सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे : भाग-३

28 Feb 2022 12:16:30
सावरकर हे एक संयमी, दूरदर्शी आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यामुळे देश पारतंत्र्यात असताना आपल्याला गुलामगिरीत जखडणार्‍या परराष्ट्राविरूद्ध अपरिहार्य म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला असला, तरी त्याच सावरकरांनी भारत स्वतंत्र होताच आपल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे विसर्जन करून आता स्वतंत्र भारतात आपण सर्वांनी हिंसक वृत्तीचा त्याग करून लोकशाही नि अहिंसक मार्गांचा उपयोग करून सत्तापरिवर्तन करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या संविधानाने दिलेल्या 'मतदान' या अधिकाराचाच केवळ उपयोग करावा, असे बजावून सांगितले होते. सावरकरांना नाहक हिंसा, स्वकीयांची हिंसा मान्य नव्हती. सावरकर क्रांतिकारक असले, तरी ते सरसकट शस्त्राचार, हत्या, हिंसा, विध्वंसाचे पुरस्कर्ते नव्हते.
 

Sawarkar Tilak 
 
बाबाराव सावरकरांचे प्रयत्न
 
बॉम्बपुस्तिकेची एक प्रत बाबाराव सावरकरांनाही दिली होती, त्यांनी गुप्त पोलिसांची पाळत असूनही त्यांना गुंगारा देऊन बडोद्याच्या ‘अभिनव भारत’च्या शाखेलाभेट देऊन तिथे या बॉम्बपुस्तिकेचा प्रचार केला होता. तसेच पुढील सात-आठ महिन्यांत त्यांनी ‘अभिनव भारत’च्या प्रत्येक शाखेत या विद्येचा प्रचार-प्रसार करण्यात यश मिळवले होते. नंतर बाबारावांना अटक झाल्यावर त्यांच्या घराच्या झडतीत ज्या विविध गोष्टी सापडल्या, त्यात जांभळ्या शाईने इंग्रजीमध्ये टंकित केलेली बॉम्बकृतीची पुस्तिका नि त्याला जोडलेल्या आकृत्यांची पुरवणी सापडली होती. लंडनहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पाठवलेली आणि माणिकतोळा बॉम्ब प्रकरणात जी पुस्तिका सापडली होती, त्याच्याशी तंतोतंत जुळणारीही पुस्तिका होती. बाबारावांच्या निकालपत्रात न्यायाधीश बी. सी. केनेडी या पुस्तिकेसंबंधी म्हणतो, ‘’हा संपूर्ण तपशील देणारा ऐवज होता. अनेक बॉम्ब आणि फ्यूज तयार करण्याबाबत त्यात तपशीलवार सूचना देण्यात आल्या होत्या.”
 
मुंबई गुप्तचर विभागाच्या कागदपत्रात ‘रामफाँटेन’ उपाख्य रामयोगी उपाख्य रामकुमार उपाख्य हरीकुमार घोष उपाख्य जॉन लाझारस उपाख्य टी. रामसिंग, अशी अनेक नावे धारण केलेल्या व्यक्तीचे विस्तृत निवेदन आढळून येते. त्याचे खरे नाव रामसिंग होते. त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता. त्याची आई मूळची चेन्नईची होती. १९०३ मध्ये तो कोलंबोला आला आणि तिथून तुतिकोरीनला गेला. चिदंबरम पिल्ले या क्रांतिकारकाशी परिचय झाल्यावर तो कलकत्त्याला गेला. मिदनापूरलाबिपीनचंद्र पाल यांचे एक गुप्त मंडळ होते. त्यात त्याने प्रवेश केला. त्याने दिलेल्या निवेदनानुसार, १९०६ लापेनांगमध्ये तो बॉम्ब बनवायला शिकला. चंद्रनगरला बिपीनचंद्र पाल यांच्या घरी राहत असताना त्याची बाबाराव सावरकरांशी भेट झाली. फेब्रुवारी १९०७ मध्ये तो बाबारावांसह नाशिकला गेला आणि भगूरला त्यांच्या घरी राहिला. नंतर महिनाभर मुंबईला वास्तव्यास असताना बाबाराव तीन वेळा मुंबईला येऊन गेले होते. बाबारावांच्यामुळे रामसिंग पुण्याला टिळकांच्या घरीही राहिला होता. तसेच एप्रिल १९०७ मध्ये सोलापूरचे ‘अभिनव भारत’चे सदस्य बळवंत शंकर लिमयेंकडेही राहिला होता. बेळगाव, धारवाड, हुबळी, मिरज, सांगली, कोल्हापूर येथे देखील गेला होता. बेळगावला गंगाधरराव देशपांडे नि गोविंदरावयाळगी आणि मिरजेत बळवंत भिडे, कुर्लेकर बंधू यांना रामसिंगने बॉम्ब बनवून दाखवला होता.
 
