India Vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर होणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉला मागे टाकू शकतो. या विक्रमापासून विराट कोहली केवळ 23 धावा दूर आहे.
श्रीलंकाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू उत्साहात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसऱ्या कसोटी विजय मिळवून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. तर, या सामन्यात विराट कोहलीकडं मार्क वॉकचा विक्रम मोडण्याची संधी आहे. मार्क वॉनं कसोटी क्रिकेटच्या 128 सामन्यात 8 हजार 29 धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीनं 100 कसोटी सामन्यात 8007 धावांचा टप्पा गाठलाय. ज्यात ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली 23 धावा करताच मार्क वॉला मागे टाकेल.
विराट कोहलीनं बंगळुरू कसोटीत शतक झळकावलं तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अनेक खेळाडूंना मागे टाकू शकतो. या बाबतीत तो सध्या 32 व्या क्रमांकावर आहे. शतक झळकावल्यानंतर तो मार्क वॉ तसेच गॅरी सोबर्स आणि जेफ्री बॉयकॉट यांना मागे टाकू शकतो.
दरम्यान, विराट कोहलीनं गेल्या अनेक महिन्यांपासून एकही शतक मारलं नाही. त्यानं 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात अखरेचं कसोटी शतक झळकावलं होतं. या सामन्यात विराट 136 धावांची खेळी केली होती. त्यानंतर विराट कोहलीनं आतापर्यंत कसोटी सामन्यात एकही शतक केलं नाही. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली शतकाचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा चाहत्यांकडून केली जात आहे.