सॉलव्हन्सी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एक हजाराची लाच घेताना कनिष्‍ठ लिपीक व एक खाजगी इसमास अटक

13 May 2022 18:16:40
शहादा (नंदुरबार) : जिल्हा कारागृहात अटकेत असलेल्या नातेवाईकांच्या जामीन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सॉलव्हन्सी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एक हजाराची लाच मागितली. ही लाच स्वीकारणाऱ्या शहादा (Shahada) तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

lach
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार  तक्रारदार यांचा नातेवाईकांविरुद्ध दाखल गुन्ह्यात सध्या ते जिल्हा कारागृह नंदुरबार (Nandurbar) येथे अटकेत आहेत. नातेवाईकांच्या जामीन करण्यासाठी त्यांना सॉलव्हन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. तक्रारदाराने सॉलव्हन्सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शहादा तहसील कार्यालयात अर्ज केला असता तहसिल कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पंकज दिगंबर आयलापुरकर यांनी सॉलव्हन्सी प्रमाणपत्र देण्याच्या कामात मदत करण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपये लाचेची  मागणी केली.
 
सापळा रचून पकडले रंगेहाथ
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत आज (१३ मे) कृष्णा सुदाम जगदेव (रा. भादे, ता. शहादा) या खाजगी इसमास एक हजार रुपये साक्षीदारांना समोर स्वीकारताना रंगेहात पकडले. पंकज दिगंबर आयलापुरकर, कृष्णा सुदाम जगदेव या दोघांना शहादा तहसील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई नाशिक (Nashik) परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक नंदुरबार राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, समाधान वाघ, पोलीस हवालदार विलास पाटील, पोलीस नाईक अमोल मराठे, ज्योती पाटील, विजय ठाकरे, संदीप नावाडेकर, देवराम गावित व जितेंद्र महाले यांच्या पथकाने कार्यवाही केली.
Powered By Sangraha 9.0