किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा

05 Feb 2022 17:51:24
पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच सोमय्या यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे सोमय्या यांना त्या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला.
 
 

kirit 
 
 
पुणे महापालिका परिसरात नेमकं काय घडलं?
 
दुसरीकडे, सोमय्या हे महापालिका परिसरात असतानाच काही शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही काही शिवसैनिकांनी केला. इतकंच नाही तर सोमय्या यांच्या गाडीपुढे काही शिवसैनिक आडवे पडले. तर काहींनी त्यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. एक महिला तर सोमय्या यांच्या गाडीवर चप्पूल फेकून मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजप नेते उपस्थित करत आहेत.
 
 
 
दरम्यान, शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केलं आहे. पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं ट्वीट सोमय्या यांनी केलं आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकार तुमचं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे.
 
किरीट सोमय्या हे आज पुणे दौऱ्यावर होते. खासदार शिवसेना खासदार संजय राऊत यांचचे पार्टनर सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते, तशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली होती. या दौऱ्यावेळीच सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा दावा सोमय्या यांनी केला  आहे.
Powered By Sangraha 9.0