वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता

08 May 2022 16:16:42
महाराष्ट्रात तापमानाने गेल्या अनेक दिवसांपासून चाळीशी पार केली. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले.सूर्य आग ओकत असल्याने व तापमानात वाढ झाल्यामुळे डोळ्यांचा त्रास वाढल्याचे जळगाव जिल्ह्यात दिसत आहे.
 

eye 
डोळ्यांच्या त्रासामुळे नेत्ररुग्णांची संख्या प्रकर्षाने वाढलेली दिसून येत आहे.यात मुख्यतः घराबाहेर पडणारी तरुण मुले-मुली यांची संख्या वयोवृद्ध रुग्णांपेक्षा जास्त आहे.दर दहा रुग्णांमागे ३ ते ४ रुग्ण उष्णतेमुळे डोळ्यांच्या समस्या घेऊन येत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ सांगतात. उन्हाळ्यात डोळ्यांची योग्य काळजी निगा राखल्यास डोळ्यांच्या अनेक तक्रारीपासून आपण सुटका करुन घेऊ शकतो. डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे. याकरिता योग्य आहार, स्वच्छता, डोळ्यांचे संरक्षण याकडे लक्ष दिले पाहिजे.
 
उन्हाळ्यात डोळ्यांना इजा होण्याची कारणे-
 
अ) फोटोकेराटायटीस - उन्हाळ्यात झाडांची पानगळ होते व हळूहळू उन्हाचा तडाखा वाढतो आणि डोळ्यांच्या तक्रारी सुरु होतात . याचे मुख्य कारण म्हणजे अतिनिल किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणार्‍या इजेस फोटोकेराटायटिस म्हणतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या प्रामुख्याने जाणवतात. यातच डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ शकतो. त्यासाठी नेत्ररोगतज्ञांना दाखविणे गरजेचे असते. तसेच नेत्रपटलास यु.व्ही. लाईटमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो. यासोबतच पापण्यांच्या त्वचेसही सनबर्न होऊ शकते.
 
ब) व्हर्नल कंजक्टीवायटीस - उन्हाळ्यात होणार्‍या झाडांची पानगळ, हवेत पसरणारे परागकण तसेच हवेतील धूळ यामुळे डोळ्यांना ऍलर्जी होते. यात डोळ्यांना खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे आढळतात. ४ ते १० वर्ष वयोगटातील मुलांना जास्त ऍलर्जी होते. त्यास व्हर्नल कंजक्टीवायटीस असे म्हणतात. जळगाव शहरात धुळीचे प्रमाण जास्त असल्याने पायी चालणार्‍यांमध्ये तसेच दुचाकीस्वारांना जास्त त्रास होत असल्याचे दिसून येते.अशावेळी नेत्रतज्ञांना दाखवून वेळीच औषधोपचार करणे गरजेचे असते.
 
क) कॉम्प्युटर कव्हजन सिंड्रोम - टी.व्ही., कॉम्प्युटर, मोबाईलचा जास्त वापर करणार्‍यांना हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रुंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडण्याची दाट शक्यता असते. डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, खाज येणे, पाणी येणे असा त्रास सुरु होतो. याला कॉम्प्युटर कव्हजन सिंड्रोम असे म्हणतात. अशावेळी नेत्रतज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असते.
 
कॉम्प्युटरवर काम करणार्‍यांनी उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी?
 
१) २०-२०-२० नियम- दर २० मिनिटांनी, २० फुट कॉम्प्युटर स्क्रीनपासून दूर बघणे, २० वेळा पापण्यांची उघडझाप करणे. २) स्क्रीन डोळ्यांच्या उंचीच्या खाली ४ ते ५ इंच असावी. ३) कॉम्प्युटर स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर २२ ते २८ इंच ठेवावे. ४) मॉनिटर स्क्रीनवर अँटीरिफ्लेक्टर स्क्रीन लावणे जास्त चांगले. ५) सलग दोन तास कामानंतर १५ मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्यावी. ६) रुममधील दिव्यांची व्यवस्था अशी असावी की स्क्रीन जास्त प्रकाश परावर्तीत करणार नाही.
 
बचावासाठी काय काळजी घ्यावी?
 
घराबाहेर पडतांना टोपी किंवा रुमाल, स्कार्फ व सनग्लास वापरावा.पुरेसे पाणी प्यावे,परिपूर्ण आहार घ्यावा.पाणीदार फळे खावी.डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा टिकण्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृत्रिम अश्रूंचा ड्रॉप वापरावा. व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचे सेवन करावे- जसे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई. डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या सनग्लासेसचा उपयोग करा. त्वचेचे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षण करण्यासाठी सनस्क्रीमचा जसा वापर केला जातो त्याचप्रकारे या गॉगलमुळे अल्ट्राव्हायोलेट किरण डोळ्यांना इजा पोहचवू शकत नाही. सध्या शहरातील विविध भागात फुटपाथवर गॉगल विक्री केली जाते मात्र या गॉगलच्या काचा डोळ्यांना घातक ठरु शकतात. त्यामुळे गॉगल स्वस्त मिळत असेल तरीही त्यापासून सावध राहावे.
 
पोहणार्‍यांनी काळजी घ्यावी
 
उन्हाळ्यात पाण्यात पोहतांना गॉगलचा वापर करावा. तरण तलावांच्या पाण्यात क्लोरिन व अन्य काही रसायने मिसळली जातात त्यामुळे डोळे जळजळणे, डोळ्यांतून पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे पोहतांना पोहण्यासाठीचा गॉगल वापरावा. तलावाबाहेर आल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे. पाणी आणि बर्फावरुन अल्ट्रा व्हायोलेट किरण परावर्तित होतात त्यामुळे उन्हाळ्यात वॉटर स्पोर्टला जात असाल तर सनग्लासेसचा वापर जरुर करावा .अशाठिकाणी डोळ्यांची काळजी घेतली नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीत डोळे लाल होऊ शकतात. तसेच डोळ्यांमधील कॉर्निया (स्वच्छमंडल) ला इजा होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.
 
समर कॅम्पमध्ये काळजी घ्या
 
उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने समर कॅम्पचे बेत आखले जातात. या ठिकाणी चुलीवर पदार्थ शिजवले जातात .अशावेळी वाहत्या वार्‍याने चुलीतून उडणारी राख, ठिणग्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. त्यासाठी प्रोटेक्टीव्ह ग्लासेस वापरणे योग्य ठरते. तसेच ज्या व्यक्ती कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असतील त्यांनी आगीजवळ जाणे टाळावे अन्यथा कॉन्टॅक्ट लेन्सला होणार्‍या उष्णतेच्या परिणामामुळे कॉर्नियाला इजा होऊ शकते.
 
 
- डॉ.धर्मेंद्र पाटील (नेत्ररोग तज्ज्ञ),
पाटील डोळ्यांचे हॉस्पिटल,
१४, जानकी नगर, नेरी नाका जवळ, जळगाव.
९४२३१८७४८६
Powered By Sangraha 9.0