यंदाच्या आषाढी पायी वारीत सहभागी होणार ६ लाख भाविक

22 May 2022 16:56:10
पुणे :  यंदा 2 वर्षांनंतर पुन्हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा पायी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी 40 टक्के भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज सांगितला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी यात्रेत 21 जून दिवशी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. राज्यातील कोरोना संकट संपुष्टात येताच पुन्हा सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे होतांना दिसून येत असून सध्या महाराष्ट्राला पंढरपुरच्या वारीची उत्सुकता लागली आहे.
 
 
vitt hal
 
 
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे यांनी सांगितले की, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, भोजन, विश्रांती, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी झाली असून यावर्षी माऊलीच्या पालखीसोबत 6 लाखांपेक्षा जास्त वारकरी चालत येणार आहेत.
 
यासाठी पाण्याचे अधिकचे टँकर आणि अधिकची आरोग्यव्यवस्था करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली आहे. पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी माऊलींच्या पालखीच्या मार्गाची पाहणी करणार आहे.
Powered By Sangraha 9.0