नंतर गोव्याला जे. आबासाहेब रामचंद्र यांच्या मडगावच्या संस्थेत दाखल झाला आणि मग पणजीला डॉ. शिरगावकरांच्या घरीही बॉम्ब बनवून दाखविला होता. पण, त्याने बनवून दाखविलेला बॉम्ब दोषपूर्ण होता, असा अभिप्राय नंतर तज्ज्ञ पोलीस अधिकार्‍याने दिला होता. १९०७ जून ते ऑक्टोबरमध्ये असा दौरा करून रामसिंग मुंबईला आला. जानेवारी १९०८ मध्ये बाबाराव त्याला घेऊन कलकत्त्याला गेले. तेथे त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापार्‍याने बाबारावांना बंदुका, रायफली नि दारुगोळा दिला आणि त्या मालाने भरलेल्या पेट्या रामसिंगने कोठूरला वामन बर्वेंकडे पोहोचवल्या. हे वामन श्रीधर बर्वे उपाख्य तात्या बर्वे म्हणजे सावरकरबंधूंचे मामेभाऊ. ऑगस्ट १९०८ मध्ये त्यांना तामिळ भाषेतीलराजद्रोहात्मक स्वरुपाची पत्रके चेन्नईमध्ये पाठवल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. त्यांचे चुलतभाऊ नाशिक कट खटल्यात आरोपी होते आणि त्यांना दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती.दि. २९ डिसेंबर, १९०९ ला त्यांच्या वाड्याची झडती घेतल्यावर १७ हजाराहून अधिक बंदुकीच्या गोळ्या जमिनीत पुरून ठेवलेल्या सापडल्या. कोठूर गावाबाहेर बर्वेंची स्वतःची विहीर होती, त्यात १५ बंदुका, पाच पिस्तुले, काही तलवारी आणि बंदुकीच्या दारुने भरलेल्या पिशव्या टाकलेल्या आढळल्या होत्या. कोठूरचा हा बर्वेंचावाडा ‘अभिनव भारता’चे शस्त्रागार म्हणून ओळखला जात होता. याकरिता बळवंत रामचंद्र बर्वे नि वामन श्रीधर बर्वे यांना तीन वर्षांची शिक्षा भोगावी लागली होती. बाबारावांनी लक्ष्मण वासुदेव ब्रह्मे यांना बॉम्बपुस्तिका दिली होती. ती त्यांनी सज्जनगडावर एका पत्र्याच्या पेटीत पुरून ठेवली होती. सज्जनगडावर ब्रह्मे आणि जनार्दन नरसिंह थत्ते यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रयत्न केले होते.
 
