चोपडा : नागपुरे बंधूंच्या 'आनंद कलाक्षर - अक्षरांची शाळा' तर्फे कु. स्नेहल वसंत नागपुरे हिच्या 'अब्सट्रॅक्शन' या अमूर्त चित्रशैलीतील चित्र प्रदर्शनास प्रारंभ करण्यात झाला आहे. ३ मे पासून सुरु झालेले हे प्रदर्शन १५ मे पर्यंत जळगाव येथील रिंग रोडवरील पी. एन. गाडगीळ अँड सन्स या दागिन्यांच्या भव्य दुकानातील प्रशस्त चित्र दालनात सुरू राहणार आहे.
स्नेहल वसंत नागपुरे या युवा चित्रकर्तीच्या 'ॲब्सट्रॅक्शन' या पहिल्याच चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन चुंबकीय चिकित्सा तज्ञ प्रल्हाद पवार (जळगाव), चोपडा येथील ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन, कैलास आर्ट्सचे संचालक कैलास विसावे, पी. एन. गाडगीळ अँड सन्स, जळगाव शाखेचे व्यवस्थापक संदीप पोतदार, सर्टिफाइड ऑडिटर प्रकाश चौधरी (भुसावळ), चोपडा तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, सचिव अर्जुन कोळी, डॉ. सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी अमूर्त चित्रशैलीची वेगळी ओळख असून या चित्रशैलीचा खास असा चाहता वर्ग असल्याचे सांगून स्नेहल नागपुरेला या क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कलाशिक्षक वसंत नागपुरे, पंकज नागपुरे, अर्जुन कोळी, संजय बारी, अजय बारी, श्रेयस पवार, जयश्री नागपुरे, शितल नागपुरे, संगीता चौधरी, वंदना चौधरी, शुभांगी पवार, राखी चौधरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
स्नेहल नागपुरे शास्त्रीय संगीतातील गायन विशारद असून घोडगाव येथील सी. बी. निकुंभ हायस्कूलचे पर्यवेक्षक तथा कलाशिक्षक वसंत नागपुरे यांची सुकन्या आहे. ती कॅलिग्राफी व मॉडर्न कॅलिग्राफीच्या क्लासेसमधून युवा कलावंतांना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असते. बुधवार वगळता दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या प्रदर्शनादरम्यान चित्रांची विक्रीही करण्यात येणार आहे. रसिकांनी चित्र प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन पीएनजी आर्ट गॅलरी व नागपुरे बंधूतर्फे करण्यात आले आहे.