नंदुरबार : येथे जिजामाता शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे नुकतेच ‘मराठी विज्ञानसाहित्य स्वरूप, व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई दिलीपराव मोरे उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत लक्ष्मी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या डॉ. मोना चिमोटे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पुणे विद्यापीठाचे डॉ.संजय ढोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे शिरपूर येथून डॉ.फुला बागुल, डॉ.रविंद्र शिंदे, पुणे विद्यापीठ तर प्रा.चिन्मय घैसास गोवा विद्यापीठातून उपस्थित होते.
चर्चासत्राचे प्रास्ताविक सादर करतांना कार्यक्रमाचे समन्वयक तथा प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी " मराठी विज्ञान साहित्याची आजवरची वाटचाल, त्याचे स्वरूप, जागतिकीकरणानंतर विज्ञान साहित्य कुठे व कसे बदलत गेले, त्यातील जाणीवा अधिकाधिक मानवकेंद्री कशा होत गेल्या यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शोभाताई मोरे यांनी महाविद्यालयाच्या वतीने एका अभिनव चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. विज्ञानसाहित्यावर झालेल्या चर्चेच्या मंथनातून उपस्थित संशोधकांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी शोधनिबंधांचे वाचन केले. यात डॉ सुरेश मालचे नाशिक, डॉ. हर्षदा पुराणिक,संतोष पाटील, हर्षदा बोरगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.