बॉम्बनिर्मितीचे इतर प्रयोग
 
या पुस्तिकेवरून किंवा स्वतःच प्रयोग करून बर्‍याच जणांनी बॉम्बनिर्मितीचे प्रयोग करण्यास सुरुवात केली होती. पुरुषोत्तम दांडेकर, वर उल्लेखिलेले कोठुरचे वामन श्रीधर बर्वे आणि पुण्याचे शंकर पांडुरंग महाजनदेखील बॉम्ब तयार करण्याच्या प्रयत्नांत होते. साधू वेशात असलेल्या चार बंगाली तरुणांनी बाळा वाणी उर्फ पाटील यांना बॉम्ब कसे तयार करावे, हे शिकवले होते. खरे आणि कर्वे यांनी नाशिकचे ‘अभिनव भारत’चे सदस्य दामोदर महादेव चंद्रात्रे (भिक्षुक), आबा गायधनी (भिक्षुक), विनायक नारायण देशपांडे (नंतर फाशी गेलेले, साधे मराठी मास्तर), शंकर रामचंद्र सोमण (नंतर जन्मठेप शिक्षा) आणि त्यांचे बंधू (खानापूर), पुरुषोत्तम लक्ष्मण दांडेकर (विद्यार्थी), श्रीधर वामन कर्वे (मॅट्रिक), त्र्यंबकराव मराठे (मराठी शिक्षक), रामचंद्र दिनकर भाटे (चित्रकला शिक्षक) या फार उच्च शिक्षित नसणार्‍या व्यक्तींनादेखील बॉम्बची विद्या शिकवली होती. कारण, त्या पुस्तिकेतील कृती इतकी साधी-सोपी होती की, त्यासाठी स्फोटकतज्ज्ञ किंवा रसायनशास्त्रज्ञ वा रसायनतज्ञ असण्याची गरज नव्हती, सामान्य माणसही ती कृती समजून घेऊन प्रयोग करू शकत होते, हे त्या पुस्तिकेचे वैशिष्ट्य होते. ‘अभिनव भारत’ आणि इतर क्रांतिकारक संघटनांनी बॉम्बसाठी लागणार्‍या पिक्रिक अ‍ॅसिड आणि मर्क्युरी फल्मिनेटचे कारखाने नाशिक, पुणे, मुंबई, पेण, कोठुर, खानापूर, वसई (मुख्य केंद्र) येथे सुरू केले होते. ही स्फोटकद्रव्ये करताना संभाव्य धोके टाळण्याची युक्ती रामभाऊ भाटे यांनी शोधून काढली होती.
 
नाशिकच्या खटल्यात कॅ. हायाम स्फोटकतज्ज्ञ म्हणून झालेल्या साक्षीत म्हणतात की, “या पुस्तिकेप्रमाणे उत्तम बॉम्ब करता येतील. या पुस्तिकेवरूनच ‘अभिनव भारता’च्या रसायनशास्त्री कृष्णाजी गोपाळ खरे यांनी पेणला बॉम्बचे प्रयोग केले होते. बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेले नायट्रिक सल्फ्युरिक अ‍ॅॅसिड कोल्हापूरच्या प्रायव्हेट इंग्रजी शाळेच्या प्रयोगशाळेतून दि. २१ जुलै, १९०८ ला चोरल्याचा आरोप जनार्दन शेणोलीकर, नारायण बाळाजी अंबपकर, गोखले यांच्यावर ठेवण्यात आला होता. दि. १५ जून, १९०८ आणि दि. २५ जुलै, १९०८ ला बॉम्ब कसा तयार करावा, यासंबंधीची पत्रके कोल्हापूरात ठिकठिकाणी लावण्यातही या मंडळींचा हात असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. १९०८च्या जून महिन्यात नाशिकहून विठ्ठल बाळकृष्ण जोशी ग्वाल्हेरला आले आणि नरहरपंत कोल्हटकरांकडे दोन महिने राहिले. कोल्हटकरांच्या गटातले बी. आर. देशपांडे नावाचे शिक्षक बॉम्ब तयार करण्याच्या उद्योगात होते. दि. ३० जानेवारी, १९०० ला त्यांनी बॉम्बनिर्मितीची प्रक्रिया आगाशे, दिवेकर वगैरेंना समजावून सांगितली होती. पुढे फल्मिनेट मर्क्युरी बनवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक स्फोट झाल्याने त्यांच्या चेहर्‍याची एक बाजूही भाजली होती. बॉम्बसाठी लागणार्‍या सल्फ्युरिक आणि नायट्रिक अ‍ॅसिड, पोटॅशियम क्लोरेट वगैरेंनी भरलेल्या पाच बाटल्या दिवेकरांच्या घरात ठेवलेल्या होत्या. ग्वाल्हेर कटाच्या खटल्यात खिरवाडकर, देसाई बंधू वगैरेंची ‘नवभारत संघटना’ त्याचप्रमाणे अभिनव भारताच्या ग्वाल्हेर शाखेचेकोल्हटकर, आगाशे, दिवेकर, बी.आर.देशपांडे वगैरे सदस्य पकडले गेले. ‘नवभारत संघटना’ व ‘अभिनव भारता’ची ग्वाल्हेर शाखा यांची युती झाली होती.
 
