‘इंडिया-२०४७’; इस्लामिक राजवटीचा जिहादी कृती आराखडा

17 Jul 2022 11:39:42
भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे २०४७ सालापर्यंत भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून स्थापित करण्याचे ‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेचे जिहादी मनसुबे नुकतेच एका दस्तावेजाच्या माध्यमातून तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तेव्हा, या दस्तावेजातून उघडा पडलेला जिहादी कट, त्याची कार्यपद्धती आणि खबरदारीचे उपाय यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
arakhada
 
 
 
 
सन २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ करण्याची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची (पीएफआय) धक्कादायक योजना नुकतीच बिहारमध्ये टाकलेल्या एका धाडीत उघडकीस आली. त्यामुळे संपूर्ण देशात एकाच खळबळ माजली असून, मोठ्या प्रमाणात असंतोष आणि असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर पाटण्याच्या दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यासाठी त्यांना १५ दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. नुपूर शर्मा यांच्यासह इस्लाम विरोधात बोलणार्‍या लोकांची यादीही या कुख्यात दहशतवाद्यांनी तयार केली होती. राजस्थानमधील उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावतीत झालेल्या घटनांप्रमाणे सूड उगवण्याची योजना या दहशतवाद्यांनी रीतसर आखली होती. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या एक दिवस आधी ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेचा माजी दहशतवादी अतहर परवेझ आणि माजी पोलीस अधिकारी मोहम्मद जलालुद्दीन यांना अटकही करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८० लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. पुढे चौकशीअंती अशीही माहिती उजेडात आली की, या कटासाठी तब्बल २६ जणांचे प्रशिक्षण सुरु होते. हे सर्व लोक ’पीएफआय’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एसडीपीआय) यांच्याशी संबंधित होते. साधारण दि. ६-७ जुलैला बिहार, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील तरुणांना ‘मार्शल आर्ट’च्या नावाखाली चक्क पंतप्रधानांवरील हल्ल्याचेच प्रशिक्षण देण्यात आले.
 
‘इंडिया-२०४७’ : एक हिंसक योजना
 
हा मूळ दस्तावेज एकूण २५२ पानांचा असून मुखपृष्ठावर इंग्रजीमध्ये ‘इंडिया -२०४७’ - एम्पॉवरिंग दि पिपल, ‘एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन’ असे नाव छापलेले आहे. या दस्तावेजाची मुळात सुरुवातच होते ती पवित्र कुराणाच्या ओळींनी. ‘जोपर्यंत लोक स्वत:ला बदलणार नाहीत, तोपर्यंत त्यांची परिस्थिती अल्लासुद्धा बदलणार नाही. -पवित्र कुराण, सूरह अर-राद -१३:११’
या दस्तावेजातील संक्षिप्त केलेला आठ पानांचा मजकूर नुकताच बिहारच्या धाडीत तपास यंत्रणांच्या हाती सापडला. तो सोशल मीडियावर ‘व्हायरल’ही झाला आहे. ‘घाबरट हिंदूंना धडा शिकवण्याविषयी’ या कागदपत्रात बरेच काही छापलेले आहे.
 
‘पीएफआय’चे हेच ध्येय असून ही कागदपत्रे ‘केवळ अंतर्गत वापरा’साठी असल्याचेही त्यात म्हटले आहे. म्हणजे केवळ ‘पीएफआय’च्या सदस्यांनी ती वाचावीत आणि त्यांच्या पलीकडे कुणाच्याही हाती ती लागू नयेत, असा त्यामागील उद्देश.
या हिंदूद्वेषी दस्तावेजात प्रारंभीच नमूद करण्यात आले आहे की, भारतात मुस्लीम हा संख्येने दुसर्‍या क्रमांकावर असणारा धार्मिक गट आहे. इंडोनेशियानंतर भारतातच मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचे केंद्रीकरण झाले आहे. देशातील नऊ जिल्ह्यांत, लक्षद्वीप आणि जम्मू आणि काश्मीरमधील आठ जिल्ह्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्या ७५ टक्के आहे. पण, तरीही या दस्तावेजानुसार एकेकाळी देशावर राज्य करणारे मुस्लीम आज दुय्यम दर्जाचे मानले जातात.
 
