८ जून - पाऊस पाडवा!

08 Jun 2022 11:41:08
‘पाऊस पाडवा’ हा बा. सी. मर्ढेकरांच्या एका कवितेतील शब्द. गुढीपाडव्याला शकसंवताची आणि दिवाळी पाडव्याला विक्रमसंवताची सुरुवात होते. पण, भारतात अजून एक कालगणना प्रचलित होती, जिची सुरुवात सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की होत असे. ‘मृगसाल’ या सौर मृग नक्षत्राने आरंभ होणार्‍या या वर्षाचा पाडवा, आजचा ‘पाऊस-पाडवा.’
 
 

Rain
 
 
 
भारतासारख्या कृषिप्रधान देशात बहुतांश उद्योगधंदे शेतीवर अवलंबून असल्याने शेतीसाठी पावसाची नितांत आवशकता आहे. पूर्वीच्या काळी आजच्यासारखे हवामानाचे अंदाज बांधण्यासाठी उपग्रहीय तंत्रज्ञान नसल्याने निसर्गातील घटनांचे निरीक्षण करूनच पावसाचा अंदाज लावला जायचा.सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग म्हणजे ‘क्रांतीवृत्त’ होय. याच्या पार्श्वभूमीवर दिसणार्‍या तार्‍यांच्या आकृत्यांना प्राचीन भारतीयांनी २७ नक्षत्रे म्हटले. सूर्य या २७ नक्षत्रातून साधारण वर्षभरात प्रवास करतो. सूर्याचा हा प्रवास आणि त्यावेळी भारतात असणारे ऋतू यांचा सहसंबंध आपल्या पूर्वजांच्या लक्षात आला. २७ नक्षत्रांपैकी मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त या नऊ नक्षत्रात सूर्य असतो, तेव्हा भारतात पावसाळा असतो. ही ‘पावसाची नक्षत्रे’ म्हणून ओळखली जातात. म्हणून अकबर-बिरबलाच्या काल्पनिक कथांतील अकबराने विचारलेल्या ‘२७-९ किती’ या प्रश्नाचे बिरबलाने दिलेले बरोबर उत्तर ‘शून्य’ आहे. २७ नक्षत्रातून पावसाची नऊ नक्षत्रे जर वगळली, तर काही उरणारच नाही म्हणून शून्य!
 
यापैकी पहिल्या मृगशीर्ष नक्षत्रात ७/८ जूनला सूर्य प्रवेश करतो, तेव्हा भारतात मान्सूनचे आगमन होत पावसाळ्याला सुरुवात होते. दि. ८ जून ते २१ जून सूर्य या नक्षत्रात असतो. २२ जूनला सूर्य आर्द्रामध्ये प्रवेश करतो. यानंतर पुनर्वसू - ६ जुलै, पुष्य - २० जुलै, आश्लेषा - ३ ऑगस्ट, मघा - १७ ऑगस्ट, पूर्वा फाल्गुनी - ३० ऑगस्ट उत्तरा फाल्गुनी- १३ सप्टेंबर, हस्त - २७ सप्टेंबर, चित्रा - १० ऑक्टोबर असा सूर्याचा प्रवास होतो. या प्रत्येक नक्षत्रात पडणार्‍या पावसाचे स्वरूप वेगवेगळे असते. हस्त नक्षत्रापर्यंत पाऊस काहीसा ओसरत आलेला असतो. चित्रा आणि स्वातीमध्ये माघारीचा पाऊस पडू शकतो म्हणून कॅलेंडरमध्ये पावसाची मृग ते स्वाती अशी एकूण ११ नक्षत्रे दिली जातात. मेच्या अखेरीस मृगाआधीच्या रोहिणी नक्षत्रात वळीवाचा पाऊस पडू शकतो. या पावसात पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जात असल्याने याचा विचार फारसा केला नाही.
 
