पावसाळा व इमारतींच्या पडझडीची कारणमीमांसा...

14 Jul 2022 12:26:53
 
मुंबई असो ठाणे अथवा पुणे किंवा नाशिक, पावसाळा आला की इमारतींच्या पडझडीच्या घटना हमखास घडताना दिसतात. त्यानिमित्ताने महानगरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न, पुनर्वसनाची समस्या आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...
 

imarat 
 
 
दरवर्षी ऐन पावसाळ्यात जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, इमारतींचे भाग, वाडे कोसळून दुर्घटना घडतात. त्याचबरोबर टेकडीच्या पायथ्याशी राहणारे रहिवासी दरडींमुळे जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात जगत असतात. यंदाही या अनुषंगाने मुंबई असेल अथवा पुणे, काही वेगळे चित्र दिसून आले नाही. सर्वच महानगरपालिका दरवर्षी धोक्याच्या इमारतींची यादी तयार करतात. अति धोकादायक (सी-१ श्रेणी) म्हणजे त्या पाडण्यायोग्य इमारती व दुरुस्त करण्यासारख्या असल्यास (सी-२ श्रेणी) त्या इमारतीतील रहिवाशांना तशी नोटीस पाठविली जाते. या इमारती पाडायच्या का दुरुस्त करायच्या, हे त्या इमारतींतील रहिवाशांनी नेमलेल्या पालिकेच्या सल्लागार पॅनेलच्या यादीमधील स्ट्रक्चरल सल्लागाराकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून ठरविता येते. पण, जर इमारती रिकाम्या करायच्या असतील, तर तेथे गेलेल्या पालिकेच्या पथकाला रहिवाशांकडून अनेक वेळेला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून अशा धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते. परंतु, या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या पार्श्वभूमीवर बहुतांश रहिवाशांना तात्पुरती वा पर्यायी स्वरुपात घरे मिळत नाहीत, हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.इमारतींचे आयुष्य हल्ली पालिका 30 वर्षांचे मानते व 30 वर्षांनंतर इमारतीतील रहिवाशांना काही ठिकाणी धोका आढळल्यास, पालिका त्या इमारतीतील रहिवाशांना ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे निर्देशही देत.
 
मुंबईतील अतिधोकादायक इमारती
 
पावसाळा नुकताच सुरुच झाला असला तरी इमारतींच्या पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. म्हणूनच धोकादायक इमारतीत वास्तव्यास असणार्‍या रहिवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही आता ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी या धोकादायक इमारतींची संख्या 337 होती. पण, या वर्षी त्यात आणखीन भर पडल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
मुंबईत किती, कुठे इमारती धोकादायक?
 
मुंबई शहर विभाग - एकूण (७० )‘ए’ प्रभाग - कुलाबा (४ ); ‘बी’ प्रभाग - सॅण्डहर्स्ट रोड (४ ); ‘सी’ प्रभाग- चंदनवाडी (१ ); ‘डी’ प्रभाग ग्रँट रोड (४ ); ‘इ’ प्रभाग - भायखळा (१२ ); ‘एफ’ दक्षिण प्रभाग - परळ (५ ); ‘एफ’ उत्तर प्रभाग - माटुंगा (२६); ‘जी’ दक्षिण प्रभाग - वरळी (४ ); ‘एफ’ उत्तर प्रभाग - दादर (१०);
पूर्व उपनगर एकूण (१०४)
‘एम’ पश्चिम प्रभाग - मानखुर्द (१६); ‘एम’ पूर्व प्रभाग - चेंबूर (१); ‘एल’ प्रभाग - कुर्ला (१२ ); ‘एन’ प्रभाग- घाटकोपर (२०); ‘एस’ प्रभाग - भांडुप (६); ‘टी’ प्रभाग - मुलुंड (४९);
पश्चिम उपनगर - एकूण (१६३)
 
'एच’ पूर्व प्रभाग-वांद्रे (९); ‘एच’ पश्चिम प्रभाग-वांद्रे (३०); ‘के’ पूर्व प्रभाग- अंधेरी (२८); ‘के’ पश्चिम प्रभाग- अंधेरी (४०); ‘पी’ दक्षिण प्रभाग - गोरेगाव (३); ‘पी’ उत्तर प्रभाग - मालाड (१३); ‘आर’ दक्षिण प्रभाग - कांदिवली (१०); ‘आर’ मध्य प्रभाग - बोरिवली (२२); ‘आर’ उत्तर प्रभाग - दहिसर (८)
 
