आम्हांला धर्म ठाउका नान्य!

20 Jun 2022 12:53:05
 
रमेश पतंगे
अधर्म करताना तुम्हाला कधी लाज वाटली नाही की पश्चाताप झाला नाही? या अधर्माला तुम्ही गोंडस नाव दिले, सेक्युलॅरिझम, उदारमतवाद, मानवी हक्क, धर्म सहिष्णुता, बहुविधता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, या शब्दांच्या साहाय्याने तुम्ही गेली ७० वर्षे देशात धुमाकूळ घातला. आता फासे उलटे पडले आहेत.
 
 
 
modiji
 
 
 
 
मध्यंतरी एका वाचकाने मला एका पुरोगामी पंडिताचा लेख पाठविला आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, मी या लेखाला सणसणीत उत्तर द्यावे. काही वेळा एखाद्या वाचकाचा फोन येतो, “रमेशजी! अमुक अमुक वृत्तपत्रात लेख आला आहे, संपादकीय आलं आहे, त्याचा समाचार घ्या.” यापैकी एकाही वाचकाची अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. त्याची दोन कारणे असतात. पहिले कारण असे की, आपल्या विचारधारेवर, कधी नरेंद्र मोदी यांच्यावर, तर कधी डॉ. मोहनजी भागवत यांच्यावर वेडवाकडं लिहिणारी एक गँग आहे. तिला मी ‘विझणारे दिवे’ असे म्हणतो. त्यात मी तेल घालण्याचे काही कारण नाही आणि दुसरे कारण असे की, असे कुणीतरी सांगितले आणि मी लिहिले असा माझा स्वभाव नाही. मला जे विषय स्फुरतात, त्याच विषयावर मी लिहीत असतो.
 
हे ‘विझणारे दिवे’ एकतर मेकॉलेपुत्र आहेत किंवा मार्क्सपुत्र आहेत. त्यांना भारत समजत नाही. भारताचे सामाजिक विज्ञान समजत नाही. भारताचा सनातन विचार त्यांच्या बुद्धीपलीकडचा असतो. पाश्चात्य सेक्युलॅरिझमच्या चश्म्यातून किंवा पाश्चात्य उदारमतवादी चश्म्यातून ते भारताकडे बघतात आणि त्यांना विकृत रुपच दिसते. मार्क्सपुत्र वर्गीय दृष्टिकोन ठेवून आणि आर्थिक निकषावर भारताच्या सर्व विषयांकडे पाहतो. त्यांनाही भारत समजत नाही. तुम्हाला भारत समजलेला नाही, असे जर त्यांना म्हटले, तर ते वाघासारखे चवताळून उठतात आणि खाऊ की गिळू असे करतात. भारत आम्हालाच समजलेला आहे. लोकशाही आम्हालाच समजलेली आहे. राज्यघटना आम्हालाच समजलेली आहे. सेक्युलॅरिझम आम्हालाच समजलेला आहे, अशा गर्वात ते ताठ असतात. भारतीय जनता म्हटलं, तर १९९६ पासून त्यांना लाथा मारीत आहे. २०१४ साली एक जबरदस्त कानाखाली खेचली. २०१९ साली दुसर्‍या कानाखाली खेचली आणि गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दोन्ही गालांखाली खेचली. पण शहाणपण सुचेल ते मेकॉलेपुत्र आणि मार्क्सपुत्र कसले?
 
एक मार्क्सपुत्र साधारणतः दर आठवड्याला न चुकता इतरत्र प्रकाशित झालेला त्यांचा लेख मला पाठवीत असतात. तो न वाचता ‘डिलिट’ करण्याचे काम मला करावे लागते. कारण, ते काय लिहू शकतात हे मला न वाचताच समजत असते. या मेकॉलेपुत्र आणि मार्क्सपुत्रांचे लेख ‘दि वायर’, ‘दि प्रिंट’, ‘फर्स्ट पोस्ट’, ‘ईपीडब्ल्यू’ इत्यादी माध्यमांतून सतत प्रकाशित होत असतात. लेखकांची नावे बदलतात, मांडण्याची शैली बदलते, पण आशय बदलत नाही. आशय तोच असतो. मोदी शासनाने गेल्या आठ वर्षांत काय केले, याबाबत या सर्वांचे १०० टक्के एकमत असते.
 
नरेंद्र मोदी हे हिंदू बहुसंख्यवाद निर्माण करणारे नेते आहेत. 
हिंदू बहुसंख्यवादामुळे मुसलमान आणि ख्रिश्चन यांचे अस्तित्व धोक्यात येत चालले आहे.
हिंदू धर्माचार्य आणि हिंदू राजकीय नेते मुसलमान आणि ख्रिश्चनांविरुद्ध अतिशय आक्रमक भाषेत बोलत असतात.
ही सर्व मंडळी भाजप विचारधारेची मंडळी आहेत. त्यांच्यामुळे देश लवकरच जबरदस्त हिंसाचारात परावर्तित होईल.
मुसलमानांचे कत्लेआम केले पाहिजे, असे काही हिंदू राजकीय नेते आणि धर्माचार्य सुचवित असतात, हे अत्यंत धोकादायक आहे.
 