ग्वाल्हेरला ‘इंजिनिअरिंग’चे वर्ग चालवणारे नि नेपाळमध्ये जाऊन आलेले भालचंद्र केतकर यांच्या प्रयोगशाळेत बी. आर. देशपांड्यांना ’सायंटिफिक अमेरिकन’ नावाचे नियतकालिक मिळाले आणि त्यात बॉम्बनिर्मितीचे सूत्र दिलेलेआढळले. बॉम्बनिर्मितीची कला आपण केतकरांकडून शिकलो, असे देशपांडे यांनी पुढे पोलिसांना सांगितले. ग्वाल्हेरच्या केतकर विधिज्ञांचा मुलगा भालचंद्र केतकर शिक्षणासाठी पुण्याला आला होता आणि गोपाळ गणेश आगरकरांच्या घरीच राहत होता. आगरकर नि टिळक हे त्यांचे शिक्षक. नंतर केतकर ‘मेकॅनिकल इंजिनिअर’झाले. नंतर ते नेपाळला गेले. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर उपाख्य कासाहेब खाडिलकरांनी आठवणीत नोंद केल्यानुसार नेपाळचेपंतप्रधान चंद्रसमशेरजंग यांनी केतकरांना शस्त्रास्त्रांचा कारखाना दाखवून हा कारखाना त्यांनी (केतकरांनी) चालवावा,असे सांगितले होते. खाडिलकर तेव्हा टिळकांच्या सांगण्यावरून नेपाळलारायफलनिर्मिती कारखाना उभारण्याच्या खटपटीत होते. तेव्हा तिथे नेपाळमध्येच असलेल्या केतकरांना ते भेटले आणि त्यांच्याकडे असलेले रायफल-निर्मितीच्या यंत्राचे नकाशे त्यांनी खाडिलकरांना दिले. केतकर टिळकांचे माजी विद्यार्थी असल्याने हे नकाशे सहजतेने मिळाले. ‘अभिनव भारत’च्या गोपाळराव पाटणकरांकडे बॉम्बपुस्तिकेची नक्कल प्रत होती. ते घेऊन ते वसईच्या रामभाऊ भाटेंकडे गेले आणि त्या पुस्तिकेचा उपयोग करून ‘अभिनव भारत’च्या सदस्यांनी वसईमध्ये बॉम्बनिर्मितीचा छुपा कारखाना उभारला. नंतर ‘अभिनव भारत’च्या सदस्यांची धरपकड सुरू होताच हा कारखाना गुपचूपपणे बंद करण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांसह इतर कोणालाही या वसईच्या बॉम्बनिर्मिती कारखान्याची माहितीच नव्हती. ‘अभिवन भारत’चे एक सदस्य आणि सावरकरांचे नातेवाईक वि. म. भट यांनी त्यांच्या ‘अभिनव भारत’ पुस्तकात प्रथम या प्रकरणाची नोंद घेतली. तेव्हा, जगाला या वसईच्या बॉम्ब कारखान्याविषयी कळाले, इतकी कमालीची गुप्तता ‘अभिनव भारत’च्या सदस्यांनी पाळली होती.
 