उपकर प्राप्तीची घरे
 
अशी उपकर प्राप्तीची म्हणजे चाळींची घरे एकट्या मुंबईतच १४ हजारांपेक्षा जास्त आहेत. या इमारती भिंतधारित (श्रेरव लशरीळपस) तत्वावर आधारित व १०० वर्षांहूनही अधिक जुन्या आहेत. त्यामुळे साहजिकच या इमारतीतील रहिवाशांनाही पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. कारण, या इमारती कधी पत्त्यासारखा कोसळतील, याचा नेम नाही. या सर्व इमारतींची जबाबदारी सरकारने ‘म्हाडा’ प्राधिकरणाकडे सुपूर्द केली आहे. २०२२ मध्ये ‘म्हाडा’ने २१ चाळी ‘अतिधोकादायक’ म्हणून जाहीरही केल्या होत्या. अशा काही इमारती रिकाम्या करून ‘म्हाडा’ने कित्येक कुटुंबांना संक्रमण शिबिरात स्थलांतरितही केले होते. परंतु, वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरातच रहिवाशांना राहण्याची वेळी आली. कारण, ‘म्हाडा’कडून इमारतींच्या दुरुस्तीला लागलेला विलंब. तसेच धक्कादायक बाब म्हणजे, २२ हजार संक्रमण घरांपैकी जवळपास दहा हजार घरांमध्ये घुसखोरानी शिरकाव केलेला आहे.
 
पावसाळा आणि दरडींचा धोका
 
मुंबई शहर व उपनगरांत २४ पैकी २१ प्रभागांत दरडी कोसळण्याची एकूण २९१ ठिकाणे आहेत. त्यापैकी ७२ ठिकाणे ‘अतिधोकादायक’ म्हणून जाहीर झाली आहेत. भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, साकीनाका, खाडी नं. २ , कुर्ला, मलबार हिल येथे सर्वात जास्त दरडीची ठिकाणे आहेत. तसेच या दरडींच्या परिसरात लाखो लोक राहात असल्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी चेंबूर, वाशी नाका, भारतनगर, बंजारा तांडा येथे १९ घटना, विक्रोळी सूर्यनगरमध्ये दहा व भांडुपला एक असे एकूण ३० जणांचे दरड कोसळल्यामुळे बळी गेले होते. चेंबूर व विक्रोळी येथे ४० ते ४५ कुटुंबीयांना सुरक्षिततेकरिता हलवले गेले. घाटकोपरला सात ‘शेल्टर होम’ही उभारण्यात आली. त्यात आवश्यकता भासल्यास दरडग्रस्त कुटुंबाना स्थलांतरित करता येऊ शकते.
 
एकूणच काय तर धोकादायक इमारतींची समस्या दिवसेंदिवस मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. मुंबई महापालिकेकडून अशा इमारतींना नोटिसा पाठविल्या जातात. परंतु, रहिवाशांबरोबर पालिकेकडून होणार्‍या दुर्लक्षामुळे, विलंबामुळे या इमारती कोसळतात आणि जीवितहानी, वित्तहानीचा सामना करावा लागतो.
 
अशाच काही इमारतींची माहिती पुढीलप्रमाणे.
 
४९ वर्षे जुनी झालेली कुर्ला पूर्व येथील ही तीन मजली नाईकनगरची इमारत ‘धोकादायक’ म्हणून पालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली होती. ही इमारत दि. २७ जूनला कोसळली आणि १९ रहिवासी मृत्यमुखी पावले व १४ जखमी झाले.शीव-कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीतील जीटीबी नगरच्या २५ इमारतींना आठ वर्षांपूर्वी पालिकेने ‘धोकादायक’ म्हणून नोटीस पाठविली होती. या इमारतींमध्ये एकूण १२०० कुटुंबे वास्तव्यास होती. आता या इमारती तोडण्याकरिता रहिवाशांनीच कंत्राटदार नेमल्याचे समजते.
 
