मुंबई: मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. यामुळे रेल्वे पटरीवर पाणी साचले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा सुरु होईल . ठाण्याच्या स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला आहे. ठाण्यातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. तर ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांनाही उशिर लागत आहे. पाण्याचा निचरा करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे, पण पाऊस मुसळधार सुरू असल्याने पुन्हा पाणी साठा होत आहे.
आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाणे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल बंद झाली. सध्या प्रशासनाकडून लोकल बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर स्लो ट्रॅक सुरू होईल, याला अजून काही वेळ लागू शकतो. दरम्यान, ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेल्या बिघाडामुळे कळवा, मुंब्रा अशा स्थानकात देखील मध्य रेल्वेच्या धीम्या ट्रॅकवरील लोकल खोळंबल्या आहेत.
तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे आणि अंधेरीत बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले,आणि सांताक्रुज दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच पुन्हा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.