातले जातात आणि आंदोलन सुरू केले जाते. मात्र, या प्रकारामुळे देशातील खरेखुरे पर्यावरणवादी आणि पर्यावरणाचे प्रश्न दुर्लक्षित होतात. कारण, खरोखरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणारे कधीही ‘फाईव्हस्टार’ मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत, त्यांना उंची कपडे, उंची मद्य, गुळगुळीत कागदाच्या मासिकांमध्ये मुलाखती आणि अन्य अपेक्षा नसते. त्यामुळे ते अतिशय शांतपणे त्यांचे काम करत राहतात आणि त्यासाठी गरज पडल्यास आपल्या प्राणांचे बलिदानही देतात.
 
अशाचप्रकारे राजस्थानमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी संत विजयदास यांनी तब्बल ५५१ दिवस आंदोलन केले. मात्र, राजस्थानमधील काँग्रेस सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी संत विजयदास यांनी आत्मदहन केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, ‘फाईव्हस्टार’ पर्यावरणवाद्यांच्या गदारोळात संत विजयदास यांच्या या बलिदानाविषयी कोणालाही काहीही माहिती नाही. त्यामुळे संत विजयदास, त्यांचे बलिदान आणि राजस्थानमधील बेकायदेशीर खाणकामास असलेला सरकारी आशीर्वाद याविषयी सविस्तर जाणून घेणे गरजेचे आहे.
 
बेकायदा खाणकामाविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक आंदोलने झाली, असे असतानाही राजस्थान सरकारने खाण माफियांवर कठोर कारवाई केली नाही. भरतपूर जिल्ह्यात संतांनी अवैध खाणकामाच्या विरोधात प्रदीर्घ आंदोलन केले. दीड वर्षांहून अधिक संतसमुदायाने आंदोलन करूनही सरकारने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात मंगळवार दि. १९ जुलै रोजी संतांनी आंदोलन तीव्र केले. डीग परिसरात असलेल्या पासोपा गावात संत नारायण दास पोलिसांच्या उपस्थितीत मोबाईल टॉवरवर चढले. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली. दुसर्‍याच दिवशी सरकारने मंत्री विश्वेंद्र सिंह आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनास्थळी पाठवले.संत नारायण दास खूप विनवणी करूनही मोबाईल टॉवरवरून खाली उतरले नाहीत. सरकारने बेकायदेशीर खाणकाम थांबवण्याचे आणि ब्रजचे खाण क्षेत्र वनजमिनीत हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर २० जुलै रोजी दुपारी नारायण दास मोबाईल टॉवरवरून खाली आले.
 
त्याचवेळी दुसरीकडे संत विजयदास यांनी स्वत:वर पेट्रोल शिंपडून पेटवून घेतले. काही दिवसांपूर्वीच आंदोलनकर्त्या १४ संतांनी गेहलोत सरकारच्याविरोधात आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने त्यास गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे संत विजयदास यांनी आत्मदहन केले, त्यात ते ८० टक्के भाजले होते. त्यांना उपचारासाठी दिल्ली येथे दाखल करण्यात आले. मात्र,त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकाराविरोधात भाजपतर्फे ‘सत्यशोधन समिती’चे गठन करण्यात आले होते. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड, सत्यपाल सिंह आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. या समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचे अवलोकन केले आणि त्याचा अहवाल केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांना सादर केला. त्या अहवालामध्ये या घटनेस केवळ बेकायदेशीर खाणकामाचाच नव्हे, तर हिंदूविरोधाचाही संदर्भ असल्याचे पुढे आले आहे.
 
आदिबद्री आणि कनकांचन, हे दोन्ही पर्वत ब्रज प्रदेशातील ८४ कोस परिक्रमेत येतात आणि दोन्ही हिंदूंची प्रार्थनास्थळे आहेत. ८४ कोस परिक्रमा क्षेत्र हे देशभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या दोन्ही भागात सातत्याने अवैध उत्खनन सुरू होते. हे अवैध उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत होते की, आता तेथील डोंगर पूर्णपणे सपाट झाले आहेत. बेकायदेशीर उत्खननामुळे जमीन आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. या बेकायदेशीर खाणकामाच्या निषेधार्थ स्वामी विजयदास आणि इतर संत धरणे आंदोलनाला बसले होते. त्यांनी सुमारे ५५१ दिवस धरणे आंदोलन केले, परंतु असे असतानाही राजस्थान सरकारच्या संरक्षणात खाण माफियांनी अवैध उत्खनन आणि दगडांची वाहतूक सुरूच ठेवली. संतांची एकच मागणी होती की, ब्रज प्रदेशात खाणकाम तत्काळ थांबवावे. पण, राजस्थानच्या काँग्रेस सरकारने बेकायदेशीर खाण सुरूच ठेवले आणि खाणमाफियांना सूट दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.
 
धक्कदायक बाब म्हणजे गेहलोत सरकारमधील मंत्री झाहिदा खान आणि त्यांचा मुलगा साजिद याच्या दबावाखाली संतसमुदाय आणि स्थानिक हिंदूंच्या विरोधास डावलून या दोन डोंगरांवर बेकायदेशीर खाणकामास मोकळे रान देण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कारण, या डोंगरांमध्ये चाललेल्या बेकायदेशीर खाणकामामध्ये मंत्री झाहिदा खान यांचेही दोन खाणपट्टे असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गेहलोत सरकारने जाणीवपूर्वक संतसमुदायाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
 
संत विजयदास यांच्या मृत्यूनंतर गेहलोत सरकारने हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या दोन्ही डोंगरांवरील बेकायदेशीर खाणकाम बंद करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, आता वेळ निघून गेली आहे. गेहलोत सरकारच्या कार्यकाळात यापूर्वीही हिंदूविरोधी कृत्यांना राजाश्रय असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यापूर्वी किरौलीमध्ये हिंदू नववर्षदिनाच्या शोभायात्रेवर झालेला हल्ला आणि दंगल, प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करणे, नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे मुस्लीम हल्लेखोरांनी कन्हैयालाल यांचा गळा कापणे यामुळे राजस्थानला हिंदूविरोधी कारवायांची प्रयोगशाळा बनविले जात आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
 
पार्थ कपोले
Powered By Sangraha 9.0