तेव्हा या दस्तावेजानुसार, ब्रिटिशांनी जी राजकीय सत्ता मुस्लीम समुदायापासून हिरावून घेतली, ती २०४७ पर्यंत पुन्हा मुस्लिमांच्या ताब्यात यावी म्हणून ही पूर्ण योजना आखली आहे. तसेच सर्व क्षेत्रांत मुस्लीम जनतेला दुय्यम स्थान मिळत असून, सध्या देशात हिंदुत्त्ववादी प्रवाहाचा उदय झालेला आहे. भारत सरकारला मुस्लिमांच्या शरीयाविषयी असणार्‍या बाबींमध्येसुद्धा मुस्लिमांशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता वाटत नाही. आज मुस्लीम समाजाला प्रभावी नेतृत्त्व नाही. स्थानिक पातळीवर काही प्रमाणात असले तरी त्यांनी त्यांना दूरदृष्टी नाही. म्हणूनच ’पीएफआय’च्या नेतृत्वाखाली खर्‍या अर्थाने प्रगती साधणे आवश्यक आहे, असे हा दस्तावेज अधोरेखित करतो.
 
भारताच्या विरोधात पूर्ण शक्तीनिशी सशस्त्र उठाव करण्याची ‘पीएफआय’ व संबंधित जिहादी संघटनांची योजना असून त्यासाठी प्रशिक्षित केडर निर्मितीच्या तयारीसाठी हे देशविरोधी गट एकवटले आहेत. केवळ पाकिस्तानच नाही, तर तुर्कीसारख्या देशाचीही त्यासाठी मदत घेतली जाते आहे. तसेच हिंदूंना त्यांच्या गुडघ्यावर नमवण्यासाठी अन्य इस्लामिक देशांची मदत घेणार असल्याचेही हा दस्तावेजात स्पष्ट संकेत सापडतात.
 
या दस्तावेजात पुढे म्हटले आहे की, इस्लामचा इतिहास जर बघितला तर मुस्लीम हे नेहमीच अल्पसंख्याक होते. यशस्वी होण्यासाठी त्यांना बहुसंख्याक होण्याची गरज नाही. हिंदूंना नमवण्यासाठी ’पीएफआय’च्या मागे असणारे केवळ दहा टक्के मुस्लीम पुरेसे आहेत. त्यासाठी सर्व ’पीएफआय’ नेते, केडर यांनी हा ‘रोडमॅप’ मनात ठासून घ्यावा.
 
भारताला इस्लामिक राष्ट्र करण्यासाठीच्या ध्येयप्राप्तीचे चार टप्पे
 
१) पहिला टप्पा - जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे मुस्लिमांचे ऐक्य साधणे आणि त्यांना ’पीएफआय’च्या झेंड्याखाली एकत्र आणणे. त्यासाठी पार्टीने नवीन सदस्यांची भरती करण्यावर लक्ष केंद्रित करावे. ‘भारतीयत्त्व’ या पलीकडे जाऊन प्रत्येकाने ‘इस्लामिक’ ओळख प्रस्थापित करावयाची आहे. त्यासाठी ‘फिजिकल एज्युकेशन’ (पी.इ) विभागाच्याद्वारेत्यांना हल्ला चढवण्याचे आणि संरक्षणाचे, तलवार चालवणे, रॉड आणि अन्य शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
२) दुसरा टप्पा - ’पीएफआय’च्या नेतृत्त्वाखाली मुस्लिमांच्या समस्यांचे निराकरण करणे, त्यासाठी त्यांना पाठबळ देणे. तसेच सुरक्षा यंत्रणांना आपल्या प्रशिक्षित केडरची माहिती मिळू न देता शक्य तिथे हिंसेचा वापर करत आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणे. योग्य व्यक्तींना हेरून त्यांना बंदुका-स्फोटके वापरायचे आगाऊ प्रशिक्षण देणे. दरम्यान, पक्षाने ‘राष्ट्रध्वज’, ‘राज्यघटना’ आणि ‘आंबेडकर’ यांचा वापर करून आपले खरे उद्दिष्ट हे इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याचे आहे, हे सर्वस्वी लपवावे आणि एस.सी.(शेड्युल कास्ट), एस.टी (शेड्युल ट्राईब्ज) आणि ओबीसी (आदर बॅकवर्ड क्लासेस) यांच्याशी जवळीक साधावी. कार्यकारी आणि न्यायालयीन पातळीवर, सर्व स्तरांवर आपली माणसे पेरून माहिती काढावी. अन्य इस्लामिक देशांची मदत घेऊन फंड मिळवावे.
 
३) तिसरा टप्पा - पक्षाने मुस्लिमांच्या ५० टक्के आणि एससी, एसटी आणि ओबीसी यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या दहा टक्के जागा प्रत्येक पातळीवर जिंकाव्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एससी, एसटी आणि ओबीसी यांच्यात फूट पाडावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ उच्च जातींच्या हिंदूंची संघटना आहे, असा प्रचार करावा. सध्याच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना त्यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणावर प्रश्न उपस्थित करुन मुस्लीम, एससी, एसटी आणि ओबीसी यांचे हित जोपासावे.
‘फिजिकल एज्युकेशन’ (पी.इ) शारीरिक शिक्षण विभागाने गणवेशात मोर्चे काढणे, गरज वाटेल तिथे हल्ले चढवणे हे काम सुरुच ठेवावे. या टप्प्यावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटके यांची जमवाजमव करून साठा तयार करावा.
 
