चिरंजीव महाअवतार भगवान परशुराम

03 May 2022 15:20:49
भगवान परशुराम म्हणजे महाविष्णूंच्या १० महाअवतारांमधील अग्रगण्य, चिरंजीव असा एकमेव, क्रमाने सहावा असलेला, भारतीय राष्ट्रीयत्वास ‘समृध्दी आणि वैशिष्ट्य’ प्राप्त करून दिलेला अवतार. त्यांचे एकूण चरित्र लक्षात घेण्याजोगे आहे. अगदी - आतापर्यंतच्या पाच अवतारांची गणना काल्पनिक सदरात करणार्‍या आधुनिक इतिहास लेखकांनीसुध्दा या लोकविलक्षण पुरूषाचे ऐतिहासिक महत्त्व मान्य केले आहे. जन्म भृगुकुलात म्हणून ‘भार्गवराम’, आपल्या कार्यकर्तृत्वाने कुलाची कीर्ती वाढवल्याने या कुलाचे मुकुटमणी ठरले. त्यामुळे त्यांना भृगुकुलभूषणही म्हटले जाते. देवी रेणुका मातेचे पुत्र म्हणून ‘रेणुकानंदन’. या अवताराच्या कार्याचे विवेचन जाणून घेण्यासाठी त्यांचे पुराणात दिलेल्या चरित्राचे देखील या निमित्ताने स्मरण करावे लागेल.
 
 
 

art pic 
 
 
 
चंद्रवंशामध्ये गादी नामक राजाच्या सत्यवती कन्येसाठी मागणी घालतांना राजाने घातलेल्या अटीप्रमाणे, तपःसामर्थ्याने एक हजार शामकर्ण अश्व आणून दिल्याने सत्यवतीबरोबर ऋचिक ऋषींचा विवाह झाला. कान्यकुब्ज देशाच्या या गादी राजाला पुत्र संतान नव्हते आणि त्यांच्या जावयासही पुत्र संतान नव्हते. प्राचीन काळी ‘हवा त्या प्रकारचा पुत्र’ व्हावा म्हणून पत्नीला खास चरू (यज्ञिय पदार्थ) भक्षण करण्यास देत. मातेलाही पुत्र व्हावा ही सत्यवतीची इच्छा. सत्यवतीच्या मातेसाठी क्षत्रिय गुणयुक्त चरू सत्यवतीसाठी ब्राह्मण गुणयुक्त चरू तयार केला. परंतु सत्यवतीच्या मातेकडून चरूची अदलाबदल केली गेली. ही गोष्ट ऋचिकांना तपोबलाने ज्ञात झाली. नवरा परत आल्यावर सत्यवतीला ब्राह्मण परंतु क्षत्रिय वृत्तीचा मुलगा होईल. तर सत्यवतीच्या मातेला क्षत्रिय परंतु ब्राह्मण स्वभावाचा मुलगा होणार हे सत्यवतीला समजताच तिने घाबरून नवर्‍याचे पाय धरून क्षमा मागितली. ऋचिकांनी मी पुत्र आणि पौत्र यात फरक समजत नाही. पण तू म्हणते तर तुझे म्हणणे असेल तर तसे होईल. ऋचिकांचा (व सत्यवतीचा) नातू महाविष्णूंचा सहावा अवतार क्षात्रतेज व ब्राह्मतेज हे ईश्वरी गुण घेऊनच येणार. यथाकाली सत्यवती प्रसूत झाली, पुत्र जन्मला तो जणूकाही धगधगीत अग्नी आहे असे वाटे- म्हणून जमदग्नी असे नामकरण करण्यात आले. तो तेजस्वी व बलवान होऊ लागला. वेदवेदांग यात पारंगत झाला पण वृत्तीने तपस्वी व अत्यंत रागीट होता. पुढे त्यांनी तपोबलाने या क्रोधाचा पूर्ण त्याग केला. सत्यवतीच्या आईचा जो मुलगा झाला तो मोठ्या मनाचा आणि सर्वांशी मैत्री असलेला झाला. त्याचे नाव विश्वामित्र (हे त्याने सार्थक केले) चरू प्रभावाने व तपोबलाने तो ब्रह्मर्षी पदाला प्राप्त झाला.
 
