वटवटीला उत्तर मोदींचे देहूतील भाषण

16 Jun 2022 13:32:01

‘हिंदुत्व’ या शब्दाचा उच्चार न करताही ते राजकीयदृष्ट्या कसे व्यक्त करायचे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकायला हवे. १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे छोटेखानी भाषण झाले. हे भाषण म्हणजे हिंदुत्व राजकीय परिभाषेत कसे मांडायचे, याचा वस्तूपाठ आहे.
 
 
thakare
 
 
 
महाराष्ट्रात अधूनमधून हिंदुत्वाच्या चर्चेला उधाण येत असते. एक पक्ष म्हणतो, ‘आमचेच हिंदुत्व खरे.’ दुसरा लगेच म्हणतो, ‘तुमचे कसले खरे, ते बेगडी आहे.’ एक म्हणतो, ‘तुम्ही हिंदुत्व सोडले,’ दुसरा म्हणतो, ‘हिंदुत्व आम्ही धरले.’ एक म्हणतो, ‘तुमचे हिंदुत्व घंटाधारी आहे, आमचे गदाधारी आहे.’ एक म्हणतो, ‘आमचेच हिंदुत्व खरे.’ दुसरा म्हणतो, ‘तुमचे हिंदुत्व वाचाळ आहे.’ मतदारांचा विचार करता, त्यांना या वाचाळ चर्चेत कोणताही रस नसतो. त्यामुळे अशा चर्चेने जर कोणत्याही राजकीय पक्षाचा असा समज झाला असेल की, त्यामुळे आपल्या मतदारांत वाढ होईल तर ते दीवास्वप्न बघत आहेत, असेच म्हणायला पाहिजे.
 
‘हिंदुत्व’ या शब्दाचा उच्चार न करताही ते राजकीयदृष्ट्या कसे व्यक्त करायचे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकायला हवे. १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे छोटेखानी भाषण झाले. हे भाषण म्हणजे हिंदुत्व राजकीय परिभाषेत कसे मांडायचे, याचा वस्तूपाठ आहे. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भाषणात हिंदुत्व हे खरे की बेगडी, तुमचे खोटे की आमचे खरे, अशा प्रकारची कोणतीही परिभाषा वापरली नाही. ज्याला क्रिकेटच्या भाषेत ‘सिक्सर मारणे’ म्हणतात, अशी भाषणाची सुरुवात मोदी यांनी केली. ते म्हणाले, “श्री विठ्ठलाय नमः, नमो सद्गुरु ज्ञानदिपा.. नमो भास्करा ज्ञानमूर्ती. मस्तक या पायावरी या संताच्या..” देशाचा पंतप्रधान देहू तीर्थस्थळी येतो आणि ‘श्री विठ्ठलाय नम:’ हे म्हणतो, यापेक्षा दुसरे हिंदुत्व काय असू शकेल!
 
थोडे भूतकाळात जाऊया. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद उद्घाटनासाठी गेले. पंतप्रधान पं. नेहरु यांनी खूप थयथयाट केला. ते चुकूनही कुठल्या मंदिरात गेले नाही की, धार्मिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेमके उलटे आहे. २०१४ साली ते वाराणसीतून निवडणुकीला उभे राहिले. महादेवाचे दर्शन घेतले. गंगा घाटावर गेले. गंगेची आरती केली आणि आता मंदिर परिसर पूर्णपणे बदलून टाकलेला आहे. ही राजकीय कृती झाली. हिंदुत्वाचा जप न करता अशा कृती करायच्या असतात. शब्दांचे बुडबुडे सोडण्यात काय अर्थ आहे?
 
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ते गेले. पं. नेहरुंप्रमाणे त्यांनी ‘मी मंदिराच्या भूमिपूजनास कसा जाणार,’ हा विचार केला नाही. मंदिर, तीर्थस्थाने आणि तीर्थयात्रा या भारताच्या आस्था आहेत. त्यांचा आदर करणे, तेथे जाऊन नमन करणे हे हिंदुत्व आहे. त्यासाठी मी हिंदुत्ववादी आहे, अशी वटवट करण्याचे काही कारण नाही. ढीगभर पुस्तकांपेक्षा कणभर कृती ही पुरेशी असते.
 
