रामानुजस्य चरणौ शरणं प्रपद्ये। - भाग-१

21 Feb 2022 12:31:27
आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान हे सुवर्णसमृद्ध आहे. त्यातील वेदान्तशास्त्र हे शिरोभूषणच ! याच वेदान्तशास्त्रातील एक विशिष्टाद्वैत संप्रदाय. दि. ५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विशिष्टाद्वैत संप्रदायाचे संस्थापक श्री रामानुजाचार्यांच्या भव्य मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतत अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त श्रीरामानुजाचार्यांच्या जीवन तथा तत्त्वज्ञानाचा आढावा...
 
 
Ramanujacharya
 
दक्षिण भारतात अकराव्या शतकात श्रीरामानुजाचार्य यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या अगोदर सुमारे दीड हजार वर्षे प्रचलित असलेल्या वैष्णव संप्रदायाच्या आधारे ‘ब्रह्मसूत्रा’वर भाष्य लिहिले आणि भक्तिमार्गाला ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा अधिक महात्म्य प्राप्त करून दिले. कर्म व ज्ञान यांनी चित्त शुद्ध होते आणि भक्तियोगानेच मोक्षाधिकार प्राप्त होतो, असा शंकराचार्यांपेक्षा काहीसा वेगळा सिद्धांत त्यांनी स्थापन केला. परंतु, रामानुजांपूर्वी दक्षिणेत तामिळनाडूमध्ये सुमारे ६०० वर्षे ‘आळवार’ नावाच्या वैष्णव साधुसंतांचा संप्रदाय सुरू होता आणि त्यांच्या ग्रंथांना वेदांएवढेच महत्त्व होते. रामानुजांचा जन्म चोल साम्राज्याच्या अंतर्गत असलेल्या श्रीपेरुंबदूर नावाच्या गावात एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. रामानुजांचा काळ १०१७ ते ११३७. रामानुजाचार्यांनी ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला.
 
परंतु, कौटुंबिक कलहाला कंटाळून त्यांनी पत्नीला माहेरी पाठवले आणि त्वरित संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. त्यानंतर ते कांचीपुरम येथे स्थलांतरित झाले. यादव प्रकाश यांच्या गुरूंसोबत ‘अद्वैत वेदांता’च्या मठात शिक्षण घेतले. रामानुजाचार्य आणि त्यांचे गुरू यांच्यात वैदिक ग्रंथांच्या बाबतीत, विशेषतः उपनिषदांचा अर्थ लावण्यात वारंवार मतभेद होत. कालांतरांनी राजानुजाचार्य हे आपल्या गुरूंपासून वेगळे झाले आणि त्यांनी आपला स्वतंत्र अभ्यास सुरू केला. अकराव्या शतकातील प्रसिद्ध वैष्णव अनुयायी प्रसिद्ध वेदांती यमुनाचार्य यांना भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, ते भेटण्यापूर्वीच मरण पावले होते. वास्तविकत: रामानुज हे यमुनाचार्यांच्या नातवाचे नातू होते. रामानुजाचार्यांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे यमुनाचार्यांचे प्रेत चमत्कारिकरित्या उठले आणि त्यांनी रामानुजाचार्यांना अनुग्रह केला.
 