तपोनिष्ठ व उदार बुध्दी असलेल्या जमदग्नीचे ठायी भगवान शंकराचे तेज होते. रेणू राजाची कन्या रेणुका, ती उमेचा अंशावतार होती. रेणुका - जमदग्नीचा विवाह झाला. साध्वी व धर्मानुकूल रेणुकेची साथ मिळाल्याने गृहस्थाश्रमात असुनही जमदग्नीची तपसाधना वाढत गेली. त्यांना पाच मुले झाली. त्यापैकी सर्वात धाकटा राम (विष्णूचा अवतार) होता. बालपणापासून तेजस्वी, शस्त्रविद्येत कुशल, वेदांचा पूर्ण अभ्यास, माता पित्यांविषयी परमादर, ब्रह्मचर्य हे त्याचे खास वैशिष्टय. धनुर्वेद त्यांनी हस्तगत केला. अग्नीची पूजा हा तर नित्यक्रम. पितृसेवा हा त्याचा स्वभाव बनला. याचा आसमंतात मोठा दरारा होता. खांद्यावर परशु घेऊन तो नेहमी हिंडत असे त्यामुळे तो ‘परशुराम’ या नावानेे विख्यात झाला. तपश्चर्यने त्यांनी श्रीगणेशाला प्रसन्न केल्याने परशुविद्या मिळविली. त्याप्रमाणे श्री गणेशांनी आत्मस्वरूपही प्रदान केले.
 
हैह्य राजवंशांचा अधिपती कार्तविर्यार्जुन भगवान दत्तात्रेयांचा भक्त होता. त्याने दत्तात्रयांपासून विलक्षण वर प्राप्त करून घेतले होते. १) लढाईच्या प्रसंगी हजार हात असावेत व ते इतके हलके असावेत की त्याचा भार शरीरास वहावा लागू नये. २) आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरूषापासुन मृत्यू यावा. नर्मदातीरावर असलेल्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमापासून जवळच महिष्मती (आजचे महेश्वर) चा अधिपती कार्तवीर्यार्जुन राजा हा १७ औक्षहिणी सैन्यासह शिकारीसाठी गेला असता देवर्षी नारदांनी स्वतः जमदग्नी ऋषींच्या आश्रमाचे वर्णन ऐकविल्याने तो पाहण्याचा मोह व ओढ आणि कुतुहलामुळे आश्रमात पोहोचला. अतिथी सत्कार परायण महर्षी जमदग्नींनी त्यांचे स्वागत केले. भोजनाच्यावेळी सर्व पदार्थ कामधेनूकडून मागून सर्वांची भोजनाची व्यवस्था केली.
 
जमदग्नींनी त्यावेळी इंद्राकडून मिळालेल्या कामधेनूची हकीकत सांगितली- आणि तिच्यामुळेच आपण अतिथी सत्कार, भोजन करू शकतो असे सांगितले. त्याचा मोह झालेल्या राजाने, इतर ऋषींनी समजावूनही त्याकडे दुर्लक्ष करून बळजबरीने कामधेनूला नेले. परशुरामाच्या कानावर ही हकीकत जाताच त्यांनी महिष्मती गाठून राजास युध्दास आव्हान देवून त्याचा पराभव करीत वध केला. जमदग्नीने त्या वधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी परशुरामास तपाचरण करण्यास सांगितले. दरम्यान, सहस्त्रार्जुनाच्या मुलांनी आपल्या पित्याच्या वधाचा बदला घेण्यासाठी महर्षी जमदग्नींचा आश्रम उदध्वस्त करून त्यांच्यावर २१ वार करीत त्यांना ठार केले. परशुरामांना ही हकीकत कळताच ते संतप्त झाले. मातेनेही त्यांना ‘कुरू नि:क्षत्रीयाम महिम !’ अशी आज्ञा केली. जी स्वयं क्षत्रियकन्या ती पृथ्वी निःक्षत्रिय कर अशी आज्ञा देते- यातला भावार्थ लक्षात घ्यावा. भार्गवांनी २१ वेळा युध्द केले आणि सर्व पृथ्वी त्यांच्या अधिपत्याखाली आली. अनाचार आणि अत्याचार्‍यांच्या निर्दालनाचे त्यांचे कार्य पूर्ण झाले होते. त्यांनी अश्वमेध यज्ञ करून सारी भूमी व संपत्ती कश्यप ऋषींना अर्पण केले. या कार्यापूर्वी नियतीने टाकलेली पित्याचे औध्वविहीक पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी मातेच्या आज्ञेनुसार अवधूत दत्तात्रयांचे सहकार्य घेऊन पार पाडली.
 