संत तुकारामांचा उल्लेख करीत असताना ते म्हणाले, “देहू संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. देहूत पांडुरंग नांदतो. देहूत पांडुरंगाचा निवास आहे आणि प्रत्येक जण भक्तीने ओतप्रोत संत स्वरुप आहे.” संत तुकारामांचा उल्लेख त्यांनी ‘जगद्गुरु’ असा केला, ‘हिंदू गुरू’ असा केला नाही, ‘महराष्ट्र गुरू’ असा केला नाही, ‘संत तुकारामांच्या जन्मजातीचे गुरू’ असा केला नाही, तर ते ‘जगद्गुरु’ आहेत असा केला. ‘जो भंग पावत नाही, तो अभंग’, असे सांगून ते म्हणाले, “तुकारामांची अभंगवाणी अमर आहे. भारत शाश्वत आहे. कारण, ही संतांची भूमी आहे. प्रत्येक वेळी मार्गदर्शनासाठी सत्पुरुष जन्माला आले आहेत.” ’मोदींना हे सांगायचे आहे की, आम्ही भारत म्हणून जे काही आहोत, ते कोणत्याही राजघराण्यामुळे नाही, कोणत्याही पंतप्रधान घराण्यामुळे नाही, तर ज्ञानदेव, तुकाराम, संत कबीर, नामदेव अशा अगणित संत आणि सत्पुरुषांमुळे आहोत.
 
हिंदुत्व म्हणजे भेदभाव विरहीत वागणूक. संत तुकोबारायांचा-
 
उंचनिंच कांहीं नेणे भगवंत।
तिष्ठे भाव भक्ती देखोनियां॥
 
या अभंगातील एक चरण म्हणून दाखविला. अभंग मोठा आहे आणि तो अनेक गायकांनी फार उत्तम रितीने गायला आहे. आपल्यापैकी अनेकांनी तो ऐकलाही असेल. हा उपदेश म्हणजे समतायुक्त समाजरचनेचा तुकोबारायांचा आदेश आहे. मोदी म्हणाले, “हा उपदेश तितका उपयुक्त धर्मासाठी तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही आहेच. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतो. त्यातूनच सरकारच्या योजनांचा विना भेदभाव लाभ सगळ्यांना मिळतो आहे.” ‘सबका साथ सबका विकास, सबका सहयोग’ हे मोदी यांच्या राज्यकारभाराचे सूत्र आहे. हिंदुत्व म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार, सर्वांच्या विकासाचा विचार, समाजातील तळागाळातील माणसाचा विचार. हा विचार करायचे सोडून तुम्ही हिंदुत्ववादी की आम्ही हिंदुत्ववादी, या वटवटीला काही अर्थ नाही.
 
या विकासाचे अभंगसूत्र नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले-
 
जे का रंजले गांजले
त्यांसि म्हणे जो आपुले॥
तोचि साधु ओळखावा।
देव तेथेंचि जाणावा॥
 
या अभंगावर भाष्य करताना ‘जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा विकास करणे, हाच अंत्योदय आहे, असे मानून समाजातील सर्वांत खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण हाच उद्देश ठेवून काम करता, तेव्हा हा अभंग सार्थ होतो.’ संत तुकारामांनी ज्याप्रमाणे शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाचा विचार आणि त्याला जवळ करणे, हा विषय मांडला आहे, त्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी अंत्योदयाची संकल्पना मांडली. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी हीच संकल्पना मांडली आणि डॉ. बाबासाहेबांच्या सर्व कार्याचा हेतूच समाजाच्या अंतिम पंगतीतील माणसाला सशक्त करण्याचा होता. हे काम राजसत्तेच्याद्वारेगेली आठ वर्षे ‘हिंदुत्व’ या शब्दाचा उच्चार न करता नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यांचे कार्य हिंदुत्वाचे कार्य आहे, हे न सांगताच समाजातील सर्वसामान्य माणसाला लगेचच समजते. राजकारणात तोंडालपणा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा कृती करण्यात शक्ती वापरली, तर मतदारांना हिंदुत्व म्हणजे काय, हे उत्तम प्रकारे समजेल.
 
