नागपूर : येथील पोलिसांनी छापा टाकून हवालाची ४ कोटी २० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतलं आहे. झोन ३ चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासोबतच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत महाल परिसरात इंद्रायणी साडी सेंटरच्या मागे कुंभारपुऱ्यात एका घरी पोलिसंनी छापा टाकत ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी ३ हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतले आहे. नेहाल सुरेश वडालिया (वय ३८, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय ४५) आणि शिवकुमार हरिशचंद दिवानीवाल (वय ५३) दोघेही रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत. गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यावधींची रोकड नागपुरात घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळनंतर पोलिसांनी छापा टाकत ४ कोटी २० लाखांची अवैध रोकड जप्त करण्याची कारवाई केली. कारवाई झाली ते वडालियाचे निवासस्थान आहे. पोलिसांची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती, याप्रकरणी अजून काही हवाला व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आहेत.
सध्या तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. अजूनही यामध्ये काही लोक सामील असण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकूण ४ कोटी २० लाख रुपये जप्त केले आहेत. हा पैसा नागपुरच्या बाहेरील तसेच काही पैसा नागपुरमधील व्यक्तींचा असण्याची शक्यता असल्याची माहिती देखील राजमाने यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणाची सविस्तर चौकशी सुरु आहे. सखोल चौकशीनंतर आणखी माहिती समोर येईल अशी माहितीही यावेळी राजमाने यांनी दिली.