द्रौपदी मुर्मूंचा शपथविधी सोहळा संपन्न ; देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्याकडून मुर्मूंना शपथ !

25 Jul 2022 11:55:35
नवी दिल्ली : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N. V. Ramana) यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.
 

murmu 
 
 
 
 
द्रौपदी मुर्मूबाबत थोडे जाणून घेऊया-
 
द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
 
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा, अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.
 
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0