रामानुजांना ‘श्री वैष्णवीम’ नावाने दिक्षा देण्यात आली, असेही सांगण्यात येते. रामानुजाचार्य हे कांचीपुरम येथील वरधराजा पेरुमल मंदिरात पुजारी पद स्वीकारले. पुनश्च भगवान विष्णूंच्या सान्निध्यात ‘वैष्णव तत्त्वज्ञान’ स्वदृष्टीने शिकण्यास सुरुवात केली. ‘विशिष्टाद्वैत तत्त्वज्ञान’ मांडताना रामानुजांनी असे म्हटले आहे की, आपण पूर्वी होऊन गेलेल्या बोधायन, टंक, द्रामिड, गुहदेव, कपर्दी आणि भारुची यांचीच प्रथा पुढे चालवीत आहोत. परंतु, बोधायन इत्यादींचे ग्रंथ सध्या संदर्भासाठी उपलब्ध नाहीत. वेदान्त तत्त्वज्ञानात ‘भेदाभेदवाद’ आढळतो. औडुलोमी व आश्मरथ्य यांनी तो प्रथम प्रवर्तिला, असा बादरायणांनी उल्लेख केला आहे. शंकराचार्यांनी भर्तृप्रपंच याच्या भेदाभेदवादावर आक्षेप घेतलेले आढळतात. रामानुजांचे एकेकाळचे गुरू यादवप्रकाश (अकरावे शतक) हे आश्मरथ्याचे अनुयायी होते. ब्रह्मसूत्रांवर टीका लिहिणारे भास्कर हेदेखील भेदाभेदवादाचे पुरस्कर्ते होते. रामानुजांनी आपल्या ‘वेदार्थसंग्रहा’त यादवप्रकाश व भास्कर या दोघांची मते खोडून काढली. आपल्या ‘श्रीभाष्या’त ब्रह्मसूत्रांचा अर्थ आपण ‘बोधायना’ला अनुसरून लावला आहे, असे रामानुजांनी म्हटले आहे. शंकराचार्यांनी ज्या ‘अवर्षा’चा उल्लेख केला आहे, तो ‘बोधायन’च होय, असे काहींचे मत आहे. एकंदरीत वेदान्त तत्त्वज्ञानात ‘भेदाभेदवाद’ बर्‍याच आचार्यांनी मांडला होता व रामानुजांना तो पटला नाही. तरीही श्रीरामानुजाचार्यांच्या तत्त्वज्ञानावर भास्कर, यादवप्रकाश व यामुनाचार्य यांच्या शिकवणीचा बराच परिणाम झाला आहे.
 
भास्करांनी ‘भेद’ (नानात्व) व ‘अभेद’ (एकत्व) दोन्ही सत्य आहेत, असे मत मांडले. कारण, या रूपाने ब्रह्म एकजिनसी असते. परंतु, कार्यरूपाने ते नानात्व पावते. ब्रह्म विश्व या रूपाने परिणाम पावते. ‘अंतःकरण’ या उपाधीने युक्त ब्रह्म म्हणजे जीव. जीव हा स्वाभाविकतः ब्रह्म असतो. उपाधींमध्ये बांधला गेला की, जीवात भेद निर्माण होतात. जीवांच्या या उपाधी सत्य आहेत, त्या माया नव्हेत. भास्कराच्या मते, मायावाद हा महायान बौद्ध तत्त्वज्ञानामुळे वेदान्तशास्त्रात समाविष्ट झाला असून तो तात्त्वज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे. जीव आणि ब्रह्म यांच्यात स्वाभाविक अभेद असतो, भेद येतो तो ‘औपाधिक’ होय. उपाधींनी युक्त अशा जीवस्वरूपात ब्रह्म या विश्वाची सुखदुःखे भोगते व ज्ञानकर्मसमुच्चयाने त्यातून मुक्त होते. भास्करांचा हा ‘भेदाभेदवाद’ रामानुजांना पसंत नाही. त्यांच्या मते, भेद आणि अभेद दोन्ही जसे वेगवेगळे सत्य असू शकत नाहीत, तसेच एकाच गोष्टीविषयी ते दोन्ही सत्य असू शकणार नाहीत. ‘शुद्ध एकत्व’ किंवा ‘शुद्ध नानात्व’ याही कल्पना असून त्या असत्य आहेत. एकाच ब्रह्माच्या त्या दोन स्वतंत्र अवस्था असू शकत नाहीत. ‘भेद’ आणि ‘अभेद’ यांऐवजी रामानुजांच्या मते, ‘भेदात अभेद’ किंवा ‘भेदामुळे अभेद’ किंवा ‘भेदातून अभेद’ या सत्य कल्पना आहेत. ब्रह्म हे जीवरूपाने बंधनात पडते, हा विचार त्यांना मान्य नाही. त्याऐवजी रामानुजांचे मत असे होते की, ब्रह्म हे सदासर्वदा शुद्धच असते. केवळ ब्रह्माचे शरीर बदलते आणि ब्रह्माचे हे शरीर म्हणजे जीव आणि जड पदार्थ होत. जीवांच्या उपाधी किंवा त्यांचे अपूर्णत्व इ. कल्पना अज्ञानामुळे निर्माण होतात.
 