पावसाचे स्वरूप अत्यंत बेभरवशाचे असल्याने कधी कधी ही नक्षत्रे कोरडी जातात. पूर्वीच्या काळी आणि आतासुद्धा काही प्रमाणात शेतकरी सूर्याचा हा नक्षत्रप्रवेश पाहून आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करत असत. पंचांगात सूर्याच्या नक्षत्र प्रवेशासोबत त्याचे वाहनसुद्धा दिले असते. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल, त्या नक्षत्रापासून त्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्याची संख्या मोजायची, याला नऊने भागून जी बाकी मिळेल त्याप्रमाणे वाहन ठरते. म्हणजे
 
० - हत्ती
१ - घोडा
२ - कोल्हा
३ - बेडूक
४ - मेंढा
५ - मोर
६ - उंदीर
७ - म्हैस
८ - गाढव
 
यातील हत्ती, बेडूक आणि म्हैस या वाहनांना भरपूर पाऊस, तर उंदीर, गाढव, मेंढा यांना कमी पाऊस. मोर, कोल्हा आणि घोडा आल्यास मध्यम पाऊस पडेल, असे मानले जाते. हत्ती वाहन असल्यास अगदी मुसळधार पाऊस, मोर वाहन असल्यास फक्त नाचणारा पाऊस, कोल्हा वाहन असल्यास फसवा पाऊस असेल, असे मानले जाते. अर्थात हे फक्त ठोकताळे आहेत.
 
काही नक्षत्रात पडणार्‍या पावसाला शेतकर्‍यांनी वेगळी नावेदेखील ठेवली आहेत. पुनर्वसू नक्षत्रात पडणार्‍या जोरदार पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात. पुष्य नक्षत्रात पाऊस कमी जोराचा, पण सतत रिपरिप पडणारा म्हणून त्याला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात. मघेचा पाऊस जोरदार गडगडाट करणारा म्हणून ‘सासूचा पाऊस’, तर पूर्वा नक्षत्राचा संथ पडणारा शालीन पाऊस ‘सुनांचा पाऊस’ असे म्हटले जाते. आश्लेषा नक्षत्रातला ‘आसळकाचा पाऊस’, हस्त नक्षत्रात ‘हत्तीचा पाऊस’, उत्तरा फाल्गुनीचा ‘रग्बीचा पाऊस’ अशी पावसाची गमतीशीर नावे आहेत. या नक्षत्रांवरून आणि त्यात पडणार्‍या पावसाच्या स्वरूपावरून काही म्हणीदेखील ग्रामीण जीवनात प्रचलित आहेत. जसे की, ‘मृगाचे आधी पेरावे आणि बोंबेच्या आधी पळावे’, ’पडता हस्ती कोसळतील भिंती’, ’पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती’, ’न पडे उत्तरा, तर भात न मिळे पितरा,’ अशा म्हणी त्या त्या नक्षत्रातील पाऊस पडला, तर काय होईल याचे चित्र मांडतात.
 
पावसाच्या या नऊ नक्षत्रात वरुणराजाच्या आगमनाची नांदी देणारे म्हणून मृग नक्षत्राचे अधिक महत्त्व आहे. हा पाऊस वेळेत आला, तर पुढची सगळी गणिते जुळतात. म्हणून शेतकरी मृगाच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. मृगाचा पहिला पाऊस पडला की, ‘रेड वेलवेट माइट’हे लाल मखमली किडे प्रजननासाठी जमिनीतून वर येतात. दोन आठवड्यांनी आर्द्रा नक्षत्र लागून पावसाचा जोर वाढल्यावर हा किडा दिसेनासा होतो. सूर्य मृगात असतानाच दिसणार्‍या या किड्याला ‘मृगाचा किडा’ म्हणून ओळखले जाते. यांचे दिसणे शुभ शकुन मानून त्यांची पूजा केली जाते.
 
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातदेखील मृगाचे महत्त्व टिकून आहे. पण, मृग नक्षत्रात सूर्य असताना पाऊस सुरू होणे ही घटना कायम टिकणारी नाही. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सुमारे ६ हजार, ५०० वर्षांनी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात सूर्य आल्यावर पावसाळ्याला सुरुवात होईल. १३ हजार वर्षांनी ज्येष्ठा नक्षत्रात पावसाळ्यात सुरुवात होईल आणि २५ हजार, ८०० वर्षांनी पुन्हा मृग नक्षत्रात पाऊस सुरू होईल. तोपर्यंत ८ जूनलाच वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खात पावसाचे स्वागत करूया.पाऊस पाडव्याच्या शुभेच्छा!!!
 
- विनय जोशी
Powered By Sangraha 9.0