४) चौथा टप्पा - या शेवटच्या टप्प्यावर पक्षाने सर्व शक्तिशाली नेतृत्व म्हणून पुढे यावे. संपूर्ण मुस्लीम समाजाचे नेतृत्त्व आणि एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या ५० टक्के जागा जिंकाव्यात. राष्ट्रीय पातळीवर राजकीय सत्ता मिळेल इतका पाठिंबा त्यांना मिळाला पाहिजे.
 
एकदा सत्ता हस्तगत केल्यानंतर कार्यकारी, न्यायव्यवस्था, पोलीस आणि लष्कर यात महत्त्वाच्या जागांवर आपली माणसे नियुक्त करावीत. सर्व सरकारी जागांवर मुस्लीम आणि एससी, एसटी आणि ओबीसी यांची नियुक्ती करावी, जेणेकरून पूर्वी या समाजावर झालेला अन्याय आणि असंतुलन या नियुक्त्यांमुळे सुधारता येईल.
 
या टप्प्यावर ‘फिजिकल एज्युकेशन’ विभाग अगदी प्रभावी व्हावा. आपल्या हितसंबंधाच्या आड येणार्‍या प्रत्येकाला त्यांनी सरसकट ठार करावे. आपल्या विरोधकांच्या सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात या विभागाने आपल्या संरक्षणाचे काम करावे. आपल्याकडे शस्त्रास्त्रांचा पुरेसा साठा आल्यावर इस्लामच्या तत्त्वांवर आधारीत राज्यघटना आपण जाहीर करून ती लागू करावी. या टप्प्यात परकीय मदतसुद्धा मिळेल.
 
दस्तावेजातील कृती आराखडा
 
समस्या मांडणे - सुदैवाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू संघटना आणि त्यांच्या हातातील बाहुले असणार्‍या सरकारांमुळे आपल्याला तक्रारीसाठी अनेक कारणे मिळत आहेत. शासन आणि मुस्लीम यांच्यात विश्वासाचे वातावरण नाही. बाबरी मशीद, धार्मिक दंगली, मुस्लिमांना ठार मारणे यासारख्या बाबींना लावून धरले पाहिजे. सगळ्या राज्यांमध्ये हे पसरविले पाहिजे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे सरकार भारताला हिंदूराष्ट्र घोषित करणार आहे आणि मुस्लिमांना देशाच्या बाहेर काढणार आहे.
 
जनतेला सक्रिय करणे- शक्य तिथे मुस्लिमांना सक्रिय करून ’पीएफआय’ला पाठिंबा मिळवणे. लोकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भांडायला प्रवृत्त करणे.
 
’पीएफआय’ अंतर्गत धोरण - देशातील प्रत्येक घराघरात ’पीएफआय’ला पोहोचवणे. संघटना, पक्ष किंवा अन्य विभागात प्रत्येक कुटुंबातील किमान एक जण भरती करून घेणे. प्रत्येकाला आपल्या मासिक, लेखांचा वाचक म्हणून तयार करणे. आपल्या सोशल मीडिया पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. प्रत्येक कुटुंब आपल्याशी जोडले जाईल हे पाहाणे.
प्रशिक्षण आणि सदस्य भरती- सध्या या फॅसिस्ट वातावरणात ‘पीएफआय’ ही एकटी संस्था चांगली टिकून आहे. आपल्या ‘पीइ’ विभागाचा दबदबाही चांगला आहे. या युक्त्यांनी आपला आत्मविश्वास आणि दृढ निश्चय यांना बळ मिळेल. त्यासाठी तळागाळाच्या लोकांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. योगा क्लास आणि ‘हेल्दी पिपल, हेल्दी नेशन’ या संकल्पनेच्या आड राहून आपले ‘पीइ’ विभाग सक्रिय ठेवावे. आपले प्रशिक्षक राज्याराज्यांमध्ये जाऊन शस्त्रास्त्रे आणि स्फोटके चालवण्याचे प्रशिक्षण देत राहतील. आपल्याकडे प्रशिक्षक कमी आणि संभाव्य प्रशिक्षणार्थी जास्त आहेत. म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी नंतर प्रशिक्षण द्यावे. मुस्लीमबहुल वसाहतींमध्ये जागा घेऊन किंवा दूरच्या ठिकाणी शस्त्रसाठा करावा. प्रशिक्षण राबवावे. जेणेकरून ते सुरक्षा यंत्रणांना कळणार नाही. यांचा ठावठिकाणा अगदी ठरावीक जणांना माहीत असावा.
 
