शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, पुण्यात बारावीचे बोगस परीक्षा केंद्र?

19 Mar 2022 16:06:59
पुणे : बारावीच्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या टिळक रस्त्यावर एका इमारतीमध्ये राव जूनियर कॉलेज आहे. याठिकाणी बारावीचं अधिकृत परीक्षा केंद्र आहे. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी परीक्षा केंद्रच नसल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निदर्शनास आली. याठिकाणी परीक्षा केंद्राचा कोणताही ठावठिकाणा नाही. पुण्यामध्ये शहरात चक्क एक बारावीचं परीक्षा केंद्रच गायब झालं आहे. बारावीच्या परीक्षा केंद्राचा हा गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणला आहे.

rao IIT
 
 
विशेष म्हणजे बोर्डाच्या वेबसाईटवर याच पत्त्याची नोंद आहे. परंतू त्याठिकाणी परीक्षा केंद्रच नाही. मनसे कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणल्यानंतर परीक्षा केंद्र शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सोलापूर बाजार, कॅम्प परिसरातील एका खासगी क्लासमध्ये ही बारावीची परीक्षा घेतली जात असल्याचं आढळलं.
 
याठिकाणच्या पर्यवेक्षिकेकडे याबाबत अधिक विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. एकूणच परीक्षेतील गैरप्रकारांना प्रोत्साहन देणार हा प्रकार असल्याचा संशय येत आहे.
 
धक्कादायक बाब म्हणजे शिक्षण मंडळाला या गैरप्रकाराची काहीच माहिती नाही. विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
 
त्यामुळे राज्यात परीक्षांबाबात शिक्षण मंडळाचे अधिकारी गंभीर आहेत की नाही. असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे.
Powered By Sangraha 9.0