नवी दिल्ली : Supreme Court सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सामान्य दिवसांपेक्षा एक तास आधी कामकाज सुरू केले. याबाबत न्यायमूर्ती यू यू ललित म्हणाले, जर मुले सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायमूर्ती आणि वकील सकाळी ९ वाजता त्यांचे काम का सुरू करू शकत नाहीत. न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सकाळी 9.30 वाजता खटल्यांची सुनावणी सुरू केली, तर न्यायालयाची सुनावणी साधारणपणे सकाळी 10.30 वाजता सुरू होते.
न्यायमूर्ती ललित म्हणाले, 'माझ्या मते, आपण सकाळी ९ वाजल्यापासून कामासाठी बसायला हवे. मी नेहमी म्हणत आलो की, जर मुलं सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात तर आपण सकाळी ९ वाजता का येऊ शकत नाही.' वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी जामीन प्रकरणामध्ये हजर राहून खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर सामान्य वेळेपूर्वी बसल्याबद्दल खंडपीठाचे कौतुक केल्यानंतर न्यायमूर्ती ललित यांनी ही टिप्पणी केली.
ते पुढे म्हणाले, Supreme Court न्यायालये सकाळी नऊ वाजता काम सुरू करू शकतात आणि सकाळी 11.30 वाजता एक तासाच्या विश्रांतीसह दुपारी 2 वाजेपर्यंत दिवसाचे काम पूर्ण करू शकतात. असे केल्याने न्यायाधीशांना संध्याकाळी काम करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ मिळेल. ही यंत्रणा तेव्हाच काम करू शकते जेव्हा केवळ नवीन आणि अशा प्रकरणांची सुनावणी करायची असते, ज्यांना दीर्घ सुनावणीची आवश्यकता नसते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 4 या वेळेत खटल्यांची सुनावणी करतात.