दि. २३ मे, १९१० ला सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानात औंध हायस्कूलच्या एका खोलीत नारळाच्या करवंटीचे कवच असलेला एक बॉम्ब सापडला म्हणून हे प्रकरण ‘औंध बॉम्ब प्रकरण’ म्हणून ओळखले जात असले, तरी या प्रकरणामागे सातार्‍यातील गुप्त मंडळींचा हात असल्याने त्याबाबतच्या खटल्यास सातारा कट खटला, असेही नाव दिले गेले. महादेव रामचंद्र हिंगे, नारायण पांडुरंग मेहेंदळे आणि वासुदेव विश्वनाथ आठल्ये हे त्यातील तीन आरोपी होते. वासुदेवराव आठल्ये हे या गटाचे सूत्रधार होते. त्यांना बापटांनी आणलेली बॉम्बपुस्तिका मिळाली होती. पण, महादेवराव हिंगे यांनी स्वदेशी स्फोटकांच्या जोरावर स्वदेशी बॉम्ब बनवला होता. आठल्ये हे भगूरला शाळकरी विद्यार्थी असतानाच त्यांची सावरकर बंधूंची मैत्री झाली होती. आठल्ये कोलकात्याच्या नॅशनल मेडिकल महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना यवतमाळचे सिद्धनाथ कृष्णाजी काणे, नागपूरचे केशव बळीराम हेडगेवार, कोल्हापूरचे गोपाळ सदाशिव पळसुले, नाशिकचे नारायण दामोदर सावरकर हे त्यांचे सहाध्यायी डॉक्टर होते. आठल्येंनी ‘अभिनव भारता’चे सभासद म्हणून नाशिकला शपथ घेत होती, तर मेहेंदळे यांनी १९०७च्या जूनमध्ये तशीच प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे सातार्‍याचा हा गट म्हणजे ‘अभिनव भारता’ची शाखा समजणे योग्य ठरेल. मेहेंदळे हे संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निकटचे नातेवाईक होते. त्यांनी आपल्या आणखीन एका नातेवाईकास म्हणजे चिंतामण गणेश कोल्हटकर यांस गुप्त मंडळाची शपथ दिली होती. पुढील काळात मराठी रंगभूमी गाजवणारेनटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांच्या अशा तर्‍हेने शाळेत असतानाच या उलाढालींशी संबंध आला होता. सातारकर खटल्यात त्यांची साक्ष झाली होती. दि. ५ जुलै, १९१० ला महादेव हिंगे यांनी धान्याच्या पोत्यात दडवलेली अनेक आक्षेपार्ह पुस्तकेही सापडली. या पुस्तकांमध्ये सावरकरांची पुस्तके, सेनापती बापटांनी परदेशात असताना लिहिलेल्या पुस्तिका, बॉम्बपुस्तिका, युद्धशास्त्रावरची पुस्तके नि रशियन क्रांतिकारकांनी संघटन कसे केले, याबाबतची वासुदेव आठल्ये यांच्या हस्ताक्षरातील पुस्तिकाही सापडली.
 
दि. २५ ऑगस्ट, १९१० ला पंढरपूरात अण्णा आप्पाजी बडवे यांच्या घरी बॉम्बस्फोट झाला. घराच्या व्हरांड्यात एक पत्र्याची पेटी होती, त्यात दोन बॉम्ब ठेवल्याचे आढळले. मामलेदाराच्या कार्यालयातही बॉम्बस्फोटाने छताला छोटी भेग पडली. बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या १२ व्यक्तींवर रितसर खटला भरण्यात आला. आरोपींपैकी भगवान बाबाजी खुळे हे बॉम्ब उडवताना स्फोटामुळे जखमी झाले आणि त्यांची दोन-तीन बोटे कापावी लागली. दि. १५ मार्च, १९११ लापंढरपूर खटल्याचा निकाल देण्यात आला. पिराजी शहाबुद्दीन तांबोळी, रामा शिवबा नि यशवंत बाबुराव सोनार यांना दोषमुक्त ठरवून सोडून देण्यात आले. पांडुरंग रघुनाथ आचारी सात वर्षे, मारुती गणेश कुरोलीकर दहा वर्षे, भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल गणेश कुरोलीकर आणि जाफर हसन पिंजारी आठ वर्षे, अल्लाबक्ष शहाबुद्दीन तांबोळी चार वर्षे, सखाराम बाळोबा सोनार तीन वर्षे, नामदेव म्हसू न्हावी आणि नामदेव सखाराम शिंपी प्रत्येकी दोन वर्षे अशी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मूळ मिरजेच्या असणार्‍या मारुती गणेश भोसले यांचेही पंढरपूरला बॉम्ब तयार करणार्‍यामध्ये नाव आढळून येते. शं. वि. (बाबा) लेले यांनी आधी मिरज संस्थानातील लक्ष्मेश्वरचे डॉ. गोविंद जनार्दन मायदेव यांच्याकडून देशभक्तीची दीक्षा घेतली होती आणि नंतर १९०५ मध्ये ते सांगलीला शिकायला गेल्यावर उगारचे तुळपुळे, खाडिलकर, देसाई यांच्यासह गोपाळराव पाटणकरांनी या मंडळींना ‘अभिनव भारत’ची शपथ दिली होती. लेले नि तुळपुळे यांनी बॉम्बनिर्मितीचे प्रयोग सुरू केले होते. पण, उगार येथे बॉम्बप्रयोग सुरू असताना अकाली बॉम्ब फुटून लेले खूप जखमी झाले. तसेच, महादेव दिवेकर मॅट्रिकच्या शिक्षणासाठी सांगलीला असताना त्यांनी नरुभाऊ खाडिलकरांच्या नेतृत्वाखाली पद्माकरपंत भिडे यांच्याकडे दोनवेळा बॉम्ब करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता.
 
बॉम्बस्फोटांची मालिका
 
बंगालला पहिला स्फोट झाल्यावर बंगाल आणि महाराष्ट्रात एकामागोमाग एक बॉम्बस्फोटांचे सत्रच सुरू झाले. दि. २ जून, १९०८ ला पुण्यात तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. पहिला बुधवार चौकातील ‘वंदे मातरम्’ या हरी रघुनाथ भागवत यांच्या वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर झाला. दुसरा शनिवार पेठेतील दारूगुत्त्यालगत झाला, तर तिसरा दारूवाला पुलापाशी झाला. लगेच ‘केसरी’त ’हे उपाय टिकाऊ नाहीत’ या मथळ्याचा लेख प्रसिद्ध झाला, त्यात म्हटले होते, ’‘बॉम्बगोळे नाहीसे करण्यास खरा आणि टिकाऊ उपाय म्हणजे स्वराज्याचे महत्त्वाचे हक्क देण्यास आरंभ करणे हा होय.” ब्रिटिशांनी स्वराज्याचे अधिकार दिले नाहीत आणि पुण्यातले बॉम्बस्फोटही थांबले नाहीत. दि. २८ जून, १९१८ लापुण्यात सोमवार पेठेतील गोसावी अमृतगिरी यांच्या घरी स्फोट झाला. त्या प्रकरणात अनंत गणेश कर्वे नावाच्या ससून इस्पितळात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याला पकडण्यात आले. स्फोटाने फार नुकसान झाले नव्हते. त्यांना ऑगस्ट महिन्यात तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली. मुझफ्फरपूरनंतर ’माणिकतोळा’ बागेतील कट उघडकीस आला. ब्रिटिशांनी या बागेत नि कलकत्त्यामध्ये इतर ठिकाणी छापा टाकल्यावर त्यांना बॉम्ब, डायनामाईट, काडतूसं यांसारखी मोठी स्फोटकं हाती लागली. या प्रकरणात हेमचंद्र दास आणि नंतर जूनमध्ये होतीलाल वर्मांना अटक करण्यात आली. बाकी पकडलेल्यांपैकी नरेंद्र गोस्वामी दयेचा साक्षीदार झाला आणि त्याने इतरांसह सेनापती बापटांचे नाव गोवले. परिणामी, बापटांनी पुणे सोडले आणि ते भूमिगत झाले.
 