यादवप्रकाश हे एकेकाळी रामानुजांचे गुरू होते. परंतु, त्यांची मते न पटल्यामुळे रामानुजांना त्यांना सोडून जावे लागले. यादवप्रकाशांच्या मते, ब्रह्म हे नेहमी शुद्ध असते. परंतु, ते ‘चित्’ (जीव), ‘अचित्’ (जड पदार्थ) आणि ‘ईश्वर’ यांत रूपांतर पावते. याची ही तीन रूपे स्वतंत्र, भेदयुक्त नाहीत. एकाच ब्रह्माच्या त्या केवळ तीन अवस्था आहेत. ब्रह्माहून त्या वेगळ्या आहेत, हेच आपले अज्ञान. या अज्ञानाचा नाश कर्म व ज्ञान यांनी होतो. भास्कराप्रमाणे यादवप्रकाशांची मतेही रामानुजांनी खोडून काढली आहेत. यादवप्रकाशांनी केलेला ‘ब्रह्म’ व ‘ईश्वर’ यांच्यातला फरक त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते, ‘चित्’ आणि ‘अचित्’ या ब्रह्माच्या अवस्था नाहीत, ती ब्रह्माची शरीरे होत. यमुनाचार्यांच्या मते, तीन अंतिम सत्य तत्वे मानायला हवीत : सर्वज्ञ ईश्वरतत्त्व, संज्ञायुक्त जीव आणि जड पदार्थ. यामुनाचार्यांच्या मते, न्यायतः पाहता ‘ईश्वराचे अस्तित्व हे कारण व सृष्टी हे कार्य’ हे वचन सत्य मानले पाहिजे. रामानुजांना हे पटत नाही. ईश्वराचे अस्तित्व कोणत्याही अनुमानाने सिद्ध करता येत नाही, असे पाश्चात्य तत्त्वज्ञ कांटप्रमाणे रामानुजांना वाटते. ईश्वर हा केवळ श्रद्धेचा विषय आहे. अशा प्रकारे भास्कर, यादवप्रकाश आणि यामुनाचार्य यांनी वेदान्त तत्त्वज्ञानात केलेल्या या सुधारणा रामानुजांना संपूर्णपणे अमान्य होत्या. रामानुजांनी प्रथम ज्ञानासंबंधीचा आपला सिद्धांत निश्चित केला. ज्ञान हे नेहमी भेदात आणि भेदातून प्रतीत होते. या बाबतीत नैयायिक, मीमांसक व पाश्चात्य वास्तववादी तत्त्वज्ञांप्रमाणे ज्ञान हे स्वतःपेक्षा वेगळ्या अशा पदार्थांचे अस्तित्वदर्शक असते, हे तत्त्व त्यांना पटले होते.
 
ज्ञान हे स्वतःपुरते असू शकत नाही. ते कुठल्या तरी जीवासाठी, कुठल्या तरी पदार्थाचे असते. ‘मी जाणीव आहे’ असे कधी कोणी म्हणत नाही. ‘मी अमुक पदार्थ जाणतो’ असे आपण नेहमी म्हणतो. असल्या विधानांत रामानुजांच्या मते विभक्त गोष्टींचे एकीकरण साधलेले असते. जर ‘अ’ आणि ‘ब’ वेगळे असतील, तर ‘अ हा ब आहे’ असे विधान आपणाला करता येणार नाही. तसेच ‘अ’ आणि ‘ब’ यांच्यात एकत्व असले, तर ‘अ हा ब आहे’ या म्हणण्यात पुनरुक्तिदोष घडेल. यामुळेच रामानुजांच्या मते तर्कदृष्ट्या ‘शुद्ध अभेद’ तसेच ‘शुद्ध भेद’ दोन्हीही अशक्यरूप आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ ही एकाच पदार्थांची दोन स्वरूपे आहेत. त्यांना वेगळे अर्थ आहेत, पण त्यांनी एकाच पदार्थाचा निर्देश केला जातो. उपनिषदातील ‘तत् त्वं असि’ या विधानाचा अर्थ, याच आधारावर, ‘तत्’ व ‘त्वं’ यांना वेगळे अर्थ असले, तरी त्यांनी व्यक्त केला जाणारा पदार्थ एकच आहे, असा लावायला हवा. एकत्व हे नुसते, केवळ, प्रतीत होणे शक्य नाही. कुठले तरी भेदतत्त्व त्यात अनुस्यूत असायला पाहिजे. शंकराचार्यांना वाटते त्याप्रमाणे ‘तत् त्वं असि’ या विधानातून जीव आणि ईश्वर यांच्यात शुद्ध एकत्व आहे असा अर्थ निघत नाही. त्यांचे एकत्व भेदयुक्त आहे.
 
