दीपिका पल्लिकलनं 'वर्ल्ड डबल्स स्कॉश' स्पर्धेत पुनरागमन केलं. दीपिकानं जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये वर्ल्ड डबल्स स्कॉश स्पर्धेत पुनरागमन केलं. पुनरागमनानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत तिनं २ गोल्ड मेडल पटकावली आहेत. तिने सौरव घोषाल सोबत पहिल्यांदा मिक्स डबल्स स्पर्धेचं विजेतेपद पटाकवलं. भारताच्या या जोडीनं इंग्लंडच्या एड्रियन वालर आणि एलिसन वाटर्स या जोडीचा ११-६, ११-८ असा सरळ पराभव केला.
इंग्लंडच्या जोडीनं भारतीय खेळाडूंसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. अखेर दीपिका-जोशला जोडीनं निर्णायक क्षणी खेळ उंचावत फायनलमध्ये ११-९, ४-११, ११-८ असा विजय मिळवला. दीपिका पल्लिकलनं ऑक्टोबर २०१८ नंतर पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत भाग घेतला होता. पुनरागमनानंतर दीपिकानं मिक्स डबल्स स्पर्धा जिंकल्यानंतर दीड तासांमध्येच महिला डबल्स स्पर्धेतही गोल्ड मेडल पटकावले. दीपिकानं जोशना चिनप्पाच्या मदतीनं इंग्लंडच्या सारा जेन आणि एलिसन वाटार्स जोडीचा पराभव केला. ही मॅच चांगलीच रंगतदार झाली. यावर्षी राष्ट्रकूल आणि आशियाई स्पर्धा आहेत. त्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड डबल स्कॉश स्पर्धेत दीपिका, जोशना आणि घोषाल या भारतीय त्रिकुटानं दमदार सुरूवात केली आहे. भारताचे हे सर्व खेळाडू गेल्या 15 वर्षांपासून सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत. त्यांचा आता भारत सरकारच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीममध्ये पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे.