उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या

20 Jul 2022 18:03:25
 
निवडणूक आयोगाला पाठवले पत्र
 
मुंबई : राज्याच्या राजकारणात एका मागून एक घडामोडी सुरूच आहेत. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहेत. लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.
 
shivsena
 
 
 
आपण शिवसेना सोडली नसून, शिवसेनेतच असल्याचा दावा (Shinde group) शिंदे गटाकडून करण्यात येत होता. शिंदे गटाने भाजपासोबत जात राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटात अनेक पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सहभागी झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा करीत, स्वत:ची नवीन कार्यकारिणी घोषित केली. त्यानंतर शिंदे गट शिवसेनेवर दावा करणार असल्याची चर्चा होती. आता ही चर्चा खरी असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
शिंदे गटातील (Shinde group) खासदारांकडे लोकसभेचे गटनेतेपद गेल्यानंतर या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला रात्री उशिरा एक पत्र दिले, अशी माहिती आयोगातील सूत्रांनी दिली. या पत्रात बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असून, त्यांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde group) मंगळवारी पहाटेपासून दिल्लीत आहेत. त्यानंतर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला. शिंदे यांना पाठिंबा देणार्‍या 12 खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी नेमण्याची मागणी केली होती. रात्री राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर रात्रीच उशिरा निवडणूक आयोगाला पत्र सोपवण्यात आले. आता शिवसेनेवरच दावा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0