आला पावसाळा…प्रकृती सांभाळा!

15 Jun 2022 12:59:17
पटकी (कॉलरा) हा दूषित पाण्यामुळे होणारा एक जलजन्य आजार आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी अत्यल्प असल्याने कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरते. इतर जलजन्य आजारांच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक असते. व्‍हीब्रीओ कॉलरा ओ-1, व्‍हीब्रीओ कॉलरा नॉन ओ-1 (एल टॉर), व्‍हीब्रीओ कॉलरा ओ 139 या जीवाणूमूळे हा आजार होतो.
 

Pavsala 
 
कॉलरा आजारामुळे सुरुवातीला जुलाब सुरु होतात व त्‍यानंतर उलट्याही होतात. या आजारामध्‍ये निर्जलीकरण अत्यंत वेगाने होते. कॉलरा (पटकी) ची लागण तुरळक व साथउद्रेक स्वरुपात होते. आजाराचा प्रसारही वेगाने होतो. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घेणे गरजेचे आहे.
 
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो त्यामुळे आपण काळजी घेऊन या आजारापासून दूर राहू शकतो. माझे आरोग्य माझी जबाबदारी, यादृष्टीने पावसाळ्यात पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी पाण्याची विशेष काळजी घेऊन हाताळणी केली पाहिजे व जागरूक असले पाहिजे त्यामुळे संभाव्य धोके टाळले जाऊ शकतात
 
-डॉ.कैलास बाविस्कर, उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे

आजारावर परिणाम करणारे घटक :
 
व्‍हीब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतड्याला संसर्ग झाल्‍याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयोगटामधील स्त्री-पुरुषांमध्‍ये आढळतो. रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्त्रोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. असे अशुद्ध पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनि:सारणाच्‍या योग्‍य पद्धतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्त्रोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.
 
रोगाची लक्षणे :
 
पटकीचा अधिशयन कालावधी काही तास ते 5 दिवस इतका आहे. पाण्‍यासारखे किंवा तांदळाच्‍या पेजेसारखे वारंवार जुलाबउलट्या, हृदयाचे ठोके वाढणे, तोंडाला कोरड पडणे, तहान लागणे, स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे, अस्‍वस्‍थ वाटणे अशा प्रकारची लक्षणे पटकीच्या रुग्णात आढळतात.

उपचार :
 
जुलाब-उलट्या चालू असताना जलशुष्‍कता नसल्यास क्षारसंजीवनीचा वापर करावा. तसेच पेज, सरबत इत्‍यादी घरगुती पेयांचा वापर करावा.जलशुष्‍कतेची लक्षणे असल्‍यास क्षारसं‍जीवनी व घरगुती पेय द्यावी. तीव्र जलशुष्‍कता असल्‍यास रुग्‍णास नजीकच्‍या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे. झिंक टॅब्लेटमुळे अतिसाराचा कालावधी 25 टक्क्याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते. जलशुष्‍कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिजैविकांची योग्‍य मात्रा देण्‍यात यावी.

प्रतिबंधात्‍मक उपाय
 
कॉलरावर नियंत्रणासाठी शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. पावसाळ्यात वैयक्तिक स्‍वच्‍छता राखणेदेखील महत्त्वाचे आहे. खाण्‍यापूर्वी व स्वयंपाकापूर्वी, बाळाला दूध व अन्न भरविण्‍यापूर्वी, शौचानंतर, बाळाची शी धुतल्‍यानंतर, जुलाब असलेल्‍या रुग्‍णांची सेवा केल्‍यानंतर हात नेहमी साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावेत. साबण उपलब्‍ध नसेल तर आपले हात राखेनेही स्‍वच्‍छ धुवावेत. मानवी विष्‍ठेची योग्‍यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. रुग्‍णांवर त्‍वरित उपचार करुन घ्यावे. बालकाचे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण अतिसाराच्‍या नियंत्रणासाठी आवश्‍यक आहे.
 
पटकी रोगाचा प्रादुर्भाव अधिकाधिक कमी करुन तो सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभगातर्फे लागणग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्यात येते. म्हणून आजाराची लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला तात्काळ सूचना द्यावी.पिण्याच्या नियमितमणे निर्जंतुकीकरण करावे व रोगाचे त्वरित निदान होण्याच्या दृष्टीने साथीनंतर रुग्णांवर तात्काळ औषधोपचार करावे. पाणी गाळून, उकळून आणि शुद्ध करून प्यावे. नागरिकांनी वरीलप्रमाणे कॉलरा आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. असे केल्यास या आजारावर योग्य नियंत्रण ठेवता येईल.
Powered By Sangraha 9.0