दि. १५ मे, १९०८ साली कलकत्ता शहरात ग्रे स्ट्रीट भागात बॉम्बस्फोट झाला; त्यात चार माणसे जखमी झाली. १९०८ जूनपासून डिसेंबरपर्यंत कलकत्त्याच्या आसपास रेल्वेमध्ये बॉम्बफेकीचे चार प्रसंग घडले. या स्फोटांमुळे हादरलेल्या ब्रिटिशांनी मग कठोर उपाय अवलंबायला सुरुवात केली आणि या प्रकारांना आळा घालण्यासाठी इंग्रजांनी दि. ८ जून, १९०८ ला दोन नवे निर्बंध अंमलात आणले. बॉम्ब बनविण्यास उपयुक्त सामग्री जवळ बाळगल्यास त्या व्यक्तीस जन्मठेपीची शिक्षा आणि खुनासारख्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देणार्‍या लेखांसाठी वृत्तपत्रकारांना कठोर शिक्षा, असे हे दोन निर्बंध होते. त्यानंतर देखील दि. १० फेब्रुवारी, १९०९ आणि दि. ५ एप्रिल, १९०९ ला कलकत्त्याजवळ आगगाडीवर बॉम्ब फेकले गेले. मुझफ्फरपूरच्या बॉम्ब प्रकरणावर लेख लिहिल्यामुळे ’काळ’कर्ते शिवरामपंत परांजपेंना दि. ११ जून, १९०८ ला मुंबई सरकारने अटक केली आणि त्यांना १९ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. दि. १३ जूनला बाबाराव सावरकरांना अटक करून एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. दि. २४ जूनला टिळकांना मुंबईत अटक करून नंतर सहा वर्षांची शिक्षा ठोठावून मंडालेला पाठवण्यात आले. मुंबईतील ’विहारी’चे (ज्यात सावरकरांचे लेख प्रसिद्ध होत) संपादक रा. ना. मंडलीक आणि ठाण्याचे ’अरुणोदय’ पत्राचे संपादक धोंडोपंत फडके यांना अटक करून कठोर शिक्षा देण्यात आल्या. सोलापूरच्या ’स्वराज्य’ पत्राचे संपादक बळवंत शंकर लिमयेंना जून १९०८ ला अटक केली; त्यांच्या छापखान्यात सावरकरांचे प्रकाशनाआधीच बंदी घालण्यात आलेले ’१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक छापले जात आहे, याचा इंग्रजांना सुगावा लागला होता. नंतर छाप्याच्या भीतीने त्यांनी ते मराठी ग्रंथाचे हस्तलिखित बाबारावांकडे परत पाठवून दिले होते. नागपूरच्या ’देशसेवक’ पत्राचे संपादक अच्युतराव कोल्हटकर नि ’हिंदी-केसरी’चे संपादक माधवराव सप्रे यांनाही इंग्रजांनी खूप छळले.
 
दि. ४ मे, १९०८च्या ‘लंडन टाईम्स’ने म्हटले की, ’विध्वंसक मार्गाचा अवलंब करण्यात बंगाल भले प्रमुखपणे दृष्टीत भरत असेल. पण, या चळवळीला ज्यांनी जन्म देऊन तिचे संगोपन केले, ते बहुधा पश्चिम भारतातच सापडतील.’ ही सर्व माहिती सांगण्याचा उद्देश इतकाच की, सावरकर नि इतर क्रांतिकारक आणि त्यांच्या गुप्त संस्थांनी निर्माण केलेले जाळे सावरकरांनी कशाप्रकारे कार्यान्वित करून त्याचा उपयोग बॉम्बपुस्तिकेचे वितरण करण्यासाठी केला होता, हे लक्षात यावे. महत्त्वाचे म्हणजे, ११० वर्षांपूर्वीच्या त्या काळात संपर्काची, दळवळणाची साधने आजच्या इतकी जलद वा वेगवान नव्हती. इंटरनेट, सोशल मीडिया तर सोडाच, पण साधा फोनदेखील म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास लॅण्डलाईन फोन (दूरध्वनी) देखील दुर्मीळ होता. त्यात आपण पारतंत्र्यात असल्याने शत्रूची नजर चुकवून या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यास आणि सावरकर नि या सर्व क्रांतिकारकांच्या उलाढालींचा अभ्यास केल्यास आपण अवाक होतो. केवळ देशाचे स्वातंत्र्य हा एकच ध्यास मनात बाळगून त्यांनी हा सारा खटाटोप केला होता. पण, सावरकर हे एक संयमी, दूरदर्शी आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यामुळे देश पारतंत्र्यात असताना आपल्याला गुलामगिरीत जखडणार्‍या परराष्ट्राविरूद्ध अपरिहार्य म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला असला, तरी त्याच सावरकरांनी भारत स्वतंत्र होताच आपल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे विसर्जन करून आता स्वतंत्र भारतात आपण सर्वांनी हिंसक वृत्तीचा त्याग करून लोकशाही नि अहिंसक मार्गांचा उपयोग करून सत्तापरिवर्तन करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या संविधानाने दिलेल्या ’मतदान’ या अधिकाराचाच केवळ उपयोग करावा, असे बजावून सांगितले होते.
 
