होलिकोत्सव : भारत हा संस्कृती प्रधान देश आहे.भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्वाचे असे स्थान आहे. या सणांपैकी होळी एक सण.भारतीयां शिवाय नेपाळी लोकांचा हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. फाल्गुन पौर्णिमेला असणार हा सण निसर्गातील बदललेली अवस्था निर्देशित करणारा सण आहे. होळी या सणाला थंडीचे दिवस म्हणजे हिवाळा हा ऋतू संपलेला असतो.थंडीने त्रासलेली प्राणी,झाडे,फुले ही जोमात,उत्साहात आलेली असतात.झाडांची पाने गळून नवीन पानांनी झाडे बहरलेली असतात.अर्थातच वसंत ऋतूच्या आगमनाचा हा काळ असतो. होलिकोत्सव फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा ते फाल्गुन पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस साजरा केला जातो. विविध प्रांतानुसार या सणाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.होलिकोत्सव / रंगोत्सव भारतात तसेच भारताबाहेरही वेगवेगळ्या प्रांतांत, समाजात आपल्या पूर्व परंपरांनुसार साजरा केला जातो. उत्तर भारतात होरी,दोलयात्रा तर,गोवा आणि महाराष्ट्रात शिमगा,होळी,हुताशनी महोत्सव अन् होलिका दहन आणि दक्षिणेत ' कामदहन असे म्हटले जाते.
होळी हा आनंदाचा,उत्साहाचा आणि रंगांचा सण आहे. त्याचप्रमाणे यामागे काही पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे निस्सीम भक्त होते.त्यांच्या मुखातून सदैव "नारायण,नारायण " हा जप सुरू असायचा.त्यांचे पिटा हिरण्यकश्यपू यांना भगवान विष्णूचे नाव कदापिही सहन होत नसे.त्यांनी प्रल्हादाला सर्व तऱ्हेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूचे नाव उच्चाराने थांबविले नाही. त्यामुळे अहंकाराने पूर्ण असलेल्या हिरण्यकश्यपूने क्रोधित होऊन आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला मांडीवर घेऊन जिवंत अग्नीत बसण्याचे फर्मावले.होलिका हिला वरदान मिळाला होता की,ती अग्नीत भस्म होणार नाही.म्हणून तो पेटत्या अग्नीत बसली परंतु,प्रल्हादाची भगवान विष्णुंवरील असलेल्या निस्सीम श्रद्धेमुळे प्रल्हाद सुखरूप बचावला आणि याउलट होलिका जाळून भस्म झाली.कारण ती हे विसरली की,त हे वरदान मिळाले त्यावेळी सुद्धा सांगण्यात आले होते की, जर तिने या वरदानच गैरवापर केला तर ती स्वतः भस्म होईल. अशाप्रकारे भक्त प्रल्हादाचे रक्षण करणाऱ्या या अग्नीचे स्मरण म्हणून देखील होलिका दहन केले जाते.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी रात्री समिधा म्हणून शंकू आकारात काही जुनी लाकडे, शेणकुटे,गोवऱ्या इत्यादी रचून "होलिकायै नमः |" आदि मंत्रोच्चारात जाळली जातात.पेटलेल्या होळी भोवती लोक प्रदक्षिणा घालतात.त्या होळीला नारळ अर्पण करून पूर्ण पोळीचा नैवेद्य दाखवतात. आणि मनातील सर्व अहंकार, द्वेषभाव,त्रिदोष,दुष्ट मनोवृत्ती होळीच्या अग्नीत जळून नष्ट व्हावी असा प्रण घेतात. होळीची पुजा कुटुंबाच्या सुख - शांतीसाठी चांगली शुभ मानली जाते.होलिका दहनावेळी उच्चारल्या जाणाऱ्या मंत्रात ,होलिका म्हणजे राक्षसीण होलिका नसून फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून असते.
हा सण उत्तर भारतात थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे.उत्तर भारतात हा सण भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित करून साजरा केला जातो.असे म्हटले जाते की,श्रीकृष्ण लहान असताना त्यांना मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीणीला पाठवले असता तिने श्रीकृष्णाला आपले विषारी दूध पाजण्यासाठी सुरुवात केली तेव्हा श्रीकृष्णाने तिचे कपट ओळखले व मायावी ऊर्जेने तिला भस्म केले अशी अख्यायिका आहे .म्हणून फाल्गुन पौर्णिमा या दिवशी पूतना या राक्षसिणीला जाळण्यात आले .त्यामुळे उत्तर भारतीय लोक होळी पूतना राक्षसिणीला जाळून साजरी करतात.