आषाढी यात्रेचा मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. त्याला जोडूनच मथुरा, जगन्नाथपुरी येथेही मेळावे होतात. समाजाच्या गतिशीलतेसाठी या यात्रा फार महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात,“ ‘एक भारत, एक राष्ट्र’ यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यमयी ठेवावी. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवे.” या अवतरणातील ‘विकास’ आणि ‘विरासत’ दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायला हवे, हे वाक्य किती अर्थपूर्ण आहे! स्वातंत्र्यानंतर आपली विरासत म्हणजे वारसा विसरण्याचाच प्रयत्न झाला. आम्हाला सर्वस्वी नवीन भारत उभा करायचा आहे, या भ्रमात आणि गर्वात राज्यकर्ते राहिले. आपला वारसा आणि इतिहास विसरून आपल्याला उभे राहता येणार नाही. आपल्याला नवीन राष्ट्र घडवायचे नसून सनातन पायावर राष्ट्राचे पुनर्निर्माण करायचे आहे, हा संघ विचार आहे.
 
नवीन राष्ट्र निर्माण आणि राष्ट्रीय पुनर्निर्माण या दोन भिन्न संकल्पना आहेत. नवीन राष्ट्र या संकल्पनेत आपल्या सनातन वारशाला काही स्थान नाही, म्हणून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा विरोध केला गेला. हे पर्व आता संपले आहे. आता आपली विरासत कायम ठेवून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने राष्ट्रीय पुनर्निर्माण घडवून आणायचे आहे. हे कार्य नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे सातत्याने करीत आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही उल्लेख केला. तसाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही उल्लेख केला. या दोघांशिवाय राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. अंदमानच्या काळकोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर तुकारामांचे अभंग म्हणत असत, याची आठवण त्यांनी करून दिली आणि डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींशी निगडित पंचतीर्थांचा विकास कसा सुरू आहे, याची माहितीही दिली.
 
‘असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे.’ तुकाराम महाराजांच्या अभंगातील हे चरण मोदींनी सांगितले. अतिशय अर्थपूर्ण असे हे चरण आहे. जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य वाटणारी गोष्ट शक्यतेत आणण्यासाठी तेवढेच कष्ट करावे लागतात, असे तुकोबारायांना म्हणायचे आहे. सरकारच्या असंख्य योजना आहेत. त्या १०० टक्के यशस्वी व्हायच्या असतील, तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पर्यावरण, जलसंवर्धन, स्वस्थ भारत, जैविक शेती, अशा अनेक विषयांचा त्यांनी उल्लेख केला आणि हे सर्व यशस्वी व्हायचे असेल, तर त्यात सगळ्यांच्या सहभागाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
 
हे हिंदुत्व आहे. ही हिंदुत्वाची तात्त्विक चर्चा नाही, तर त्याची कार्यक्रमांतून होणारी अभिव्यक्ती आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर अशा अभिव्यक्तीचे शेकडो विषय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृतिस्थळे आम्हाला का जीवंत करता येत नाहीत? संतांची स्मृतिस्थळे सर्व आधुनिक पद्धतीने का विकसित करता येत नाहीत? समाजसुधारकांची यथोचित आणि भव्य स्मारके का उभी राहत नाहीत? महाराजांच्या किल्ल्यातील एखादा किल्ला त्याच्या पूर्ववैभवाने का सजविता येत नाही? हे सर्व विषय हिंदुत्वाचे विषय आहेत. वटवटीच्याऐवजी याकडे लक्ष दिले, तर राजकीय पक्षांचे मतदार नक्कीच वाढतील.
Powered By Sangraha 9.0