जमदग्नींच्या निधनानंतर मातेने सूचित केल्याप्रमाणे जमदग्नींचा देह व रेणुका माता यांना कावडीतून घेऊन अंत्येष्ठीची जागा शोधत असता अखेर भार्गवराम माहूर गडावर पोहोचले. तेथे आकाशवाणी झाली- परशुरामा येथेच दत्तात्रेयांच्या सहकार्याने सर्व शास्त्रयुक्त विधीने पित्याचा अंत्यसंस्कार करावा. याठिकाणी जवळ दत्तात्रयांचा आश्रम आहे. त्यांच्या सहकार्याने पित्यावर परशुरामाने अंत्यसंस्कार केले. रेणुकेने सहगमन केले. तेजस्वी रेणुका महापतीव्रता आहे. आपले मन राजाची जलक्रीडा पाहतांना क्षणभरासाठी का होईना भ्रष्ट झाले ही दाहक जाणीव तिला होती. आपल्याला झालेल्या मृत्यूदंडाची अंमलबजावणी इतर सर्व (चारही) मुलांनी नाकारली, याची तिली लाज वाटली. परशुरामांनी ती अंमलबजावणी केली त्याबद्दल परशुराम हाच धन्य मुलगा अशी तिची भावना होती. मृत्यूदंड देणार्‍या पती जमदग्नीबद्दल कोणतेही विकार तिच्या मनात न येता त्यांच्याबद्दल पूज्यभाव कायम होता. मृत्यूनंतर (परशुरामाने मागितलेल्या वरदानाने) जमदग्नींच्या संकल्पाने ती जिवंत झाली. (मुलांनाही आज्ञा न ऐकल्याने त्यांनी ठार केले होते, त्यांनाही जिवंत केले.) यानंतर तिचे व्यक्तिमत्व अधिकच झळाळून शुध्द होवून तेजस्वी झाले. आपल्या तीव्र ज्ञानमय कल्पनाशक्तीने परशुरामांना मार्गदर्शन करून श्री दत्तभगवंताची कृपा मिळवून दिली. पुराणात रेणुका माता, परशुराम व श्रीदत्त गुरू यांच्यातील संवादात श्री दत्तगुरूंनी ब्राह्मणांचा घात करणार्‍या उन्मत्तांचा नाशच होईल व परशुरामास तू माझा परममित्र आहेस हे निश्चित. तू केलेस ते फार चांगले केलेस. तुझ्या प्रतिज्ञा सत्यात उतरतील असे म्हटल्याचा उल्लेख आहे. मातेच्या सती जाण्याच्या घटनेमुळे परशुरामाने मातेची एकदा भेट व्हावी, दर्शन व्हावे, अशी दत्तात्रेयांना प्रार्थना केली. तेव्हा रेणुका मातेनी परशुमांना दर्शन दिले. त्यास्वरूपाचे दर्शन आज माहूरला घडते. रेणुका मातेच्या माहूर येथील मंदिराच्या डाव्याहातास खालील बाजूस परशुरामाचे मंदिर आहे. तर समोरच्या पर्वतराजीत श्रीगुरूंचे निवासस्थान आहे. एक प्रसंग भावार्थ रामायणात आहे. परशुराम जनक राजाकडे भोजनासाठी आले. भोजन झाल्यावर सीता धनुष्य घेऊन खेळत आहे हे पाहताच ही तर आद्यशक्तीच आहे, असे म्हणून त्यांना रामावताराची कल्पना आली. दाशरथी रामाचे अवतार कार्य सुरू होत आहे - हे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष राम आणि परशुराम यांच्यात पुढे जेव्हा युध्दाचा प्रसंग आला - त्यावेळेस त्यांच्या कार्यासाठी आवश्यक वैष्णवी धनुष्य (तेजपरंपरा) परशुरामांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्या चापाला बाण लावावा असे परशुमांनीच रामाला म्हटले - आणि वैष्णवी परंपराच त्यांच्या स्वाधीन केली. यानंतर परशुराम महेंद्र पर्वतावर आश्रम बांधून तेथे तप करावयास गेले. समुद्र मागे हटवून त्यांनी नवी भूमी तयार केली. या भूमीला आजतागायत ‘परशुराम क्षेत्र’ अशी संज्ञा आहे. उन्मत्त झालेल्या शासकांकडून (क्षत्रिय) अन्याय, अत्याचार सहन न करण्याची प्रवृत्ती हा परशुराम अवताराचा विशेष होय.
 
आजही या चिरंजीव अवताराची स्थाने आढळतात - ती नर्मदा - रेवा संगम परिसर, अरूणाचलम, कुलू मनाली, सप्तकोकण वगैरे सर्व भारतभर आढळतात. आधुनिक काळात ब्रह्मेद्र स्वामी (मराठवाडा), अक्कलकोटचे स्वामी गजानन महाराज हे परशुराम भक्त होवून गेलेत. त्यांना प्रत्यक्ष भगवान परशुरामांचे दर्शन घडल्याचे व गुरूंचे कार्य आयुष्यभर त्यांनी केल्याचे दिसते. पेठे परशुराम (चिपळूण) हेच परशुरामांचे वसतिस्थान, येथे नित्य सायंकाळी ते निवासास येतात, अशी श्रध्दा आहे. क्षात्रबलापेक्षा ब्रह्मबल अधिक प्रभावी असते. ब्रह्मतेजो बलंबलम् | भार्गवः सार्वभौमः ॥
 
- अनिल श्रीकृष्ण तारे, जळगाव
९४२०६९६३६८
Powered By Sangraha 9.0