शहर विभागात दोन इमारती पडल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. एक घटना काळबादेवीला बदामवाडीत घडली, जिथे चार मजली ८० वर्षे जुनी इमारत ३० जून रोजी कोसळली. या इमारतीची दुरुस्ती सुरू होती. पण, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काळबादेवीला असंख्य इमारती मोडकळीस आल्या आहेत. पण, पालिका या इमारतींकडे दुर्लक्ष करते, असाच सूर कायम आहे. दुसरी पाच माळ्यांची एक इमारत शीव येथे कोसळली. ही इमारत दुरुस्तीकरिता रिकामी करण्यात आलेली होती. त्यामुळे जीवितहानी घडली नाही. मस्जिद बंदर स्थानकाजवळच्या ‘बेस्ट’च्या सबस्टेशनची भिंत (४६ वर्षे जुनी) ७ जुलैला कोसळली. मोटरमन जागृत असल्यामुळे हार्बर लाईन रेल्वेवरील होणारा मोठा अपघात टळला.
 
वांद्रे (प) येथे बहुमजली झोपडी दि. ८ जूनला कोसळून एकाचा मृत्यू झाला व १८ जण जखमी झाले. येथे बहुमजली झोपड्या कित्येक जणांनी अनधिकृतपणे बांधल्या आहेत व त्यातील अनेक घरे धोकादायक अवस्थेत आहेत.वरळीत तर जुन्या इमारतींची समस्या गंभीर बनली आहेत. याच पावसाळ्यात ‘बीडीडी’ चाळीत मध्यरात्री छत कोसळले. तिथेही इमारत रिकामी असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. म्हणूनच स्थानिकांनी पुनर्बांधणीची मागणी केली आहे.बोरिवलीतील सोडावाला लेन येथील शाळेच्या इमारतीला टेकूंचा आधार दिला आहे. या शाळेच्या ३६ वर्षे जुन्या इमारतीची फार दुरवस्था झाली आहे. परंतु, इमारत धोकावस्थेत नाही, अशी घोषणा पालिकेने केली आहे.
 
मुंबई महानगरातील इतर काही इमारती अपघाताच्या दुर्घटना
 
पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटत नाही तोच नेरूळ (नवी मुंबई) येथील सेक्टर १७ च्या जिमी पार्कमध्ये दि. ११ जून रोजी एक भीषण दुर्घटना घडली. सहाव्या मजल्यापासून तळापर्यंतच्या हॉलचे एकामागोमाग सर्व स्लॅब कोसळले. या अपघातात एकाचा मृत्यू व सात जण जखमी झाले. १९९४ साली पालिकेने इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. अग्निशमन दल व बचाव पथकाने तातडीने धाव घेऊन रहिवाशांच्या सुटकेचे काम केले.नवी मुंबईतील तळोजा येथील शिर्के कन्स्ट्रक्शनच्या चार मजुरांना घराचे बांधकाम करीत असताना व लिफ्ट खाली कोसळल्याने मृत्यू आला व दोन जण जखमी झाले.
 
कल्याण-डोंबिवलीतील अनेक धोकादायक इमारतींची (१,८७२ रहिवाशी) समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. दि. २८ जूनला कल्याणच्या रामबाग लेनमधील दुमजली इमारत कोसळली व एकाचा मृत्यू झाला. दि. २९ जूनला दोन माळ्याची कोशे इमारत कोसळली व ६० वर्षांच्या एका माणसाचा मृत्यू झाला व दुसर्‍या ५३ वर्षांच्या बाई जखमी होऊन गंभीर अवस्थेत आहेत.
मीरा-भाईंदर पालिकेने (MBMC) धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे व त्यातील कोणत्या इमारती तोडायला हव्यात, त्यावर काम सुरु आहे. या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घेतले जाणार आहे.शहरातील पालिका इमारतींची देखभाल करताना धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष होत आहे व त्यामुळे निरपराधी लोकांचा जीव टांगणीला लागत आहे.
 
पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यात इमारती पडणे, दरडी कोसळणे, रस्ते खचणे, वृक्ष उन्मळून पडणे, रस्त्यावर खड्डे पडणे, पूर येणे आदी बाबी होऊ नयेत, म्हणून मुंबईसह सर्वच महानगरपालिकांनी पावसाळ्यात देखभाल करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची विशेष व्यवस्था करणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0