दक्षिण भारतात होळी हा सण प्रामुख्याने काम देवासाठी साजरा केला जातो.असे म्हटले जाते की, देवाधि-देव म्हणजेच महादेव जेव्हा तपश्चर्या करत होते.त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी व शंकराचे लक्ष पार्वती मातेकडे खेचण्यासाठी काम देवांनी प्रयत्न केला व त्यांची तपश्चर्या भंग झाली.तेव्हा त्यांना खूप राग आला व भगवान शंकराने आपला तिसरा डोळा उघडून भस्म केले. अशी अख्यायिका आहे म्हणून, दक्षिण भारतीय लोक या दिवसाच्या आठवणीने कामदेवाचा पुतळा बनवतात व जाळतात अशी प्रथा पूर्वी पासून दक्षिण भारतात चालत आलेली आहे असे सांगितले जाते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो.या दिवशी लोक एकमेकांना गुलाल,रंग लावून रंगांची उधळण करतात.त्याचप्रमाणे होळीच्या पाचव्या दिवशी अर्थात फाल्गुन पंचमीला रंगपंचमी हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.या दिवशी सर्व भांडण,वैर विसरून एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते.आपल्या आयुष्यात किव्वा वर्षभरात येणारे दुःख,अशांती,उदासीनता या गोष्टींना विसरून सुख,समाधान,शांती,समृद्धी आणि आनंद या गोष्टींना आमंत्रण देण्याचा दिवस म्हणजे रंगपंचमी होय. म्हणून आपल्या रंगपंचमी या उत्सवाबद्दल एक कथाही सांगितली जाते की, फाल्गुन पंचमी म्हणजे श्रीकृष्ण पंचमी या दिवशी भगवान श्रीकृष्ण हे गोकुळातील गोपी तसेच सर्व स्त्रिया,पुरुष यांना एकत्र आणून त्यांच्या सोबत रंगपंचमी व रास दांडिया खेळायचे.भगवान श्रीकृष्णाच्या मते मानवी जीवन हे सप्तरंगाने, संगीताने,परस्पर प्रेम संबंधाने व आत्मविश्वासाने भरलेले आहे.म्हणून रंगपंचमी हा सण सर्वांनी एकत्र येणे,बंधुभाव आणि एकतेने आनंद साजरा करणे हाच या मागचा उद्देश आहे.रंगपंचमी ही आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंग घेऊन येते म्हणून,आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होळी,धुळवड व रंगपंचमी या उत्सवाला विशेष महत्त्व दिले जाते.
भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा,प्रथा,चालीरीती आहेत. हिंदू धर्मात अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.हिंदू धर्म आणि संस्कृतीतील सण,उत्सव,अनेक विधी यांना केवळ धार्मिक,सांस्कृतिक नाती तर,वैज्ञानिक महत्त्वही तेवढेच आहे.निसर्गाच्या कालचक्रानुसार आपल्याकडे अनेक सण- उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ.हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ.निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ.थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते.यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते .वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्विकारावा यासाठी होळी साजरी केली जाते.होलिका दहनाचे पौराणिक व सांस्कृतिक महत्त्व आपल्याला माहित आहे.होळी दहनामुळे प्रज्ज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो.थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
होलिकादहनानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्याची पद्धत आहे.यामध्ये अनेकविध रंगांचा वापर केला जातो .अबीर आणि गुलाल यांचा वापर हा त्वचेसाठी चांगला असतो.या गोष्टीला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे.रंगीत पाणी,रंग खेळताना गुलालाचा वापर केल्याने त्वचेला उत्तेजन मिळते.थंडीमुळे कोरडी पडलेली त्वचा गुलाल आणि अबीरमुळे टवटवीत होते,असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.तसेच धुळवडीला रंग खेळताना शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणावर होते.त्यामुळे चलनवलन होऊन शरीरातील सूस्तपणा नाहीसा होतो.यातून आपल्याला सकारात्मकता मिळते.याचा उपयोग मानसिक शांतता आणि मानसिक ताजेपणा येण्यासाठी होतो असेही सांगितले जाते.शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी रंगांचा वापर महत्त्वाचा असल्याचे अनेक डॉक्टर, फिजिशियन यांचे म्हणणे आहे. होळी सणाच्या निमित्ताने लोकगीते ,पारंपरिक गाणी म्हणण्याची परंपरा आहे.मोठमोठ्याने गाणी म्हटल्यामूळे शरीराला त्याचा उपयोग होतो.शरीरात ऊर्जा निर्माण होते.थकवा,निराशा दूर होऊन सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण होते, असेही सांगितले जाते.
अशा प्रकारे भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेनुसार चालत आलेल्या सण उत्सवांना मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. प्रत्येक सण/उत्सव हा माणसाला काही ना काही संदेश देऊन जातो . व मानवी आयुष्य आणखी रंगतदार बनवतो.म्हणून परंपरेनुसार चालत आलेल्या आपल्या सांस्कृतिक चालीरीतींची जोपासना सर्वांनी करायला हवी.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव .
ज्ञान मंथन संयोजक,