हिंदू आणि संघ परिवारातील नेत्यांची माहिती मिळवणे - हिंदू आणि संघ परिवाराचे नेते यांची सगळी माहिती जमवणे. त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांची कार्यालये यांची माहिती मिळवणे. हा ‘डेटाबेस’ अद्ययावत करत राहावा. यामुळे आपल्याला आपले ध्येय गाठताना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
 
अन्वयार्थ
 
अशा या दस्तावेजातील काही ठळख मुद्दे पाहिल्यानंतर हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे की, धर्मांध इस्लामी जिहाद्यांना भारतात स्वत:चे धार्मिक राज्य प्रस्थापित करायचे आणि त्यासाठी ’पीएफआय’ ही संघटना नेतृत्त्व करत आहे. तसेच यापूर्वीही सिद्ध झाले आहेच की, या संस्थेचा भारताच्या लोकशाही मूल्यांवर विश्वास नाही. म्हणजे या दस्तावेजावरुन थोडक्यात अधोरेखित झालेले मुद्दे हे खालीलप्रमाणे मांडता येतील.
 
१) हिंदू धर्मातील जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणे.
२) जातीजातींमध्ये अविश्वास वाढवून एससी, एसटी आणि ओबीसी यांना इस्लाम धर्माकडे वळवणे.
३) इस्लामिक मूल्ये समाजात प्रस्थापित करणे आणि प्रसंगी त्यासाठी हिंसेचा अंगीकार करणे.
४) लोकशाही मूल्यांना स्थान नसणे.
५) इस्लामी राज्यात धर्म आणि जात यावर आधारित उच्च पदांची भरती करणे.
६) परकीय राष्ट्राची मदत इस्लामच्या आधारावर घेणे.
७) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्त्ववादी नेते आणि कार्यकर्ते यांना संपवणे.
८) जाणीवपूर्वक समस्या निर्माण करून ‘अन्याय झाला होता’ असे म्हणत विविध मुद्द्यांचे भांडवल करणे.
९) देशातील सामान्य जनतेचा जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणे.
१०) मुसलमानांचीही भारतीय नागरिक म्हणून नव्हे, तर इस्लामिक ओळख प्रस्थपित करणे आणि तीच त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करणे.
 
एकूणच काय तर ही सगळी देशघातकी, हिंदूविरोधी योजना सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईमुळे उघड झाली. खरंतर या दस्तावेजाच्या पहिल्या मोठ्या आवृत्तीवर २०१६ साल छापील आहे. म्हणजे यापूर्वीच या सगळ्या कटकारस्थांनाचे नियोजन आणि कार्य सुरु झालेले असू शकते.
 
वरील सर्व बाबी लक्षात घेता, भारतीय जनतेने विशेषत: हिंदू जनतेने अतिशय सावध राहणे गरजेचे आहे. तसेच देशाची एकात्मता, अखंडता टिकवण्यासाठी जातीभेदांच्या पलीकडे जाऊन विचार करणे क्रमप्राप्त आहे. देशहिताच्या निर्णयांना ‘इस्लाम विरोधी निर्णय’ किंवा ‘अल्पसंख्याक विरोधी निर्णय’ असे सरसकट लेबल लावून तसा अपप्रचार का केला जातो, याचा आता खोलवर जाऊन विचार केला गेला पाहिजे. प्रसारमाध्यमांना हातचे खेळणे बनवून आपले ‘साध्य’ प्राप्त करण्यासाठी अशा किती तरी देशविघातक संघटना कार्यरत असू शकतात आणि आहेतही. म्हणूनच भारतातील लोकशाही अबाधित राखण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आता सावध राहिले पाहिजे. तसेच ‘हिंसा करणे’ हा त्यांच्या कार्यसिद्धीचा भाग आहे, हे या दस्तावेजावरुन सिद्ध झाले असून ही बाब अतिशय गंभीर आहे.
 
एकूणच काय तर देशातील दहशतवादाची रूपे, त्यांची कार्यपद्धती वेगाने बदलते आहे. अशावेळी सामान्य नागरिकांची जागरुकता ही सुरक्षा यंत्रणांना साहाय्यक ठरणारी आहे, अन्यथा स्वार्थी, आत्मकेंद्रित विचारांमुळे भारताचे रुपांतर अफगाणिस्तानमध्ये व्हायला फारसा वेळ लागणार नाही!
 
- रुपाली कुळकर्णी-भुसारी
Powered By Sangraha 9.0