सावरकरांना नाहक हिंसा, स्वकीयांची हिंसा मान्य नव्हती. सावरकर क्रांतिकारक असले, तरी ते सरसकट शस्त्राचार, हत्या, हिंसा, विध्वंसाचे पुरस्कर्ते नव्हते. सन १९२० मध्ये अंदमानातून आपल्या धाकट्या बंधूंना लिहिलेल्या पत्रात सावरकर लिहितात, "शक्तीचा शक्तीने प्रतिकार करताना आम्ही हिंसेचा मनापासून तिरस्कार केला व आजही करतो." या त्यांच्या तत्त्वात कधीही बदल झाला नाही. 'अभिनव भारत'च्या १९५२ ला झालेल्या सांगता समारंभात सावरकर म्हणाले, ”स्वराज्य स्थापन होताच आता आपले सर्वांचे पहिले राष्ट्रीय कर्तव्य हे असावयास पाहिजे की, क्रांतिकालातील आपणच राष्ट्रभर फैलावलेल्या राज्यविध्वंसक वृत्तींना नि साधनांना तत्काल विसर्जून राष्ट्रात विधायक नि निर्बंधशील वृत्तींचे वर्चस्व स्थापिले पाहिजे. परराज्य उलथून पाडण्यासाठी गुप्त कट, सशस्त्र बंडाळी, भयकरवाद, निर्बंधभंग, परराज्यद्रोह ही सर्व साधने पुण्यच असतात, अपरिहार्यच असतात. पण, जर ही साधने नि या सर्व वृत्ती स्वराज्य स्थापन होताच पंचमहापातकांसारखीच अधर्म्य समजून तत्काळ टाकून दिली नाहीत, तर बाहेरच्या शत्रूहूनही स्वराज्यात ती प्राणघातक ठरल्यावाचून राहत नाही. ही जाणीव दूरदर्शी क्रांतिकारक पुढार्‍यांना क्रांतिकालातच इतकी उत्कटतेने झालेली असे की, ’अभिनव भारत’ या गुप्त आणि मित्रमेळा किंवा लंडनमधील ’Free India Society’ सारख्या प्रकट शाखांतून तिची सविस्तर चर्चा केली जाई.
 
क्रांतिकारकांना तशी चेतावणी दिली जाई. स्वराज्य प्रस्थापनेनंतर कितीही तीव्र मतभेद असले, तरी ते आपले सारे मतभेद मतपेटीतच सामावले पाहिजेत. राज्य काँग्रेसचे नाही, राज्य आपणा सर्वांचे आहे. कारभार तेवढा आजच्यापुरता काँग्रेसचा. परसत्तेच्या आपत्तीतून आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्यसंपादन करण्यास्तव असंतोष, उत्क्षोभ, निर्बंधभंग, शस्त्राचार, गुप्त कट इत्यादी साधने योजणारी विध्वंसक क्रांतिप्रवृत्ती त्या कालापुरतीच काय ती धर्म्य असते. जेव्हा स्वातंत्र्य संपादन हे आपले प्रथम साध्य सिद्ध होते, तेव्हा सशस्त्र वा नि:शस्त्र प्रतिकारक देशभक्तांनी जनतेत संचरविलेल्या वरील सर्व विध्वंसक क्रांतिप्रवृत्तीचे तत्काळ विसर्जन करणे हे आपल्या यशस्वी झालेल्या राज्यक्रांतीचे अंतिम कर्तव्य होय. कारण, आता आपले साध्य स्वातंत्र्यरक्षण हे आहे, राष्ट्रसंवर्धन हे आहे. आता निर्बंधतुच्छता नव्हे, तर निर्बंधशीलता; विध्वंसक नव्हे, तर विधायक प्रवृत्ती, हा राष्ट्रधर्म आहे. अशा या थोर देशभक्त क्रांतिकारकांना वंदन!
 
- अक्षय जोग
 
(अक्षय जोग लिखित स्वातंत्र्यवीर ‘सावरकर : परिचित-अपरिचित’ (२०२१) या पुस्तकातील एक प्रकरण)
Powered By Sangraha 9.0