नागपूर : सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 12 मार्च रोजी होणार आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. प्रमुख पाहुणे राहतील. प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेलज्येष्ठ कलाकार व समीक्षक समर नखाते, कलरब्लाईन्ड चित्रपटाचे दिग्दर्शक धोंडीबा बाळू करांडे हे उपस्थित राहतील. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या लोकप्रिय जयंती चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नलावडे आणि चित्रपटाची चमू देखील उपस्थित राहणार आहे. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन आणि नागपूर महापालिका यांच्यातर्फे नागपूरच्या मेडिकल चौकातील व्हिआर सिनेपोलीस चित्रपटगृहात चित्रपटांची मेजवाणी राहणार आहे. शनिवारी 12 आणि रविवारी 13 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत चित्रपटांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. या महोत्सवाला विदर्भ साहित्य संघ, पुणे फिल्म फाउंडेशन आणि सप्तक यांचे सहकार्य आहे.
16 चित्रपट दाखविले जाणार
यंदाच्या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपुरात तयार झालेला जयंती प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्थानिक चित्रपट निर्मिती आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागचा हेतू आहे. याशिवाय देश आणि परदेशातील विविध उत्कृष्ट चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहे. जयंती, गोदावरी आणि कलरब्लाइंड हे तीन मराठी चित्रपट, सेमखोर, ऑस्कर नामांकित जयभीम, बाय हर, बिहेडिंग लाईफ हे भारतीय चित्रपट याशिवाय वॉर्स, अ हिरो, पॅरलल मदर्स, नीत्रम, सॉन्ग ऑफ द सोल, वेटलँड, बर्ड अँटलस, रेड रॉकेट आणि माईक्साबेल असे 16 चित्रपट दाखविले जाणार आहे.
कलाकार दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी
गानकोकिळा लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येईल. चित्रपट आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या पंडित भीमसेन जोशी, प्रसिद्ध गीतकार साहिर लुधयानवी आणि सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येतील. महोत्सवात अनेक मराठी, हिंदी व आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहेत. कलाकार, तज्ज्ञ मंडळी आणि दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधण्याची संधी नागपूरकर रसिकांना मिळणार आहे.