याच ज्ञानमीमांसेवर रामानुजांनी आपला ‘आभास’ किंवा ‘प्रमाद’ याविषयीचा सिद्धांत उभारला आहे. ज्ञान हे त्यांच्या मते सर्वदा सत्यच असते. ते कधीही चुकीचे असू शकत नाही. ते नेहमी ज्या वस्तूचा बोध करायचा तिचा निर्देश करते. रामानुजांच्या या सिद्धांताला ‘सत्ख्याती’ वा ‘यथार्थख्याती’ असे नाव आहे. ज्ञानात नेहमी सत्य वस्तूची प्रतीती होते अथवा त्याचे प्रतिबिंब पडते. शिंपला हा चांदीसारखा दिसतो, हा आभास नसून शिंपल्यात खरोखरच चांदीचे कण असतात, हे ज्ञान प्रतीत होते. पांढरा शंख हा कावीळ झालेल्या माणसाला पिवळा दिसतो, हा आभास नसून पित्ताचे कण दृष्टिद्वारा शंखाकडे प्रक्षेपित होतात व त्यामुळे कावीळ झालेल्या व्यक्तीपुरता तो शंख खरोखरच पिवळा होतो. स्वप्नातील दृश्ये ही आभास नसून परमेश्वर त्या त्या व्यक्तीला तिच्या कर्माची फले म्हणून ती दर्शवीत असतो. ‘आभास’ किंवा ‘प्रमाद’ म्हटल्या जाणार्‍या गोष्टीत चुकीचे असे काही नसते. जे असते ते केवळ अपूर्ण ज्ञान आणि यामुळेच ज्ञान आणि आभास असा विरोध केवळ व्यवहाराच्या पातळीवर ठीक वाटला, तरी तार्किकदृष्ट्या तो मानणे चुकीचे आहे.
 
आभासाविषयीचा असाच सिद्धांत सांख्य तत्त्वज्ञानात आढळतो, तसेच मीमांसकांपैकी प्रभाकराने ‘अख्याती’ या नावाखाली तो मांडला होता. रामानुजांनी मात्र यांच्यापुढे जाऊन सर्व ज्ञान हे यथार्थच असते, हे सांगण्यात मोठेच धारिष्ट दाखविले. प्रभाकराचा सिद्धांत ‘फलप्रामाण्यवादा’च्या अगदी जवळ गेला, तसे रामानुजांनी आपल्या सिद्धांताला जाऊ दिले नाही. फलाने ज्ञानसिद्धी होते, असे मानण्याऐवजी ज्ञानाचे प्रामाण्य स्वतः सिद्ध असते, असे सांगण्यात त्यांनी आपली भूमिका व्यवहाराच्या सामान्य पातळीच्या वर उचलून धरून तत्त्वचिंतकाचे खरे कार्य केले आहे. रामानुजांच्या या सिद्धांताचे महत्त्व युरोपात वैज्ञानिक तत्त्वज्ञान निर्माण होईपर्यंत कोणालाही वाटणे शक्य नव्हते. कारण, युरोपातही ब्रॅड्ली वगैरे केवल चिद्वादी तत्त्वज्ञांच्या विचाराचा पगडा आधुनिक काळातील विचारचिंतनावर पुष्कळ बसला आहे. विज्ञानाच्या प्रगतीनंतरच आभास म्हटल्या जाणार्‍या आपल्या अनुभवात काय ज्ञान आहे, याचा शोध सुरू झाला. पाण्याच्या पेल्यात उभी केलेली काडी वाकडी दिसते, हा आभास नसून त्यात पाण्यासारख्या माध्यमातून प्रकाशकिरणे कशी परावर्तित होतात, याचा नियम आहे. असल्या शोधांनी रामानुजांच्या सिद्धांताचे महत्त्व सहज पटेल. उद्याच्या भागात जाणून घेऊया रामानुजाचार्यांच्या भक्तिमार्गी तत्त्वज्ञानाविषयी... (क्रमश:)
 
- वसुमती करंदीकर
Powered By Sangraha 9.0