हत्तीरोग एकदिवसीय सामूहिक औषधोपचार मोहिमेमध्ये सहभाग घेण्याचे अर्पणा पाटील यांनी केले आवाहन

23 May 2022 18:56:12
नंदुरबार : २५ मे ते ५ जुन या कालावधीमध्ये नवापूर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या हत्तीरोग एक दिवसीय सामूहिक औषधोपचार मोहिमेमध्ये सर्व लोकांनी सहभाग घ्यावा व गोळयांचे सेवन करावे, अशी माहिती पत्रपरिषदेत हिवताप अधिकारी अर्पणा पाटील यांनी दिली.
 
 
aprna
 
 
अर्पणा पाटील म्हणाल्या की, हत्तीरोग हा वुचेरेरीया बॅनक्रॉफटी या परोपजीवी जंतुमुळे होणारा आजार असून या आजाराचा प्रसार क्युलेक्स प्रकारच्या डासांमुळे होतो . दुषित व्यक्तिच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु या डासामार्फत निरोगी व्यक्तिच्या शरीरात प्रवेश करतात. नवापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना एकाच वेळी डी.ई.सी. व अलबेंन्डाझॉल गोळया खाऊ घातल्यामुळे दुषित आणि वाहक व्यक्तिंच्या शरीरातील मायक्रोफायलेरीया (हत्तीरोगाचे जंतु ) मरतात व त्यामुळे निरोगी लोकांना हत्तीरोग होण्याचा धोका टळतो.
यासाठी नवापूर तालुक्यातील प्रत्येक पात्र व्यक्तिने आरोग्य विभागाने दिलेल्या गोळया खाणे आवश्यक आहे. या गोळया एकच दिवस दुपारी किंवा रात्री जेवण करुन एकाच वेळी द्यावयाच्या आहेत. तसेच आरोग्य विभागामार्फत या मोहिमेसाठीचा औषधसाठा, प्रशिक्षण देण्यात येत असून जनजागृतीही करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0