नरेंद्र मोदी या सर्व विषयांच्या बाबतीत शांत असतात. ते कुणाचा निषेध करीत नाहीत. याचा अर्थ त्यांची या विषयाला मूक संमती आहे.
 
भारताची लोकशाही, राज्यघटना, राज्यघटनेची समानता, स्वातंत्र्य आणि सेक्युलॅरिझम ही मूल्ये धोक्यात येत चालली आहेत. हा कालखंड काळा कालखंड आहे.
 
हे झाले थोडक्यात निवेदन. वर दिलेल्या माध्यमांतील गेल्या चार-पाच वर्षांतील अनेक लेखांचा संक्षेप करायचा म्हटला, तरी तीन-चारशे पानांचा होईल. एवढे प्रचंड दळण दळले गेलेले आहे. हे सगळं वाचलं की, मला कवी मोरोपंतांच्या ‘तेव्हा गेला होता कुठे, राधासुता, तुझा धर्म?’ या काव्यपंक्तीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कुरुक्षेत्रावर कर्णाच्या रथाचे चाक भूमीत अडकते. ते चाक बाहेर काढण्यासाठी तो रथातून खाली उतरतो, तेव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणतो की, कर्णावर बाणांचा वर्षाव कर आणि त्याला ठार कर. तेव्हाच्या युद्धनियमाप्रमाणे निःशस्त्र वीरावर शस्त्र चालवायचे नसते. तो अधर्म आहे. म्हणून कर्ण म्हणतो,
 
“तूं स्वरथी, क्षितिवरि मी, तूं सायुध, मी अशस्त्रकवच रणीं,
न वधावें मज, जो मी गुंतुनि गेला असें रथोद्धरणीं॥”
 
तू रथावर आहेस, मी जमिनीवर आहे. माझ्याकडे शस्त्रे नाहीत, तेव्हा तू मला मारू नकोस. तू धर्माचे रक्षण कर, निःशस्त्रावर शस्त्र टाकणे हा अधर्म आहे, असे पुढल्या चरणात कर्ण म्हणतो. त्याला कृष्ण उत्तर देतो. ते सणसणीत उत्तर आहे. ते आपल्या सर्व पुरोगामी पंडितांना, मेकॉलेपुत्रांना आणि मार्क्सपुत्रांना तंतोतंत लागू होते.
 
इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. तेव्हा मेकॉलेेपुत्र आणि मार्क्सपुत्र काय करीत होते? ४२वी घटनादुरुस्ती आणली, या घटनादुरुस्तीने राज्यघटनेचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तेव्हा मेकॉलेपुत्र आणि मार्क्सपुत्र कुठे होते? घटनेच्या प्रस्तावनेमध्ये सेक्युलॅरिझम आणि समाजवाद हे शब्द १९७६ साली घुसडण्यात आले, तेव्हा आत्ताची बोंबाबोंब पलटण कुठे होती? काश्मीरमध्ये शेख अब्दुल्लांच्या तुरुंगात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचा संशयास्पद मृत्यू झाला, त्याची दखल बोंबाबोंब पलटणीने घेतली का? माधवराव शिंदे, राजेश पायलट, सुनंदा पुष्कर यांचे संशयास्पद मृत्यू झालेले आहेत, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी ही मानवतावादी मंडळी का करीत नाहीत? १९९० साली काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या भयानक हत्या झाल्या, त्यात मुले आणि स्त्रियांनाही मारण्यात आले, दोन अश्रू त्यांच्यासाठी या गँगने कधी डोळ्यांतून गाळले का? या गँगने ठरवून स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी मोहीम सातत्याने चालविली आहे. त्यांनी कधी पं. नेहरुंच्या कार्यकाळाची मीमांसा करण्याचे धाडस केले आहे का? देशाच्या फाळणीत दहा लाख हिंदू मारले गेले, त्याची जबाबदारी कुणावर? कधी त्यावर चार ओळी लिहिल्या आहेत का? 
हाच विषय कर्णाच्या बाबतीत मोरोपंतांनी असा मांडला आहे, कृष्ण म्हणे,
 
“राधेया, भला बरा स्मरसि आजि धर्मातें॥
नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवास, न स्वकर्मातें॥”
 
तुलाच धर्म बरा आठवला. नीच संकटात बुडाले असता दैवाला दोष देतात, पण स्वकर्माकडे लक्ष देत नाहीत. आमची सर्व मेकॉलेेपुत्र आणि मार्क्सपुत्रांची गँग आज छत्रहिन झालेली आहे. राजसत्तेचा मलिदा त्यांना मिळत नाही आणि म्हणून त्यांना राज्यघटना आठवते, तिचे काय होणार याची चिंता वाटते.
कृष्ण पुढे म्हणतो,
 
“जेव्हा तूं दुर्योधन, दुःशासन,
शकुनि एक-मति झालां,
कैसे कपट-द्युती चित्तीहि न धर्म
लंघितां भ्याला?”
 
दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि यांच्या गँगला जाऊन तू मिळालास आणि तुम्ही सर्वांनी मिळून द्युतात पांडवांना फसविले. तेव्हा गेला होता कुठे, कर्णा तुझा धर्म. ही मेकॉलेेपुत्र आणि मार्क्सपुत्रांची गँग अनेकवेळा भारतद्वेष करणार्‍या विदेशी लोकांशी हातमिळविणी करते. मग ते ‘न्यूयॉर्क टाईम्स’ असेल, ‘दि इकॉनॉमिक्स’ असेल, ‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ असेल, त्यांना मदत करुन मोदीविरोधाचे वातावरण जागतिक पातळीवरही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे काही करणे म्हणजे घटनाद्रोह आहे. राज्यघटना भारतनिष्ठ राहण्याची शिकवण देते. अशी कृत्ये करीत असताना त्यांना कसलीही लाज वाटत नाही. तेव्हा ते कोणत्या तोंडाने लोकशाही रक्षणाचा आव आणू शकतात?
कृष्ण पुढे म्हणतो,
 
“अभिमन्यु बाळ बहुतीं वधितां, त्वां वारिलें न तें कर्म,
तेव्हा गेला होता कोठें, राधासुता, तुझा धर्म?”
 
बाळ अभिमन्यूला तुम्ही सर्वांनी घेरुन मारले. त्या मारणार्‍या गँगमध्येही तू सामील झाला होतास, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता?
 
‘साबरमती एक्सप्रेस’मध्ये कारसेवकांना जीवंत जाळण्यात आले. त्या अगोदर मुलायमसिंग यादव यांनी अयोध्येत कोठारी बंधूंना गोळ्या घातल्या. त्यांच्या पोलिसांनी अशोक सिंघल यांचे डोके फोडले. ते रक्तबंबाळ झाले. श्रीगुरुजींना ठार करण्यासाठी त्यांच्या घरावर मोठा जनसमुदाय चालून गेला होता. सावरकरांना घेरून तुम्ही वाट्टेल तशी शस्त्रे चालविली आहेत, ही सर्व अभिमन्यू बाळाची उदाहरणे आहेत. तसे तुम्ही सगळे कर्णाचेच अवतार आहात. अधर्म करताना तुम्हाला कधी लाज वाटली नाही की पश्चाताप झाला नाही? या अधर्माला तुम्ही गोंडस नाव देता किंवा दिले, सेक्युलॅरिझम, उदारमतवाद, मानवी हक्क, धर्म सहिष्णुता, बहुविधता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, या शब्दांच्या साहाय्याने तुम्ही गेली ७० वर्षे देशात धुमाकूळ घातला. आता फासे उलटे पडले आहेत. तुम्हाकडे बघूनच कृष्ण म्हणतो,
 
“पूर्वी धर्म न रुचला,
त्यजिला निपटूनि जो जसा कुचला,
आतांचि बरा सुचला!
काळगृहा सर्व व्हा परासु चला॥”
 
जेव्हा तुला तुझा मृत्यू डोळ्यांपुढे दिसायला लागला, तेव्हा तुला धर्माची आठवण झाली. पण अन्य सर्व वेळी तो धर्म तू नाकारलास. मेकॉलेेपुत्र आणि मार्क्सपुत्र लोकशाहीचा गळा घोटला जात असताना आणि राज्यघटनेची पायमल्ली होत असताना नाचत होते आणि आता राज्यघटनेचे तंतोतंत पालन होत असताना त्या सर्वांना त्यात आपले मरण दिसू लागले आहे. म्हणून त्यांचा आक्रोश होत आहे. संविधानाचे रक्षण संविधानाच्या अंमलबजावणीत आहे. ‘धर्मोरक्षति रक्षितः।’ तसे ‘संविधान रक्षति रक्षितः’ असे म्हणावे लागते.
कृष्ण शेवटी कर्णाला म्हणतो,
 
“रक्षावा धर्म असा करिशी उपदेश,
तरि असे मान्य,
रक्षितसों धर्माति, आम्हांला
धर्म ठाउका नान्य॥”
 
अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण अशी ही काव्यपंक्ती आहे. धर्म रक्षणाचा उपदेश तू करतो आहेस, तर आम्ही तेच काम करीत आहोत. अर्जुन जे करतो आहे, तोच यावेळचा धर्म आहे. त्याशिवाय आम्हाला दुसरा धर्म मान्य नाही, असे कृष्ण कर्णास सांगतो. ज्यांनी या देशाच्या बुद्धीत विष कालविण्याचे काम गेली ७० वर्षे सतत केले, त्यांना घरी बसविणे. या विझणार्‍या दिव्यांना शांतपणे विझू देणे, त्यात तेल न घालणे हाच यावेळचा धर्म आहे आणि तेच संविधानाचे रक्षण आहे.
Powered By Sangraha 9.0